• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

यशवंतराव राष्ट्रीय व्यक्तिमत्त्व- यशवंतरावांचा राजकीय प्रवास-ch १०

१०. राजकीय जीवनाचे चार अध्याय (मधू लिमये)

यशवंतराव चव्हाण यांची व माझी अखेरची भेट झाली ती एका गाण्याच्या कार्यक्रमात.  त्या वेळचे केंद्रीय मंत्री एन. के. पी. साळवे यांच्या घरी  पं. जसराज यांचे गायन होते.  साळवे यांनी या कार्यक्रमासाठी यशवंतरावांना व मलाही बोलावले होते.  जसराजांचे गाणे त्या दिवशी खूपच रंगले.  यशवंतराव गाण्यात पूर्णपणे रमले होते.  गायनाच्या कार्यक्रमानंतर, कधी तरी संध्याकाळी गपपा मारायला घरी या, असे ते म्हणाले होते.  दुर्दैवाने त्यांच्या भेटीसाठी जाणे जमले नाही.  अचानक त्यांच्या निधनाचे वृत्त वर्तमानपत्रात वाचले आणि अत्यंत हळहळ वाटली.  

यशवंतरावांचा आणि माझा बराच जुना परिचय होता.  त्यांच्या केंद्रीय सरकारमधील कामगिरीची सुरुवात व माझ्या संसदीय जीवनाची सुरुवात साधारणपणे एकाच वेळी झाली.  त्यांच्या जीवनाचे चार अध्याय पडतात.  पहिला अध्याय स्वातंत्र्य चळवळीशी निगडित आहे.  एक ध्येयवादी तरुण या नात्याने ते राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या चळवळीकडे खेचले गेले.  स्वातंत्र्य चळवळीतील पुढारलेल्या विचारसरणीचे जे अनुयायी होते त्यामध्ये यशवंतरावांची गणना करावी लागेल.  समाजवादी व रॉयवादी विचारांचे त्यांना बरेच आकर्षण होते.  यशवंतरावांनी १९४२ च्या भूमिगत चळवळीत हिरीरीने भाग घेतला.  त्यानंतर ते विधान सभेवर निवडून आले.  संसदीय सचिवापासून ते स्वतंत्र खाते सांभाळणार्‍या मंत्र्यांपर्यंत त्यांनी अलपावधीत प्रगती केली.  

यशवंतरावांचा जीवनाचा दुसरा अध्याय १९५६ मध्ये सुरू झाला.  प्रथम महाद्वैभाषिकाचे व नंतर महाराष्ट्राचे ते मुख्यमंत्री झाले.  मुख्यमंत्री झाल्यानंतर यशवंतरावांनी प्रशासनाच्या धोरणाला नवीन वळण दिले.  गोळीबार, लाठीमार इत्यादी दडपशाहीच्या उपायांचा अवलंब न करता विरोधी पक्षांशी व चळवळी करणार्‍या नेत्यांशी सौजन्याने वागायचे व शक्यतो तडजोडीने मार्ग काढायचा, असे नवीन तंत्र त्यांनी सुरू केले.  मोरारजींची अरेरावी राजवट व यशवंतरावांची सौम्य राजवट यातला फरक जनतेला व विरोधी पक्षांना एकदम जाणवला.  अन्यथा संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या झंझावातात ते तीन-चार वर्षे टिकून राहिले नसते.  इंदिरा गांधींशी संधान बांधून त्यांनी संयुक्त महाराष्ट्राची मागणी पदरात पाडून घेण्याच्या दृष्टीने यशस्वी प्रयत्‍न केले.  एस. एम. जोशी यांच्यानंतर संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीचे श्रेय यशवंतरावांनाच बर्‍याच प्रमाणावर मिळते.

