ही सारी हकिगत सांगून ते म्हणाले होते, ''मी माळगावकरांचं 'कान्होजी आंग्रे' हे चरित्र पूर्वीच वाचलं होते. 'प्रिन्सेस' वाचून तर मी थक्कच झालो. म्हणून म्हटलं की, प्रिन्सेसचं भाषांतर करणं ही फार अवघड गोष्ट आहे.''
'प्रिन्सेस' वाचूनच केवळा हा हाडाचा साहित्यिक थांबला नव्हता. तर माळगावकरांचा राहण्याचा, जगलबेटचा पत्ता काढून यशवंतरावांनी त्यांना दिल्लीला भेटीसाठी बोलावून घेतलं आणि त्यांच्याशी साहित्याबद्दल खूप सविस्तर चर्चा केली.
२२ मार्च १९६७ रोजी 'प्रिन्सेस' च्या प्रकाशनासाठी यशवंतराव दिल्लीहून मुद्दाम पुण्याला आले. एका भाषांतरित कादंबरीच्या प्रकाशनासाठी संरक्षणमंत्र्यानं दिल्लीहून मुद्दाम पुण्याला यावं, याबद्दल त्यांच्यावर काही वर्तमानपत्रांतून थोडी टीकाही झाली. त्या टीकेला उत्तर देताना यशवंतराव आपल्या भाषणात प्रथमच म्हणाले, ''माझ्यावर झालेली टीका मला माहीत आहे. मी या प्रकाशनासाठी का आलो हे सांगतो. माळगावकर हे महाराष्ट्रीयन लेखक जगविख्यात झाले आहेत. त्यांच्या कादंबरीचं भाषांतर माझ्या मित्रानं केलं. माझा मित्रही मराठी माणूसच ! मग माझ्यासारखा मराठी माणूस या प्रकाशनासाठी आला तर त्यात आश्चर्य काय ? मीच योग्य आहे त्यासाठी !''
त्या वेळी यशवंतरावांनी आपल्या भाषणात एक नवाच साहित्यविषयक मुद्दा मांडला. भल्याभल्यांना तो मांडता आला नसता. यशवंतरावांचा खरा साहित्यिक पिंड दिसला तो त्या ठिकाणी ! प्रिन्सेसच्या भाषांतराबद्दल बोलताना ते म्हणाले, ''स्वतंत्र लिखाण करण्यापेक्षा भाषांतर करणं हे फार अवघड आहे. कारण भाषांतरकाराला मूख लेखकानं निर्माण केलेल्या व्यक्तिरेखांच्या भावभावनांच्या तळाशी जावं लागतं. ही फार अवघड गोष्ट आहे. भाषांतरकर्त्यानं ती गोष्ट यशस्वीरीतीनं पार पाडलेली आहे.''
भाषांतरकाराला दुबार परकायाप्रवेश करावा लागतो, ही गोष्ट साहित्यशास्त्रातला मर्मज्ञच सांगू शकेल. यशवंतरावांनी ती गोष्ट आपल्या भाषणात अचूक टिपली.
कोणत्याही साहित्यविषयक लेखनात, वाचनात किंवा बोलण्यात अशा मार्मिक गोष्टी अचूक टिपण्यात तर त्यांचा हातखंडा होता. म्हणूनच अत्यंत आटोपशीर लेखन ते त्यांचं वैशिष्ट्य बनलं असावं. 'अमृतपुत्र' आणि 'हिरोशिमा' या माझ्या दोन मोठ्या कादंबर्यांना यशवंतरावजींनी प्रस्तावना लिहिल्या त्या अवघ्या चार-पाच पृष्ठांच्या ! कुणालाही प्रथम वाटावं की, केवळ उपचार म्हणून लेखकाच्या समजुतीखातर या प्रस्तावना लिहिलेल्या आहेत ! पण जेव्हा ते लेखन आपण बारकाईनं वाचतो तेव्हा त्या छोट्या प्रस्तावनालेखनात कसलीही त्रुटी नाही, हे आपल्या ध्यानात येतं. त्यांच्या या अद्भुत लेखनशैलीची भावी टीककारांना आवर्जून दखल घ्यावी लागेल.
मॉस्कोला टॉलस्टॉयच्या स्मारकाला भेट दिल्यानंतर त्यांनी लिहिलेल्या 'शांतिचितेचे भस्म' हा लेख किंवा ग. दि. माडगूळकरांवर लिहिलेला 'पापण्यात गोठविली नदी आसवांची' हे दोनच वानगीदाखल लेख बघावेत. एरवी अत्यंत संयमी आणि समतोल विचाराचा राजकारणी पुरुष हा बघता बघता भावनाकुल असा साहित्यिक बनतो. परंतु त्याही ठिकाणी अत्यंत भावनाविवश साहित्यकाराप्रमाणे आपल्या आसवांची नदी दुथडी भरून टाकीत नाही तर त्या आसवांना पापण्यांचा बांध घालतो. खर्या अर्थानं त्यांना संयमी पुरुष असंच म्हणावं लागेल.
'कृष्णाकाठ' या त्यांच्या आत्मचरित्राचा पहिला भाग साकार होताना अनेकांनी बघितला असेल. त्याबद्दल अनेक लोकांशी ते बोलत होते. त्या लेखनात संयम तर होताच पण आत्मचरित्र लिहिताना त्यात कुणाला काही खुपू नये, हा सावधपणाही होता. आत्मचरित्रात कित्येक लेखन आत्मसमर्थन करतात. लोकांचे हेवेदावे उगवून घेतात, आपली प्रतिमा आहे त्यापेक्षा अधिक उजळून टाकण्याचा प्रयत्न करतात. 'कृष्णाकाठ' मध्ये यांपैकी काहीही दिसणार नाही. वास्तवाचं चित्र अत्यंत संयमानं, सावधपणानं पण तितक्याच उत्कटपणानं रेखाटलेलं दिसेल. त्यात कडवटपणा कुठेही दिसणार नाही. स्वतःचा भलेपणा कुठेही आढळणार नाही. त्यांच्या आत्मचरित्राचे 'सागरतळी' आणि यमुनातटी' हे पुढचे दोन भाग पुरे होऊ शकले नाहीत, हे मराठी सारस्वताचं दुर्भाग्य म्हणावं लागेल. कोणतेही कंगोरे नसलेलं समघात, संयमशील मनाचं ते चित्रण बघायला मिळालं असतं तर आत्मचरित्रांचं दालन फार समृद्ध ठरलं असतं.