• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

यशवंतराव राष्ट्रीय व्यक्तिमत्त्व- यशवंतरावांचा राजकीय प्रवास-ch १२-१

स्वातंत्र्याची चळवळ आणि त्याच पायवाटेनं वाटचाल करीत यशवंतराव सत्तेत पोहोचले.  मोठ्या शक्तिमान घराण्यातून, घरातून आणि राजकारणाची देदीप्यमान परंपरा असलेल्या कुटुंबातून सत्तेत सहजगत्या पोहोचलेली ही असामी नव्हे.  ''लोकांच्या साहाय्यानं सत्तेत पोहोचलो आणि कामातल्या अनुभवाच्या शिदोरीवर सत्तेत टिकलो, विशेषतः दिल्लीतल्या सत्तेवर टिकलो.  आयुष्यात मनुष्याला अनुभव हाच मोठा गुरू असतो''.... यशवंतरावांनी वाक्य पूर्ण केलं आणि समोर भिंतीकडं एकटक पाहात राहिले.  चेहर्‍यावर गांभीर्य साठलं.

पण एक क्षणभरच !  त्यांनी माझ्याकडं पाहिलं.  तुम्हाला काय म्हणायचंय, असंच जणू त्यांची नजर मला विचारीत असल्याचं भासलं.  चर्चा पुढं न्या असंच त्यांना सुचवायचं असावं.  टेपरेकॉर्डवरील ठुमरीची ध्वनिफीत बदलून मी नवी ठेवली होती आणि बोललेलं सारं मुद्रित होत आहे याकडं त्यांचं लक्ष होते.  एरवी 'सावध' असलेले यशवंतराव तरीही गप्पा करीत होते - अगदी मोकळेपणानं !  गप्पांचा टप्पा आता मुख्यमंत्रिपदापर्यन्त पोहोचला.

''मुख्यमंत्री झालो तो विरोधातूनच, वादातून झालो.  मुख्यमंत्री कुणी व्हायचं याचा काँग्रेसपक्षातच वाद होता.  पक्षांतर्गत झटापटीतून मुख्यमंत्रिपदासाठी माझी निवड झाली हे खरं परंतु त्याचा परिणाम होण्याची शक्यता होती.  भाऊसाहेब हिरे सरकारात नव्हते.  नाराज होते.  हे सर्व का घडलं, कशामुळं घडलं ते तुम्हाला आता सांगत नाही.  या सार्‍याबद्दल मलाच केव्हा तरी सविस्तर 'इन् टोटॅलिटी' लिहावं लागेल.  ते मी लिहिणार आहे.  एक गोष्ट खरी की, मला मुख्यमंत्री बनवा, आशीर्वाद द्या किंवा मुख्यमंत्री होऊ द्या असं विचारण्यासाठी आपण दिल्लीला गेलो नाही किंवा दिल्लीतील कुणाच्या आशीर्वादाचीही अपेक्षा केली नाही.  त्या काळात तशी वहिवाटही नव्हती.  मुंबई राज्याच्या पातळीवरच निर्णय झाले.''  पथ्यं कोणती पाळली हे ते सांगत होते.

''मुख्यमंत्रिपद स्वीकारताच असं लक्षात आलं की सत्ता मिळणं सोपं पण टिकणं अवघड !  विशेषतः कारस्थानं न करता सत्ता टिकणं आणि टिकवणं अधिक अवघड.  राजकारणात वाद हे अपरिहार्य असतात.  सत्तेतील प्रमुख व्यक्ती वादग्रस्त ठरतेच.  पण त्या वेळी त्यांच्या अंगच्या गुणांची कसोटी लागून जाते.  परंतु सत्तेत येण्यापूर्वी, कार्यकर्ता म्हणून, स्वातंत्र्य चळवळीत, सातारा जिल्ह्याच्या ग्रामीण भागातला म्होरक्या म्हणून काम करत असताना जे अनुभव जमा झाले, ज्या कसोटीतून जावं लागलं ते अनुभव माझा त्या वेळी आधार ठरला.  मुख्यमंत्रिपद स्वीकारताच ज्यांचा त्यासाठी किंवा अन्य कारणांसाठी विरोध होता त्या लोकांना जवळ करण्यावर त्यामुळेच मी लक्ष केंद्रित करू शकलो.  विचारांची देवाण-घेवाण खुलेपणानं करीत राहिल्यामुळे स्वातंत्र्याची चळवळ, निदान माझ्या जिल्ह्यापुरती तरी मी पुढं नेऊ शकलो.  सत्तेमध्ये आल्यानंतरही तेच पथ्य पाळलं.  सत्तेत स्थिर व्हायचं आणि सत्तेचा वापर सामाजिक स्वास्थ्यासाठी करायचा तर, सर्व पातळीवर विचारांची देवाण-घेवाण खुलेपणानं करता येईल असं वातावरण असावं लागते.  ते वातावरण निर्माण करण्याकडे कटाक्षानं लक्ष दिलं.  राज्य रागाने चालविता येत नाही.  रागाचे काही परिणाम होऊ नयेत म्हणून पराकाष्ठा केली.  राजकारण कोणत्या पद्धतीने, विचाराने चालवावे हा मतभेदाचा प्रश्न होता.  हा प्रश्न काँग्रेस पक्षामध्ये त्यापूर्वी म्हणजे संयुक्त महाराष्ट्राची चळवळ सुरू होती त्याच वेळी निर्माण झाला होता.  चळवळ कोणत्या पद्धतीनं चालवावी हा प्रश्न होता.  त्या विषयी मतभेद होते.''

''महाराष्ट्रातला, मुंबईतल्या या अनुभवाचा लाभ दिल्लीत काम करतानाही झाला.  दिल्लीत वाद निर्माण झाले, मतभद निर्माण झाले.  राजकारणात काम करताना हे घडतेच.  राजकारणातल्या माणसाला वादाच्या बाहेर राहणे अवघड असते.  परंतु वादळातसुद्धा मन शांत ठेवण्याचा प्रयत्‍न केला.  शांत राहिलो याचं कारण आहे.  

ते असं आहे की, सत्तेत राहताना मनात कुणाबद्दल शत्रुत्व ठेवायचं नाही, निर्णय करताना कसलाही पूर्वग्रह ठेवून निर्णय करायचा नाही हे स्वतःला शिकवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्‍न केला.  माझे काही निर्णय कदाचित चुकले असतील परंतु एखादा निर्णय केल्याबद्दल मला कधी पश्चात्ताप झाला नाही.  महत्त्वाचा निर्णय करण्यामागे काही कारणेही असतातच.  परंतु वैयक्तिक कारणासाठी निर्णय करण्यापासून दूर राहिल्यानं कधी सटपटलो नाही.