समितीच्या कालखंडात म्युनिसिपल व बेस्ट कामगारांचे संप मिटवून सन्माननीय तडजोड घडवून आणण्यात एस. एम. जोशी यांच्या इतकीच यशवंतरावांची मुख्यमंत्री या नात्याने मदत होत असे.  अवघ्या चार-पाच वर्षांत यशवंतरावांनी एवढी कीती्र संपादन केली की, चिनी आक्रमणाच्या संकटकाळात कृष्ण मेनन यांना राजीनामा देणे भाग पडले तेव्हा संरक्षणमंत्री म्हणून त्यांची केंद्रस्थानी निवड झाली व अशा रीतीने त्यांच्या जीवनाचा तिसरा अध्याय सुरू झाला.

यशवंतराव संरक्षणमंत्री असल्यापासून मी त्यांना जवळून पाहात आहे.  कृष्ण मेनन यांच्या बोचर्‍या व्यक्तिमत्त्वामुळे सैन्यामध्ये गटबाजीचा चंचुप्रवेश होऊ लागला होता.  यशवंतरावांच्या सौम्य व मृदू व्यक्तिमत्त्वामुळे सैन्यातील वातावरण निवळण्यास निश्चित मदत झाली.  

संरक्षण मंत्रिपदाच्या कारकीर्दीत यशवंतरावांनी सैन्य प्रबळ करण्याचे दुसरे कार्य केले.  चिनी आक्रमणामुळे भारतीय सैन्याची जी वाताहात झाली त्यामुळे संरक्षणाच्या आतापर्यंत दुर्लक्षिलेल्या प्रश्नाकडे विशेष लक्ष देणे केंद्र सरकारला भाग पडले.  मोरारजीभाईंचे नवीन अंदाजपत्रक करवाढीमुळे व अनिवार्य नव्या करयोजनेमुळे ज्याप्रमाणे वादग्रस्त बनले त्याचप्रमाणे संरक्षण खात्याच्या मागण्यात झालेल्या प्रचंड वाढीमुळेही ते गाजले.  १९६१-६२ सालच्या अंदाजपत्रकात संरक्षण खात्याचा खर्च रु.३११ कोटी होता.  म्हणजेच तो एकून सरकारी प्राप्‍तीच्या २८ टक्के इतका होता.  पुढील वर्षात १९६२-६३ च्या वित्तीय वर्षात हा खर्च रु. ३७६ कोटीपर्यंत वाढला.  पण संरक्षण खर्चात झालेल्या वाढीपेक्षा सरकारी उत्पन्न अधिक प्रमाणात वाढल्यामुळे टक्केवारीचे प्रमाण २४.९ इतके खाली आले.  पण १९६३-६४ च्या अंदाजपत्रकात संरक्षण खात्याचा खर्च रु. ८६७ कोटीपर्यंत वाढला.  म्हणजेच सरकारी उत्पन्नाचा एकूण ४१ टक्के भाग संरक्षण खात्यावर खर्च होऊ लागला.

संरक्षण खर्च एकदम एवढा वाढला असला तरी सर्व विरोधी पक्षांनी त्याचे समर्थन केले.  स्वावलंबन व अलिप्‍ततेचे धोरण चालविण्यासाठी इतकी किंमत दिलीच पाहिजे असे इंद्रजित गुप्‍ता म्हणाले.  अमेरिकेच्या काश्मीरबाबतच्या धोरणाचा त्यांनी निषेध केला हे खरे आहे.  पण वातावरण इतके बदलले होते की चीन विरुद्ध अमेरिकेने भारताला केलेल्या मदतीबद्दल गुप्‍तांनी कम्युनिस्ट असूनही आभार व्यक्त केले.  भारताची पत जगात केवढी कमी झाली होती त्याचा उल्लेख करून शारदा मुखर्जी म्हणाल्या की न्यू स्टेटसमनचे संपादक किंग्जले मार्टीन यांनी भारतीय सेना आता खतम झाल्यासारखीच आहे असे उद्‍गार काढल्याचे सभागृहाच्या निदर्शनास आणले.