कराड येथील साहित्य संमेलनाच्या वेळी संमेलनाच्या अखेरच्या रात्री त्यांच्या निवासस्थानी काव्यवाचनाची सुरेख बैठक जमली. काव्यश्रवणात ते रमले. पु.ल. देशपांडे, रणजित देसाई, नरहर कुरुंदकर, महानोर, वसंत बापट या मंडळींच्या सहवासात त्यांनी काव्यानंद आणि साहित्यानंद मनमुराद लुटला. पहाटेपर्यंत ही मैफिल रंगली.
राजकवी यशवंतरावांना 'महाराष्ट्र कवी'चा बहुमान त्यांनीच शासनाच्या वतीनं दिला. महाराष्ट्र कवींच्या 'शिवराय महाकाव्या'चा प्रकाशन-समारंभ यशवंतरावांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. कवी यशवंतांना मानधन यशवंतरावांनीच सुरू केले. त्यांच्या साहित्यप्रेमाला अशी कृतीची जोड असे.
ना. सी. फडके यांनाही त्यांनीच मानधन सुरू केलं. 'युगप्रवर्तक फडके' या कार्यक्रमालाही यशवंतराव अध्यक्ष म्हणून आले. त्या वेळच्या आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी ना. सी. फडके यांच्या साहित्यसंभाराची अत्यंत समर्पक शब्दांत भलावणी केली. परंतु शेवटी त्यांच्या खास पद्धतीनुसार एक नवा साहित्य-विचार प्रसृत केला. यशवंतराव म्हणाले, ''कोणत्याही साहित्यिकाला युगप्रवर्तक म्हणणं कठीण आहे. कारण कोणत्याही व्यक्तीच्यामानानं 'युग' हे फार मोठं, लांबलचक असतं. साहित्यिक कितीही थोर असला, मोठा असला तरी त्या साहित्यिकाच्या कर्तृत्वानं त्या युगाला बांधून ठेवता येणार नाही.''
यशवंतरावांच्या या बोलण्यामुळे आप्पासाहेबांना थोडाफार घुस्सा आलाही असेल. पण केवळ तोंडदेखलं बोलण्यापेक्षा यशवंतरावजींना साहित्याची शक्ती कथन करतानयशवंतरावांच्या या बोलण्यामुळे आप्पासाहेबांना थोडाफार घुस्सा आलाही असेल. पण केवळ तोंडदेखलं बोलण्यापेक्षा यशवंतरावजींना साहित्याची शक्ती कथन करताना एक नवा विचार मांडायचा हाता, तो त्यांनी मांडला एवढंच !
स्वतःच्या बाबतही ते तितकेच काटेकोर होते. त्यांच्या पत्नी वेणूताई यांचं छोटेखानी चरित्र रामभाऊ जोशी यांनी लिहिलं. १९८४ च्या जुलै महिन्यात त्या चरित्राचा प्रकाशन-समारंभ कर्हाडला झाला. त्यांनी त्या प्रकाशन-समारंभाचं अध्यक्ष मला बनवलं. तर्कतीर्थांच्या हस्ते प्रकाशन-समारंभ झाला. यशवंतरावजी प्रेक्षकांत एका बाजूला स्वस्थ बसले होते. कोणत्याही प्रसंगी औचित्य किमपि न सोडण्याचा त्यांचा हा स्वभावधर्म सर्जनशील साहित्यातच जमा करावा लागेल.
यशवंतराव महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. तदनंतर संरक्षणमंत्री म्हणून पं. नेहरूंनी त्यांना दिल्लीला बोलावून घेतलं. तेव्हा त्यांच्यावर फार मोठी जबाबदारी पडली. महाराष्ट्रातील त्यांच्या संचाराला मर्यादा पडल्या. प्रा. ना.सी. फडके यांनी त्यांच्यावर नंतर एक लेख लिहिला होता. त्या लेखात फडके लिहितात, ''भावनेनं ओथंबलेलं, प्रभावी भाषेनं नटलेलं लेखन जी लेखणी करू शकते ती साधीसुधी लेखणी नाही. जेष्ठ दर्जाच्या अस्सल साहित्यिकाच्या हातात शोभावी अशीच ती आहे.... यशवंतरावांच्या लिखाणाचा आस्वाद मी जेव्हा जेव्हा घेतो तेव्हा तेव्हा माझ्या मनात येतं, यशवंतरावांच्या रूपानं महाराष्ट्राला आणि भारताला एक पहिल्या दर्जाचा नेता मिळाला खरा. परंतु त्यांच्यावर पडलेल्या नेतेपणाच्या ओझ्यामुळे यशवंतरावांच्या ठिकाणी जो श्रेष्ठ साहित्यिक आहे त्याचं पूर्ण कर्तृत्व प्रकट होत नाही, ही खेदाची गोष्ट म्हणावी लागेल. असं जरी असलं तरी भावी काळात त्यांच्यावरच प्रचंड साहित्य निर्माण होईल याबद्दल मला तिळमात्र शंका नाही.''
एका श्रेष्ठ साहित्यकाराचं हे भाकीत आज खरं ठरू पाहात आहे.
१९८५ सालचे मराठी साहित्य संमेलन नांदेड येथे भरणार असल्याचं ठरलं. त्या संमेलनाच्या अध्यक्षपदाचा मान यशवंतरावजींना देण्याचं घाटत होतं. महाराष्ट्रातून निरोप गेले होते. यशवंतराव या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झालेही असते. पण त्यामुळे ते साहित्यक्षेत्रात जानेमाने ठरले असते असं थोडंच आहे ? इथे तर त्यांच्या ठायी होती साहित्यक्षेत्रातील स्वयमेव मृगेन्द्रता !