• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

यशवंतराव राष्ट्रीय व्यक्तिमत्त्व-चरित्र व संपन्न व्यक्तिमत्त्व-ch ६

६. 'समन्वयी' साहेब (काशीनाथ पोतदार)

''हो सकता है, यशवंतरावजी ऍटली जैसे अच्छे पंतप्रधान बने'' जयप्रकाश खाजगी बैठकीत सहज बोलून गेले.  चव्हाणांचे नाव संभाव्य पंतप्रधानांच्या यादीत कित्येक वर्षे झळकत होते.  जयप्रकाश नारायण तर जाहीरपणे सुद्धा तसे म्हणाले.  संयत, सुसंस्कृत, विचारी, कृतिशील नि जनतेबद्दल उपजत जिव्हाळा असलेल्या यशवंतरावांबद्दल अनादर असलेली मंडळी क्वचित.  त्याच्या राजकीय धोरणाबद्दल मतभेद असलेली माणसे पुष्कळ; बुचकळ्यात पडलेली तर विपुल.  मोहिनी मंत्राचा गोष्टीतल्या अलगूजवाल्याप्रमाणे उपयोग करणार्‍या व्यक्तिमत्त्वाची बहुतेक देशांना भुरळ पडते.  अशा भुलवय्या नेत्यांची शेकडो उदाहरणे आढळतात.  हिटलर, मुसोलिनी सोडाच, या देशात देखील थोडासा अनुभव आपण घेतलाच आहे.  तेव्हा मोहक, दिव्य-भव्य व्यक्तित्वाच्या मागे जाणारा देश प्रगतिपथावरच असतो असे हमखास म्हणता येणार नाही.  कृष्ण मेनन यांच्या पाठोपाठ 'साहेब' संरक्षणमंत्री झाले तेव्हा उभयतांच्या कार्यशैलीतील भिन्नता सैनिकदलांनाही चक्रावून गेली.  एक एककल्ली, रागीट, मनस्वी व्यक्ती तर दुसरी सर्वांना बरोबर घेऊन सामोपचाराने कार्यसिद्धी करणारी सौजन्य मूर्ती.  'प्रति शिवाजी' वर सैनिक उगीच खूष नव्हते.

''इंडिया विन्स फ्रीडम'' या मौलाना आझादांच्या आत्मचरित्राचा अद्याप सीलबंद असलेला दुसरा भाग प्रकाशित झाला की कित्येक रहस्यांवर नवा प्रकाश पडण्याची शक्यता आहे.  म. गांधी, प. नेहरू, माऊंटबॅटन पति-पत्‍नी, जीना, सरदार पटेल, मौ. आझाद आदी राष्ट्रीय पातळीवरील प्रमुख व्यक्तिमत्त्वांच्या क्रिया-प्रतिक्रियांनी स्वातंत्र्याच्या संधिप्रकाशात विविध रंग भरले.  अलीकडे काही कथा उजेडात येत आहेत.  यशवंतरावांनी सातारा जिल्ह्यातील सामान्य कार्यकर्त्यापासून तो केंद्रस्थानी सर्व प्रमुख खाती हाताळून उप-पंतप्रधानपदाची मजल गाठली.  पाकिस्तान-युद्ध (१९६५), बांगला देश निर्मिती (१९७१), काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष-आणीबाणी-जनता राज नि चरण-चव्हाण कारकीर्द (१९७९ ते ८०) हा पंधरा वर्षांचा काळ कित्येक दृष्टींनी महत्त्वाचा आहे.  त्या पर्वासंबंधी यशवंतरावांनी केलेल्या विश्लेषणाबद्दल मला व्यक्तिगत माहिती आहे.  त्या राजकीय विवेचनात न पडता मी एवढेच म्हणेन की, या झंझावाती काळातच चव्हाणांच्या राजकीय वा आर्थिक नीतीला विशेष उजाळाच मिळाला नाही.  ते स्वतः अर्थमंत्री असतानादेखील.  घरात ते नोकर-चाकर असे भेद मानीत नसत.  जणू सर्व सहकारी.  सर्वांची मुले साहेब-वेणूताईंशी खेळत.  सर्वांच्या आरोग्य शिक्षणाची सोय केली जाई.  तोच ढोबळ मानवतावाद किंवा नेहरूप्रणीत उदारमतवाद; ''समाजवादी समाजरचने''चा पुरस्कार, यशवंतरावांच्या धोरणातून प्रतीत होई.  नवमानवतावाद ते बोलत नव्हते; जगत होते.

चव्हाण साहेबांच्या सार्वजनिक जीवनातील कवडसे मी सतत चाळीस वर्षे पाहिले.  त्यातील अर्ध्याअधिक काळ जवळून दर्शन घेतले.  परंतु मी त्यांच्या ''अति निकट'' गटात नव्हतो.  त्यांच्या १९४२ च्या कार्याबद्दल ऐकून माहिती होती.  स्वातंत्र्याच्या संधिप्रकाशात बाळासाहेब खेरांच्या मंत्रिमंडळात मोरारजीभाई 'सूत्रधार' मंत्री बनले नि साहेब त्यांचे संसदीय सचिव.  मी एक वर्ष उमेदवारी केली व्यक्तिगत सचिवाची.  श्री. एस.एम. जोशींच्या सांगण्यावरून साने गुरुजींच्या 'कर्तव्य' दैनिकाची जबाबदारी स्वीकारण्यासाठी वर्षभरात सरकारी सेवा सोडली.  सचिवालयातील त्या अल्प काळात चव्हाण, पी.के. सावंत, बाबुभाई पटेल, एस.आर.कंठी, बी.डी. जत्ती आदी संसदीय सचिवांशी बर्‍यापैकी व खेर-मोरारजी-नंदा यांच्याशी ओझरता संबंध आला.  पुढे ही मंडळी आपापल्या राज्यात मुख्यमंत्री नि केन्द्रात प्रमुख स्थानी गाजली.  श्री. नंदा हंगामी पंतप्रधान, मोरारजी पंतप्रधान व चव्हाण उपपंतप्रधान झाले.  पण कालचक्राने गंमत केली १९७७ साली; जनता राज्याच्या प्रारंभ काळात तेव्हा श्री. जत्ती हंगामी राष्ट्रपती, श्री. मोरारजीभाई पंतप्रधान नि श्री. यशवंतराव विरोधी पक्षनेते होते.  मुंबईचा हा 'त्रिकोण' दिल्लीत प्रमुख पदी असताना मी त्यांच्याशी मराठीतूनच बोलत असे.  तिघांच्या वाचनालयात महाराष्ट्र सरकारने कै. पु. म. लाडांच्या प्रेरणेने प्रकाशित केलेली तुकारामाची गाथा व दोन-तीन संतवाङ्‌मयातील पुस्तके आढळली.  (जत्तींचा त्या विषयाचा उत्तम व्यासंग आहे.)  तो असा विचित्र काळ होता की, मित्रांतही किंचित राजकीय कटुता निर्माण झालेली दिसली. मोरारजीभाईंच्या एका टीकाप्रहाराबद्दल खाजगीत बोलताना साहेब म्हणाले, ''वडिलकीच्या नात्याने त्यांना हक्क आहे.... नि मोरारजीभाईंना हक्क गाजविण्याची हौसही आहे.''  तेच परिचित स्मित हास्य !  दुसर्‍यांच्या मतांना मान देणे; नव्हे टीकेचीही कदर करणे त्यांच्या स्वभावात होते.