• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

यशवंतराव राष्ट्रीय व्यक्तिमत्त्व-सुसंस्कृत रसिक व्यक्तिमत्त्व-ch २६-२

'जडणघडण' या पहिल्या प्रकरणात यशवंतरावांच्या खाजगी जीवनाचे तपशील आहेत.  पुढील दोन प्रकरणांतही तसे आहेत.  पण एकुणातच, या आत्मचरित्राला खाजगी तपशिलाचे ओझे झालेले नाही.  यापाठीमागे यशवंतरावांची एक शहाणी दृष्टी आहे.  हजारो सामान्य लोकांपैकी आणि लोकांसारखेच आपण आहोत.  आपल्यात असामान्यत्व असलेच तरी त्याची व्याप्‍ती फार म्हणजे फारच कमी असते आणि शिवाय त्यात हजारो इतरांचे असामान्यत्वच एका ठिकाणी प्रकट होत असते.  सर्वसाधारणपणे व्यक्तिमत्त्वाचा प्रधान आणि मोठा भाग सामान्यांसारखा, सामान्यत्वानेच भरलेला असतो.  असे हे त्यांचे शहाणपण थोडक्यात सांगता येईल.

आपल्या लहानपणींच्या गरिबीविषयी त्यांनी लिहिले आहे :  'माझे लहानपण हे इतर लक्षावधी गरीब घरातील मुलांच्याप्रमाणे गेले आहे, म्हणून माझ्या जीवनामध्ये इतरांपेक्षा फार काही विशेष होते असे नाही.  सर्वसामान्यतः अडी-अडचणी आणि गरिबी यालाच तेव्हा जीवन असे नाव होते.'

यशवंतरावांच्या या दुर्मिळ संयमगुणामुळे हे आत्मचरित्र 'रोमँटिक' होण्यापासून बचावले आहे.  यशवंतरावांची एक विशिष्ट वेचक दृष्टी आहे.  लहानपण, शिक्षण, मैत्री, कुटुंब.  अगदी सामाजिक कार्य, वकिली, राजकीय चळवळी- अशा सार्‍या अनुभवात एक महत्त्म साधारण विभाजक असतो.  हा 'मसावि' प्रत्येक अनुभवातून त्यांनी 'कॉमन' म्हणून काढून टाकला आहे.  त्याचा केवळ जुजबी उल्लेख केला आहे.  पण त्यातून जो विचाराचा, भाष्याचा, तत्त्वाचा 'लसावि' मिळाला तो आवर्जून आणि तपशिलवार सांगितला आहे.  अभिजात वृत्तीचेच हे एक वैशिष्ट्य असते.  यशवंतरावांच्या अनुभव घेण्यात ही अभिजात वृत्ती आहे.  लेखनात तर आहेच.  म्हणून हे आत्मचरित्रही अभिजात वृत्तीचे झाले आहे.

अशी काही भाष्ये महत्त्वाची आहेत.

स्वतःच्या लहानपणीच्या जगाचे-ग्रामीण जगाचे-त्यांचे निरीक्षण पाहावे :  'शासनाला भीतीने नमून वागण्याचीही प्रवृत्ती त्या वेळच्या जीवनाचे एक गृहीतकृत्य होते.  शिक्षण कमी, बाहेरच्या जगाशी संपर्क कमी, आहे त्यात समाधान मानण्याची वृत्ती, कुणाच्या अध्यात मध्यात न पडावे, असे तटस्थ राहावे हे धोरण हीच तेथल्या जीवनाची रीत होती.  त्यामुळे त्यात गतीही नव्हती आणि 'प्रगतीही नव्हती'.  पुढे ते असे म्हणतात- 'शेतीशी संबंध असलेला माणूस नजीकच्या राजकीय सत्तेला फार वरिष्ठ मानतो.

यशवंतरावांची ही निरीक्षणे सामाजिक इतिहासकाराच्या दृष्टीने महत्त्वाची आहेत.  त्यात व्यक्त होणारी चिकित्सक, विवेकी दृष्टी त्यांच्याजवळ मूळचीच दिसते.  मराठी सातवीत शिकत असताना, म्हणजे वयाच्या तेराव्या वर्षी त्यांनी दिनकरराव जवळकरांचे भाषण ऐकले.  ते ऐकल्यावर त्यांची त्या वयात जी प्रतिक्रिया झाली ती त्यांच्याच शब्दात वाचण्यासाठी आहे.  ते लिहितात - 'श्री. जवळकरांनी टिळकांच्यावर केलेली टीका ही बरोबर नव्हती असे माझ्या मनाने घेतले.  कारण तोपर्यंत मी थोडेफार वाचू लागलो होतो.  लोकमान्य टिळक हे इंग्रजांविरुद्ध लढणारे एक सेनापती आहेत, अशी माझी भावना होती.... त्यानंतर तेव्हा मी या संकुचित आणि दूषित क्षेत्रातून प्रयत्‍न करून बाहेर पडलो.'  पुण्याचे 'विजयी मराठा' आणि बेळगावचे 'राष्ट्रगीत' या केवळ मराठा चळवळीच्या वृत्तपत्रांच्या जोडीने आपण पुण्याचे 'मजूर' व मुंबईचे 'श्रद्धानंद' वाचू लागलो, अशी नोंद त्यांनी केली आहे.

विवेकाने बघायचे, वाचायचे, विचारपूर्वक 'निवड' करायची, त्या निवडीची दिशा धरायची ही एक पद्धतच यशवंतरावांनी तेव्हापासून अंगी बाणविलेली दिसते.

'ब्राह्मणेतर चळवळीच्या संकुचित दृष्टिकोणातून बाहेर पडून काही केले पाहिजे' हा त्यांच्या सामाजिक-राजकीय जाणिवेचा पहिला प्रगतीचा टप्पा त्यांनी शाळकरी जीवनातच गाठला.  सार्‍या देशासाठी आपण काम करावे हा त्यांचा निश्चय झाला तो जतीन्द्र दासांनी आमरण उपोषण करून शेवटी हुतात्म्यापद घेतले त्या क्षणापासून.  'मला आयुष्याचे सार समजले व सूर सापडला,' असे त्यांनी म्हटले आहे.

देशासाठी काम करायचे. त्यासाठी वैचारिक भूमिका कोणती घ्यायची, हा प्रश्न त्यांच्या पहिल्या, पंधरा महिन्यांच्या तुरुंगवासाने सोडवला.  आचार्य भागवत ज्याचे कुलगुरू होते अशा त्या मुक्त विद्यापीठातून स्नातक होऊन बाहेर पडताना त्यांची धारणा अशी झाली होती की, 'गौतम बुद्ध आणि येशू ख्रिस्त यांच्यानंतर एवढ्या मोठ्या मानवसमाजाच्या जीवनपद्धतीवर परिणाम करणारा कोणी एक तत्त्ववेत्ता झाला असेल, तर तो मार्क्सच, हे कबूल करावे लागेल.'