• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

यशवंतराव राष्ट्रीय व्यक्तिमत्त्व-सुसंस्कृत रसिक व्यक्तिमत्त्व-ch २४

२४. एक अतूट नाते (राम खांडेकर)

श्री. यशवंतराव चव्हाण व महाराष्ट्र यांचे अतूट नाते होते.  दोघांनाही एकमेकापासून दूर करणे कठीण आहे.  १९५६ साली द्वि-भाषिक मुंबई राज्याचे व १९६० साली महाराष्ट्र राज्याचे मुख्य मंत्रिपद स्वीकारल्यानंतर त्यांनी महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाठी स्वतःला वाहून घेतले.  उद्योगाचे क्षेत्र, साहित्याचे क्षेत्र महाराष्ट्रात बाळसे धरू लागले.  त्याची जोपासना होऊ लागली आणि दिवसेंदिवस त्यात प्रगती होत गेली.  आपल्या अडी-अडचणींकडे राज्याचे लक्ष आहे याची जाणीव प्रत्येकाला होऊ लागली.  परंतु हा जगन्नाथाचा रथ पुढे सरकत असतानाच या सारथ्याला देशरक्षणासाठी दिल्लीस जावे लागले.  परंतु यशवंतराव शरीराने दिल्लीत असले तरी ते नेहमीच मनाने महाराष्ट्रात राहिले.  महाराष्ट्रानेही त्यांना नेहमीच प्रेम दिले आणि पाठिंबा दिला.  स्वातंत्र्यप्राप्‍तीनंतर अगदी खर्‍या अर्थाने महाराष्ट्राने आपला प्रतिनिधी दिल्लीत पाठविला होता.  यशवंतरावांना याची पूर्ण जाणीव होती.  म्हणूनच साधारणतः पंधरा दिवसांतून एकदा तरी ते महाराष्ट्रात आले नाहीत असे कधीच झाले नाही.  महाराष्ट्रातील भूमिपूजन, उद्धाटन, संमेलने, शिबिरे यशवंतरावांच्या हजेरीशिवाय पूर्ण होत नव्हती.  त्यांची ते नेहमीच वाट पाहावयाचे.  यशवंतराव केवळ केन्द्रीय मंत्री, महाराष्ट्राचे प्रतिनिधी होते म्हणून नव्हे तर त्यांच्या प्रत्येक भाषणात काही विचार असायचा.  आपण हा विचार देऊ शकलो नाही तर भाषण करण्यात अर्थ नाही असेच ते म्ळणावयाचे.  म्हणूनच ही शिदोरी मिळावी म्हणून महाराष्ट्रातील जनता त्यांची आतुरतेने वाट पाहावयाची.  कराड येथील साहित्य संमेलनात त्यांनी स्पष्ट सांगितले होते की, मी मंत्री म्हणून इथे आलो नाही.  मंत्रिपदाची वस्त्रं बाहेर ठेवून मी आलो आहे.  ज्या साहित्यिकांची आपण पुस्तके वाचतो ते कसे आहेत हे प्रत्यक्ष बघावे म्हणून आलो आहे.  विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी आलो आहे.  यशवंतराव महाराष्ट्रातील प्रेक्षणीय स्थळांना वारंवार भेट देत असत.  अजंठा-वेरूळाची लेणी त्यांनी अनेकदा मोठ्या आवडीने पाहिली आहेत.  त्याचबरोबर महाराष्ट्रातील देवी-देवतांची दर्शनेही त्यांनी वारंवार घेतली आहेत.  शिर्डीचे साईबाबा, तुळजापूर, प्रतापगडावरील देवी, पंढरपूरचा पांडुरंग ही यशवंतरावांची पूजनीय देवस्थाने.

