केव्हा तरी आमदार म्हणून सभागृहात मी काही बोललो तर त्यांच्या मूळ कल्पना, विचार नंतर भेटीत ते बोलून दाखवीत. पदरात फार कमी पडतं. ह्या सगळ्या संस्था स्थापण्यातला हेतू, त्यापासून आपण दूर जातो, किंवा पसरट काही तरी करीत असतो ही खंत त्यांना होती.
हेच चव्हाणसाहेब साहित्यिकांच्या व्यासपीठावरून बोलत, नितळ रसिक साहित्यिक वाणीनं असं बोलत, तेव्हा त्यांचे राजकीय कपडे, त्या दृष्टीने त्यांच्याकडे पाहणं, इत्यादी बदललं पाहिजे, असं अनोळखी साहित्यिक मग जवळ आल्यावर, ऐकल्यावर म्हणत. साहित्यावर अपार प्रेम व जिव्हाळा, साहित्य संस्था, संमेलन इत्यादीविषयी त्यांना खूप अंतःकरणापासून आतून वाटायचं ते त्यासंबंधी सर्व काही करायला तयार असत.
मी काव्यवाचनाला १९८३ मध्ये दिल्लीत २६ जानेवारीला गेलो होतो. त्याच दिवशी नंतर सायंकाळी चव्हाणसाहेबांच्या घरी साधा परंतु फार मोठा व नेटका काव्यवाचनाचा कार्यक्रम त्यांनी घडवून आणला. अशोक जैन ह्यांनी 'केसरात भिजलेली एक अविस्मरणीय संध्याकाळ' असं त्याचं वर्णन केलं आहे. दिल्लीतले मराठी मंत्री, खासदार, न्यायमूर्ती, महाराष्ट्रातले सचीव, पत्रकार, साहित्यिक असे सर्व उपस्थित होते. 'खेड्यातली मराठी कविता' असे आठ-दहा कवी मी वाचले. चव्हाणसाहेब मुद्दाम समोर बसले. माझ्याजवळ मागं वसंतदादा, सर्वोच्च न्यायमूर्ती यशवंतराव चंद्रचूड यांना सन्मानार्थ बसविले. बहिणाबाई चौधरी, बालकवी, पुन्हा नव्यानं ऐकल्याचा आनंद. दोन तास झकास काव्यवाचन झालं. रात्री चव्हाणसाहेब पुन्हा कवितेवर आले व म्हणाले, बी. रघुनाथ, ना. घ. देशपांडे, भालचंद्र लोकलेकर हे फारसे माहीत नसलेले कवी तुम्ही अशा पद्धतीने वाचले व त्यांच्या कविताही इतक्या सुंदर आहेत की मी तेव्हापासून त्यांच्या ओळीमध्ये गुरफटलेला आहे. मला त्यांच्या पुस्तकांची नावं सांगा. मी म्हणालो ना. घं. ची पुस्तकं मी पाठवितो. उरलेल्यांची पुस्तकं नाहीत. माझा छापण्याचा विचार आहे. ते म्हणाले की मराठी प्रकाशकांना आता काय सांगावं ? मग चव्हाणसाहेब म्हणाले की, तुमच्याजवळ असलेल्या त्यांच्या कविता तरी मला द्या. मला पुन्हा पुन्हा वाचायला फार आवडेल. केवळे प्रतिभावंत कवी ज्यांचे फार नाव झाले नाही. असे पुन्हा पुन्हा दुःख, कळकळ. मग मी. बी. रघुनाथांची ''उन्हात बसली न्हात'' व भालचंद्र लोकलेकरांची ''चोरलं काठ, पाऊल वाट'' अशा कविता पुन्हा त्यांच्या इच्छेसाठी म्हटल्या. तेव्हा घरातून वेणूताई आणखी माझी पत्नी ह्यांना साहेबांनी मुद्दाम बोलवून घेतले व पुन्हा रात्र कवितेची केली.