• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

यशवंतराव राष्ट्रीय व्यक्तिमत्त्व-चरित्र व संपन्न व्यक्तिमत्त्व-ch ७-३

काँग्रेस प्रवेशानंतर यशवंतरावांवरील मनावरचं ओझं हलकं झालं.  त्यांच्या पाठीराख्यांना त्यानी प्रवाहात आणून सोडलं.  यशवंतरावांनी या कालावधीत आत्मचरित्राचा आराखडा तयार केला.  आत्मचरित्र तीन खंडांत प्रकाशित करण्याचे ठरविले.  पहिल्या खंडाची रूपरेषा तयार केल्यानंतर त्यांनी जवळपास ३-४ महिने सतत बसून आत्मचरित्र डिक्टेट केले.  त्याचा प्रारूप तपासला.  हा कालावधी अर्थ आयोगाची सूत्रे हाती घेतली त्याच्या सुरुवातीचा होता.  आत्मचरित्राची पाने तयार झाली की ती ते सौ. वेणूताईंना वाचून दाखवीत.  सौ. वेणूताईंची प्रेरणा त्यांचे आत्मचरित्र पूर्ण करण्यास शक्ती देत होती.  आत्मचरित्र प्रकाशित झालं परंतु त्यांच्या आत्मचरित्राचे महाराष्ट्रात स्वागत होत होतं तेव्हा यशवंतराव दुःखाच्या दाट छायेत वावरत होते.  तसं पाहिलं तर अर्थ आयोगाची जबाबदारी स्वीकारण्यास यशवंतराव फारसे उत्सुक नव्हते.  पण नेत्यांचे आदेश केवळ दोन तासांत विचार करून निर्णय द्यायचा होता.  

