• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

यशवंतराव राष्ट्रीय व्यक्तिमत्त्व-चरित्र व संपन्न व्यक्तिमत्त्व-ch ७-१

दिल्लीत आल्यापासून यशवंतरावांना दिल्लीतील रस्त्यासंबंधीची किंवा दुकानासंबंधीची फारशी माहिती नव्हती.  पायातील चप्पल-बुटापासून तो डोक्यावरील केस कमी करण्यापर्यंत सर्व गोष्टींकडे वेणूताईंचे लक्ष असे.  सकाळ झाली की वेणूताई स्वतः किंवा नोकराकडून साहेबांचे कपडे, जोड, चपला, रुमाल, गुंड्या सर्व काढून मांडून ठेवत.  त्यांच्यावर नजर टाकत.  आता सायंकाळचा मोकळा वेळ यशवंतरावांना मिळू लागला.  कधी कधी वेणूताई यशवंतरावांना आपल्याबरोबर बाजारहाट करण्यास नेऊ लागल्या.  पण यशवंतरावांची एक अट असे ती म्हणजे ते गाडीतून खाली उतरावयाचे नाहीत.  १९७७ मधील जून महिन्यातील गोष्ट आहे.  सौ. वेणूताई काही नातेवाईकांच्या मंगल कार्यासाठी मुंबईस गेल्या होत्या.  दिवसभर यशवंतराव बंगल्यात एकटे होते.  सायंकाळी ६ चा सुमार होता.  त्यांनी गाडी लावण्यास सांगितले.  गाडीत बसल्यानंतर गाडी सुरजकुंडाकडे घेण्यास सांगितली.  सुरजकुंड बंगल्यापासून १६, १७ किलोमीटर होते.  इथे छोटेसे पाण्याचे कुंड असून आजूबाजूला पर्यटन स्थळ केले आहे.  इथे साधारणतः सुटीच्या दिवशी गर्दी असते.  साहेब इथे कधी आल्याचे माझ्या स्मरणात नव्हते.  जवळपास ७ च्या सुमारास आम्ही तिथे पोहोचलो.  साहेब गाडीतून खाली उतरले आणि जवळपास ३५ ते ४० मिनिटे साहेबांचा तो नवा अवतार पाहून मी आश्चर्यचकित झालो.  साहेब अगदी स्वच्छंदपणे हिंडत होते.  बागडत होते.  सुरजकुंडाच्या बाजूला असलेल्या पायर्‍या ते भरभर उतरत होते. चढत होते.  त्यांचा तो जोश नवा होता.  पिंजर्‍यातून सुटलेल्या हरिणासारखी साहेबांची स्थिती झाली होती.  साहेब परत आले ते ताजेतवाने होऊन.  साहेबांना कंटाळा आला की ते एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी जायचे.  विशेषतः राजघाट, शांतिघाट वगैरे त्यांची आदराची स्थाने.  मृत्यूपूर्वी काही दिवस अगोदरच ते असेच राजघाटावर जाऊन आले होते.

यशवंतरावांनी सत्तेवर नसताना जनसंपर्क जास्तीत जास्त ठेवण्याचा प्रयत्‍न केला.  सत्तेवर असताना बहुतेक सकाळी पर्यटकांची रीघ त्यांच्या दारी असे.  ही प्रथा पुढेही चालू राहिली.  आता यशवंतराव त्यांची अधिक जिव्हाळ्याने चौकशी करू लागले.  त्यांच्यासाठी अधिक वेळ देऊ लागले.  येणार्‍यांपैकी कोणी ओळख सांगितली की ते त्यांच्या घरातील इतर माणसांबद्दल चौकशी करीत.  यशवंतरावांची स्मरणशक्ती पाहून तो माणूस थक्क व्हायचा.  यशवंतरावजींचा जिव्हाळा, माणुसकी व अगत्य पाहून लोकांचा त्यांच्याविषयीचा आदर वाढायचा.  मुलांपासून वयस्कर लोकांपर्यंत बहुतेकजण त्यांच्यासमोर अतिशय आदराने बसायचे.  निरोप घेताना पायावर डोके ठेवायचे.  सत्तेवर असतानाही यशवंतराव दोन मिनिटे का होईना या लोकांना भेटायचे.  हे महाराष्ट्राचे कुलदैवत होते.  त्याची सर्वांना कल्पना होती.

