• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

यशवंतराव राष्ट्रीय व्यक्तिमत्त्व- यशवंतरावांचा राजकीय प्रवास-ch १२-३

जिल्हा परिषदा, सहकार, शेती (कृषि औद्योगिक समाज), शिक्षण यासंबंधातील निर्णय, महाराष्ट्रात सामाजिक परिवर्तन घडून यावे या प्रमुख उद्देशाने केले.  या सार्‍या नव्याने सुरू होणार्‍या प्रवाहात, समाजातील सामान्य थराला, मुख्यतः दलितांना सामावून घेणे शक्य झाले, या प्रवाहात अशी जर सांगड घालता आली तर समाजपरिवर्तनासाठी आवश्यक ते वातावरण निर्माण होईल; किंबहुना तसे ते व्हावे अशी मनात तळमळ होती.

मी ज्या समाजात वाढलो, त्या समाजाचे जे चित्र पाहिले तेथे शिक्षणासाठी लढाई करावी लागत होती.  महाराष्ट्रात शिक्षणाविषयी तीव्र तळमळ होती.  म. फुले, लो. टिळक, आगरकर, डॉ. आंबेडकर, महर्षी कर्वे, भाऊराव पाटील, पंजाबराव देशमुख, भाऊसाहेब हिरे या माणसांनी शिक्षणाच्या क्षेत्रात ॠषितुल्य काम केले.  परंतु महाराष्ट्रात खालच्या थरापर्यंत जेवढे शिक्षण पोहोचायला पाहिजे तेवढे पोहोचत नव्हते.  याचं कारण आर्थिक स्थिती.  शिक्षण घेण्यामागे आर्थिक स्थितीचा अडसर असायचा.  यातून बाहेर पडावं म्हणून काही निर्णय घेतले.

प्रचलित शिक्षणपद्धती योग्य आहे की नाही, योग्य नसेल तर बदल कसा घडवून आणता येईल, गुणवत्ता कशी राखता येईल याबाबत तज्ज्ञांनी जरूर खल करावा, निर्णयापर्यंत पोहोचावे.  परंतु चर्चा आणि निर्णय या गोष्टी दीर्घकाळ चालत राहतात हा अनुभव जमेस धरून महाराष्ट्रात सर्वप्रथम शिक्षणप्रसाराचा निर्णय आम्ही केला.  शिक्षणाचे काही संस्कार घडतात, इष्ट परिणाम होतात.  शिक्षण हे एक असं शस्त्र आहे की माणसाची मूल्यं बदलायला त्याची मदत होते.  माणसाची मूल्यं बदलणारेच हे शस्त्र आहे.  गुणवत्ता वाढावी हा तर शिक्षणाचा मूळ हेतू असतोच.  पण त्यात सुरुवातीला संख्यात्मक प्रयत्‍नही करावे लागतात.  शिक्षण हे समाजात प्रत्येक घटकापर्यंत पोहोचले पाहिजे.  हरिजन, ब्राह्मण, दलित, मराठा कोणीही असो, शिक्षणाच्या माध्यमातून नवा, शक्तिमान माणूस तयार होतो हे गृहितकृत्य जर मान्य असेल तर शिक्षण सर्वदूर पोहोचण्यासाठी शिक्षणप्रसाराचा नवा रस्ता तयार करण्याचा निर्णय करावा लागणार होता.  तसा तो केला.  त्याचा मला आनंद आहे.  मला अशी भीती घालण्यात आली की, या शिक्षणप्रसाराच्या हव्यासामुळे वेगळ्या विचाराची माणसे तयार होतील.  काही बंडखोर निर्माण होतील !  मी मनाशी अन् जाहीरपणानंही म्हटंल, ठीक आहे, अडाणी बंडखोरापेक्षा सुशिक्षित बंडखोर मला चालेल !

शिक्षणाप्रमाणेच सहकार ही महाराष्ट्राला लाभलेली शक्ती आहे.  सहकारी चळवळ आम्ही सुरू केली असा आमचा दावा नाही.  पन्नास वर्षांपूर्वी महाराष्ट्रात हे काम सुरू झालं.  माणसांना एकत्र आणून त्यांच्या शक्तीतून काम उभं करणारी ही लोकशाही चळवळ आहे.  शासनातर्फे करायच्या विकासाच्या कामाची गाठ या चळवळीशी घालण्याच्या हेतूनं महाबळेश्वर येथील शिबिरात 'कृषि औद्योगिक समाज' या शब्दप्रयोगाचा उच्चार केला.  शेती हा उद्योग आहे.  या उद्योगाची नवी तंत्रे, व्यवस्थापकीय कुशलता, आर्थिक साधने शेतकर्‍यांना उपलब्ध करावी आणि ग्रामीण जनतेची शहराकडील धाव, गर्दी रोखण्यासाठी शेतमालावर प्रक्रिया करणारे उद्योग तेथेच सुरू करण्यास प्रोत्साहन द्यावे हा त्या मागचा हेतू.  

सहकारी चळवळी ही आर्थिक लोकशाही तत्त्वानं चाललेली चळवळ असल्यानं जनतेनंच ती चालविली पाहिजे.  याचा सामाजिक संदर्भ जो मी मनात ठेवतो त्यात खेड्यातला सगळा वर्ग, विशेषतः दुबळे लोक या चळवळीच्या प्रवाहात आणावेत, तेथे त्यांची भागीदारी तयार व्हावी हा आहे.  यातील किती घडले असे विचाराल तर मनात खंत आहे असं मी म्हणेन.  जे काही घडलं, घडतंय त्यात अपुरेपणा आहे असं म्हणेन.

सहकारी चळवळीत सहभागी झाल्यामुळं खेड्यात काही कुटुंबं सुखी झाली.  परंतु त्यांची शहरी धनपतीशी तुलना करणं चूक आहे.  त्याचबरोबर खेड्यातल्या सुखी माणसाला जागा मात्र केला पाहिजे.  जागा ठेवला पाहिजे.  त्यानं खालच्या थराचा विचार करून त्याच्यापर्यंत जायला हवं.  सहकारी चळवळीतही मक्तेदारी निर्माण करण्याची जी प्रवृत्ती निर्माण होत आहे किंवा झाली आहे ती रोखावी लागेल.  सहकारी सोसायटीचे सभासदत्व द्यायचे नाही, दलित, लहान माणूस, याला भागीदारी मिळू द्यायची नाही या प्रवृत्तीविरुद्ध लढावे लागेल.  लोकशाही प्रेरणा दुरुस्त करावी लागेल.  सहकारी चळवळीला चांगल्यांनी मार्गदर्शन केलं आहे.  सहकार ही एक मूलभूत शक्ती आहे.  सत्ता केंद्रित होण्यामुळे काही अनिष्ट घडत असेल, घडणार असेल तर या चळवळीला नवीन शक्ती, विचार द्यावे लागतील.  सहकारी चळवळीची म्हणून सत्ता असली तरी पथ्य ही पाळलीच पाहिजेत.  सत्तेत राहून मी तरी तसा प्रयत्‍न केला.