यशवंतरावांनी सर्व परिस्थितीचा विचार करून होकार कळविला.  अर्थआयोगाचे काम पहिल्या ४-५ महिन्यांत फारसे नव्हते.  परंतु ते सुरू झाल्यानंतर यशवंतरावांना एकसारखे कौटुंबिक धक्के बसू लागले.  १९८३ च्या मार्च महिन्यातील त्यांच्या वाढदिवसाची तयारी सुरू असतानाच त्यांचा पुतण्या - डॉ. विक्रम चव्हाण ऊर्फ राजा याच्या अपघाती निधनाची बातमी दिल्लीत धडकली.  त्यांच्या निधनाचे दुःख चव्हाण दांपत्याला अतिशय झाले.  कारण या पिढीत एवढा शिकलेला हा त्यांचा एकच पुतण्या.  यशवंतरावांचे स्वप्न त्याने साकार केले होते.  ते पुण्यास त्याच्या अंत्यविधीसाठी गेले आणि तिथे जमलेला अफाट जनसमुदाय पाहून त्यांना आपल्या पुतण्याच्या लोकसंपर्काची व जनसेवेची प्रथम कल्पना आली.  ते पाहून त्यांना झालेले दुःख शब्दांत व्यक्त करता येणार नाही.  सौ. वेणूताईंनी तर धसकाच घेतला.  कर्तृत्ववान तरुण पुतण्या गेला व त्याची तरुण पत्‍नी विधवा झाली.  तिची दोन मुले तीही लहान.  या कल्पनेने त्यांचे मन सुन्न झाले.  त्यांच्या डोळ्यातील अश्रू आटेनात.  याच वेळी दिल्लीत त्यांच्या निवासस्थानी महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सतर्फे दिल्लीतील महाराष्ट्रीयनांचा मेळावा भरला होता.  सौ. वेणूताईंनी यशवंतरावांना विनंती केली, साहेब मला बाहेर येण्याचा आग्रह करू नका.  नकली हसू आणून चार लोकांत मिसळणे मला शक्य नाही.  यशवंतरावांनी पण याला मान्यता दिली.  जमलेल्या लोकांना या दुःखाची कल्पना नसल्यामुळे किंवा ती येण्याची शक्यता नसल्यामुळे सौ. वेणूताईंची प्रकृती ठीक नाही असेच सांगण्यात आले.  हे दुःख इतके होते की सौ. वेणूताईंची प्रकृती हळूहळू खालावत गेली.  केवळ औषधावर जगणार्‍या वेणूताई पहाडाएवढं दुःख कसे सहन करणार ?  त्यातच त्या ४-५ दिवस आजारी पडल्या आणि १ जून १९८३ रोजी सकाळी ११-३० च्या सुमारास त्यांची प्राणज्योत यशवंतरावांच्या मांडीवर मालवली.  अर्थ आयोगाची जबाबदारी स्वीकारल्यापासून त्यांच्यावर एकामागून एक येणार्‍या दुःखाचा हा जबरदस्त फटका होता.  यशवंतरावांनी त्यांचा पार्थिव देह खाली ठेवला.  बाहेरच्या हॉलमध्ये म्लान वदनाने बाजूला बसून राहिले.  मंत्री, राष्ट्रपती येऊन आपली श्रद्धांजली वाहून गेले.  पण यशवंतरावांच्या डोळ्यातून एक टिपूस पाणी आले नाही.  मी सौ. वेणूताईंच्या निधनाची बातमी ऐकताच तातडीने तिथे गेलो.  मला पाहताच साहेब म्हणाले, ''खांडेकर, बाई गेल्या हो !''  त्यांच्याकडे पाहण्याची माझी हिम्मत झाली नाही.  पाचच्या सुमारास सौ. वेणूताईंचा मृतदेह मुंबईस विमानाने नेण्यासाठी बाहेर काढला.  त्या वेळीही साहेब न रडता सर्वांचा हात जोडून निरोप घेत होते.  मनात येत होते साहेबांच्या डोळ्यांतील अश्रूंना वाट मिळवून देण्याचे काम कोणी तरी केले पाहिजे.  कॉलेजात असताना एक कविता वाचली होती तिची तीव्रतेने आठवण झाली.  एका सैनिकाचा मृतदेह त्याच गावी आणला जातो.  तो पाहून त्याची पत्‍नी हंबरडा फोडेल असे सर्वांना वाटत होते.  पण झाले उलटेच.  तो देह पाहून ती शांत बसलेली.  या स्थितीत बराच वेळ गेला.  जमलेल्या लोकांनी तिने रडावे म्हणून अनेक प्रयत्‍न केले.  ती रडल्याशिवाय तिचे दुःख कमी होणार नाही याची सर्वांना खात्री होती.  ती रडल्याशिवाय मृतदेह बाहेर नेणे योग्य वाटेना.  शेवटी एका वृद्ध स्त्रीने तिच्या लहान मुलाला तिच्या मांडीवर ठेवले आणि त्याच क्षणी त्या स्त्रीने हंबरडा फोडला.  यशवंतरावांनी असेच आपले दुःख दाबून ठेवले.  त्यानंतर १०-१२ दिवस ते मुंबईत अंत्यविधी व इतर विधीसाठी असेपर्यंत फारसे रडू शकले नाहीत.  आपले दुःख दाबून ठेवले.  सर्व विधीनंतर सौ. वेणूताईंच्या अस्थी गंगेच्या पवित्र पाण्यात विसर्जिण्यासाठी हरिद्वारला नेण्यासाठी दिल्लीला बंगल्यात आणल्या आणि यशवंतरावजींच्या नजरेसमोर पूर्वीचा इतिहास उभा राहिला.  त्यांनी खरोखरच हंबरडा फोडला आणि डोळ्यातून गंगा यमुना येऊ लागल्या, त्या कधी आटल्याच नाहीत.  १९७७ च्या काँग्रेस पराभवानंतर यशवंतरावजींच्या राजकीय जीवनाला जशी आहोटी लागली तशीच त्यांच्या वैयक्तिक जीवनातही लागली होती.  १९७७ च्या डिसेंबरमध्ये त्यांचे उजवे हात आणि ज्यांचा यशवंतरावजींच्या यशात फार मोठा वाटा होता ते श्री. श्रीपाद डोंगरे- यशवंतरावजींचे निजी सचिव, सर्वांना सोडून गेले.  १९८० च्या सुरुवातीस ऐन निवडणुकीच्या धामधुमीत ज्या वेळी यशवंतरावजींचे पुढारीपण पैज लावून होते त्या वेळी त्यांच्या जिल्ह्यातील पक्षाचे व यशवंतरावजींचे काम पाहणारे यशवंतरावजींचे डावे हात श्री. आबासाहेब ऊर्फ किसन वीर त्यांना सोडून गेले.