आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार
श्री. यशवंतराव चव्हाण
(महाराष्ट्र शासनातर्फे आदरांजली)
महाराष्ट्र मंत्रिमंडळाने दिनांक २८ नोव्हेंबर १९८४ रोजी विशेष बैठकीत श्री. यशवंतरावजींच्या दुःखद निधनाबद्दल तीव्रतम शोकभावना व्यक्त करणारा खालील ठराव संमत केला.
भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील एक रणझुंजार सेनानी आणि स्वातंत्र्योत्तर काळात महाराष्ट्राच्या मुख्य मंत्रिपदापासून भारताच्या उपपंतप्रधानपदापर्यंतची अनेकविधपदे आपल्या कर्तबगारीने समर्थपणे भूषविणारे महाराष्ट्राचे लाडके नेते खासदार श्री. यशवंतराव बळवंतराव चव्हाण यांच्या आकस्मिक निधनाबद्दल महाराष्ट्र शासन आपल्या तीव्रतम शोकभावना व्यक्त करीत आहे.
श्री. यशवंतराव चव्हाण यांच्या निधनाने एक ज्येष्ठ मुत्सद्दी, श्रेष्ठ राजकारणी, कुशल प्रशासक आणि सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील नेता हरपला आहे. आधुनिक महाराष्ट्राच्या या शिल्पकाराच्या निधनाने केवळ महाराष्ट्राचेच नव्हे तर आपल्या सार्या देशाचेच अपरिमित नुकसान झाले आहे. श्रीमती इंदिरा गांधी यांच्या आकस्मिक निधनानंतर आपला भारत देश कठीण काळातून जात असताना यशवंतरावजी आपल्यातून निघून जावेत ही मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे. त्यांच्या निधनाने एक सुसंस्कृत, शालीन व्यक्तिमत्त्वाचे थोर व पुरोगामी नेतृत्व लोपले आहे.
श्री. यशवंतरावजींचा जन्म सांगली जिल्ह्यातील 'देवराष्ट्रे' या आपल्या आजोळी १२ मार्च १९१३ रोजी एका गरीब कुटुंबात झाला आणि आपले सारे आयुष्य त्यांनी दरिद्रीनारायणाच्या सेवेसाठी खर्च केले. वडिलांचे छत्र त्यांना फारसे लाभले नाही. चार वर्षांचे असतानाच पितृछत्र नाहीसे झाले आणि मग मातेने आणि थोरल्या बंधूंनी वडिलांच्या मायेने त्यांचे संगोपन केले. कर्हाड, पुणे, कोल्हापूर आदी ठिकाणी त्यांनी आपले बी.ए., एलएल.बी. पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. विद्यार्थिदशेत असतानाच देशात पेटलेल्या स्वातंत्र्य आंदोलनात यशवंतरावजींनी आपल्या सहकार्यांसमवेत उडी घेतली. १९३० च्या असहकाराच्या लढ्यात भाग घेतल्याने त्यांना अठरा महिन्यांची सक्तमजुरीची शिक्षा भोगावी लागली. १९४२ च्या ''छोडो भारत'' आंदोलनातही त्यांनी भाग घेतला म्हणून नोव्हेंबर १९४३ मध्ये ब्रिटिशांनी त्यांना कैद केले. १९४५ मध्ये कारावासातून त्यांची सुटका झाली. कारावासात असताना त्यांनी राजकीय तत्त्वज्ञानाचा, मार्क्सवादाचा, अभ्यास केला. मानवेंद्रनाथ रॉय यांच्या विचारसरणीचा त्यांच्या मनावर मोठा प्रभाव पडला. कारावासातील विचारमंथनातून त्यांच्या विचाराची तात्त्वि बैठक निश्चित होत गेली.
यशवंतरावजींच्या कार्याने प्रभावित झाल्याने काँग्रेस पक्षाने १९४६ सालच्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी उमेदवारीचे तिकीट त्यांना दिले आणि जनतेनेही त्यांच्या कार्याची पावती देण्यासाठी त्यांना बहुमताने निवडून दिले. तोच यशवंतरावजींच्या संसदीय कारकीर्दीचा शुभारंभ ठरला. खेर मंत्रिमंडळात ते संसदीय चिटणीस झाले. १९५२ साली ते मुंबई राज्याच्या श्री. मोरारजी देसाई यांच्या मंत्रिमंडळात नागरी पुरवठा मंत्री झाले. १९५६ साली वयाच्या ४३ व्या वर्षी ते मुंबई राज्याचे मुख्यमंत्री झाले. १९५४ सालच्या निवडणुकीनंतरही या राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी यांच्या खांद्यावर आली.
यशवंतरावजींची लोकशाहीवर नितांत निष्ठा आणि श्रद्धा होती. मराठी-गुजराती भाषिकांचे द्विभाषिक राज्य इथे असताना त्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद होते. मराठी भाषिकांचे स्वतंत्र 'महाराष्ट्र राज्य' मिळावे अशी इथल्या जनतेची तीव्र इच्छा होती. त्यासाठी आंदोलनही छेडले जात होते. अशा कठीण आणि कसोटीच्या वेळी त्यांनी मोठ्या समंजसपणे आणि संयमाने राज्यकारभार चालविला आणि इथल्या जनतेची इच्छा त्या वेळचे पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू, अखिल भारतीय काँग्रेसच्या अध्यक्षा श्रीमती इंदिरा गांधी आणि देशपातळीवरील अन्य नेत्यांच्या कानी घातली व त्यांना पटवून दिली. म्हणूनच संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश आणण्याचे भाग्य त्यांना लाभले.
महाराष्ट्र राज्याची स्थापना १ मे १९६० रोजी झाली. सारी महाराष्ट्रभूमी आनंदली. या महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री होण्याचा बहुमानही यशवंतरावजींना त्यांच्या कार्यकर्तृत्वामुळे मिळाला. त्यानंतरच्या काळात त्यांनी महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी अविश्रांत परिश्रम घेतले. महाराष्ट्राच्या कृषी, औद्योगिक आणि सहकारी क्षेत्राच्या प्रगतीसाठी त्यांनी सर्वांच्या सहकार्याने हिहिरीने प्रयत्न केले. कारण सहकारातूनच समाजवाद येईल ही त्यांची धारणा होती. या राज्याचा सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक विकास व्हावा यासाठी त्यांनी सर्वांना बरोबर घेऊन जाणीवपूर्वक, नियोजनबद्ध प्रयत्न केले. संघर्षापेक्षा समन्वय आणि वजाबाकीपेक्षा बेरीजच त्यांना अधिक प्रिय होती. या विचारसरणीमुळेच त्यांना सर्वांचे सहकार्य लाभले व महाराष्ट्र राज्याची सर्व क्षेत्रांत घोडदौडीने प्रगती झाली. कृषि-औद्योगिक समाजरचना ही त्यांची महाराष्ट्राला मिळालेली मोठी देणगी होय. मोफत शिक्षण, सहकारी साखर कारखान्यांची निर्मिती आदी अनेक क्षेत्रांत त्यांनी क्रांतिकारक पावले उचलली. त्याबद्दल महाराष्ट्र त्यांचा सदैव ॠणी राहील.