महाराष्ट्रातून, देशातून येणार्‍यांना यशवंतराव भेटू लागले.  ९-३०, १० ला आंघोळ करून ते भेटायला खोलीत येऊन बसत.  कोणी आला तर बोलत बसत, नाहीतर पुस्तकाचे वाचन चालू राहायचे.  पूर्वीपेक्षा अधिक पुस्तकांची भर लायब्ररीत पडू लागली.  यशवंतरावांना त्यांनी आत्मचरित्र लिहावे अशी असंख्य पत्रे येऊ लागली.  पण राजकीयदृष्ट्या यशवंतरावांना हा काळ मनस्ताप देणारा होता.  आत्मचरित्राच्या चिंतनापेक्षा राजकीय चिंतन करण्याची वेळ होती.  काही वेळा यशवंतराव तासन् तास विचारात गढून गेलेले असत.  शेजारी कोणी आहे याचे भानही त्यांना राहात नव्हते.  याच काळात दोन काँग्रेस झाल्या.  यशवंतरावांना हे विभाजन पसंत नव्हतं.  पण इलाज नव्हता.  जवळपास अडीच वर्षांचा काळ यात गेला.  सामान्यजनाला न समजणारे धक्के बसत होते.  जनता पक्षातील आपसातील भांडणामुळे या पक्षाविरुद्ध अविश्वासाचा ठराव आणून पुन्हा जनतेचा विश्वास मिळविण्याचा प्रयत्‍न काँग्रेस पक्षाने करावा असा विचार सुरू झाला.  अर्थात ही जबाबदारी काँग्रेस पक्षाचे जुने नेते म्हणून यशवंतरावांवर आली.  पार्लमेंट अधिवेशनाच्या अखेरच्या दिवसांत ८ मे १९७९ रोजी यशवंतरावांनी लोकसभेत हा ठराव मांडला आणि तो खरोखरच ऐतिहासिक ठरला.  अविश्वासाचा ठराव मांडताच जनता पक्ष एकत्र येऊन याला तोंड देण्याच्याऐवजी तो विभागला गेला आणि पुन्हा चरणसिंगांच्या नेतृत्वाखाली यशवंतराव सहा महिन्यांसाठी उपपंतप्रधान झाले.  

यशवंतरावांनी १९७७ ते जून १९८२ पर्यंत त्यांचा काँग्रेस पक्ष विरोधात होता म्हणून विरोधी पक्षात काम केले आणि या कालावधीत विरोधी पक्षाने कसे वागायचे, विशेषतः विरोधी पक्षात काम करणार्‍या अध्वर्यू नेत्यांनी कसा आदर्श लोकांपुढे ठेवायचा याचे अनुकरणीय उदाहरण घालून दिले.  त्यांच्या कार्याचा अभ्यास आजही व्हावयास हवा.  त्यांनी या कालावधीत केलेली सरकारवरील टीका वाजवी स्वरूपाची होती.  पण ते टीकेसाठी टीका करीत नव्हते.  वेळप्रसंगी त्यांनी सरकारची तोंड भरून स्तुतीही केली आहे.  विशेषतः त्यांनी जनता पक्षाच्या व नंतर इंदिरा गांधी सरकारच्या परराष्ट्र भूमिका उचलून धरल्या.  अर्थात या त्यांच्या स्तुतिपर भाषणामुळे त्यांच्यावर त्यांच्या पक्षातील संसदेतील मित्र नाराज असायचे.  पण यशवंतरावांनी त्यांना स्पष्ट बजावले होते की, मी वाईटाला वाईट व चांगल्याला चांगले म्हणणार !  १९७९ सालीही जनता पक्षाविरुद्ध अविश्वासाचा ठराव मांडतानाही हा ठराव कठोर भाषेत लांबलचक असावा अशी विरोधी पक्षाची भूमिका होती.  यशवंतरावांना हे मान्य नव्हते.  जनता राज्यातील चांगल्या गोष्टींची त्यांना जाणीव होती.  ठराव आणायचा म्हणून ते मांडणार होते आणि शेवटी हा ठराव एका ओळीत मांडण्यात आला.  अर्थात हाही सहकार्‍यांचा रोष पत्करून !  यशवंतरावांनी खाजगी, राजकीय जीवनातही कोणावर टीकेसाठी टीका केली नाही, महणूनच ते सर्वांचे आदराचे स्थान ठरले.