१९६२ साली यशवंतराव दिल्लीत आल्यानंतर यशवंतरावांचे निवासस्थान १ रेसकोर्स रोडे हे महाराष्ट्रातील लोकांकरिता तीर्थस्थान झाले होते.  बहुतेक रोज सकाळी ९ वाजता १५-२० लोकांपासून तो १५०-२०० लोकापर्यंत पर्यटक यशवंतरावांचे दर्शन घेण्यास तिथे असावयाचे.  यात लहान मुले असावयाची, वृद्ध मंडळीही असायची.  ही मंडळी हात जोडून शांत बसलेली असायची.  काही तर निरोप घेताना त्यांच्या पाया पडायची.  यशवंतरावांबरोबर फोटो काढला म्हणजे त्यांना आपल्या भेटीचे सार्थक झाल्यासारखे वाटावयाचे.

यशवंतरावांना दिल्लीत राजकीय मंडळींबरोबर इतर क्षेत्रांतील मंडळीही भेटावयाची.  यशवंतरावांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दिल्लीत येऊन भेटले नाहीत असे कधीच झाले नाही.  स्व. दादासाहेब कन्नमवार तर यशवंतरावांकडेच उतरावयाचे.  परंतु इतर राज्यांचे मुख्यमंत्री पण अधूनमधून यशवंतरावांना भेटत होते.  ही भेट ५-१० मिनिटे नसायची तर जवळपास अर्धा अर्धा तास असायची.  राज्यातील प्रश्नांबाबत यशवंतरावांचा सल्ला त्यांना फार उपयोगी पडायचा.  महाराष्ट्रातील संसद-सदस्य तर त्यांना अधूनमधून भेटत असत.  राज्यातील, देशातील परिस्थितीबाबतही चर्चा करीत असत.  त्याचबरोबर इतर प्रांतांतील संसद-सदस्यही त्यांची गाठ घेत असत.

दिल्लीतील महाराष्ट्रीयनांना व महाराष्ट्रीय संस्थांना यशवंतराव व त्यांचे निवासस्थान आपल्या हक्काचे झाले होते.  दिल्ली महाराष्ट्रीय एज्युकेशन सोसायटीचे यशवंतराव अध्यक्ष होते.  बृहन्महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते.

दिल्लीत येणार्‍या साहित्यिकांना व संगीत कलाकारांना यशवंतरावांचे घर माहेरघर वाटत होते.  यशवंतराव सायंकाळी ७ नंतर ऑफिसमधून आल्यानंतर या लोकांशी मनमोकळेपणाने गप्पा मारीत असत.  ७-३० ते ९ पर्यन्तचा यशवंतरावांचा वेळ केवळ याच विरंगुळ्यासाठी होता.  या वेळी भेटणार्‍यांना वेळचे बंधन टाकण्यात येत नसे.  ९ वाजता मात्र यशवंतराव उठून जात.  ती वेळ सौ. वेणूताईंची जेवावयाची होती.  यशवंतरावांच्या निवासस्थानी अनेक संगीत मैफली पण झाल्या आहेत.  यशवंतराव साहित्यिक व कलाकार यांना मोठ्या जिव्हाळ्याने भेटत.  त्यांच्यासाठी काही करता आले तर ते करण्यात त्यांना आनंद वाटे.  मृत्यूपूर्वी काही दिवस अगोदरच त्यांनी शिक्षणमंत्री, भारत सरकार, श्रीमती शीला कौल यांना पत्र लिहून हिराबाई बडोदेकर यांना न मागता मानदेय देण्याची व्यवस्था करणे योग्य होईल अशा आशयाचे पत्र लिहिले होते.  त्यांचा पाठपुरावाही केला होता.

त्यांचे हे अतूट नाते ते सत्तेवर नसतानाही राहिले.  ते मंत्री नसतानाही त्यांनी अनेक उद्धाटन सोहळ्यांत भाग घेतला.  अनेक व्याख्यानमाला गुंफल्या.  साहित्यिक मेळाव्यात ते गेले.  स्वातंत्र्याप्राप्‍तीनंतर महाराष्ट्राने ज्याचा उदोउदो केला त्यात यशवंतरावांचे स्थान अग्रभागी आहे.