• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

यशवंतराव राष्ट्रीय व्यक्तिमत्त्व-चरित्र व संपन्न व्यक्तिमत्त्व-ch ४-६

आता यशवंतराव नाहीत म्हटल्यानंतर त्यांच्या विचाराचा वारा प्यावा असं मागं राहिलेल्यांना वाटत आहे.  याचं कारण स्पष्ट आहे.  मुंगीच्या मार्गानं चालणारे जे होते त्यांतील अनेकांना त्यांनी कर्तृत्वाच्या विहंगम मार्गावरून चालतं केलं.  यशवंतरावांची गरुड भरारी त्यांना पेलणारी नव्हती तरी अनेकजण मुक्कामाला पोहोचले.

जनसंमर्दाच्या कोलाहलात बसूनही तटस्थतेचं सुख अनुभवणं आणि तरीही लोक आणि आपण यांतील अद्वैत कायम ठेवणं हा निर्लेपणाचा अनुभवही त्यांनी सेवन केला.  

असा हा थोर देशभक्त, रसिक मनाचा मोठा नेता आणि व्यवहारी राजकारणी कृष्णा-कोयनेच्या संगमाच्या ठिकाणी निरंतरचा पहुडला आहे.  आत्मीयता निर्माण करणारं संगमावरील हे स्थान म्हणजे त्यांच्या भूतकाळाच्या वाटेवरील विश्रांतीची जागा.  त्या संगमाचे महत्त्व आता अनंत पटीनं वाढलं आहे.  यशवंतरावांच्या पार्थिव देहावर तेथे अग्निसंस्कार झाला हा सर्वमान्य इतिहास आहे.  हजारो लोकांच्या हृदयाचे कंद त्या दिवशी उन्मळून आले.  जीवन गलबलून गेले.  महाराष्ट्रातील राजकीय आणि सामाजिक लोकशाही खर्‍या अर्थानं त्या दिवशी संगमाच्या काठी जमा झाली.

मागे होऊन गेलेल्या माणसांच्या संबंधानं कोणा कोणा लोकांच्या मनात क्षुद्र बुद्धीची जाणीव असते.  यशवंतरावांच्या बाबतीत तसा एक लेशही कोणी मनात ठेवण्याचं कारण संभवत नाही.  पुढे होणारे कोणी आभाळातून पडणार आहेत असे नाही.  मानवी जीविताचा कालानुक्रमाने विस्तार हा होतच राहतो, विशाल बनतो.  हा स्त्रोत अखंड चालणारा आहे.  पण पुढल्या विस्ताराला मागला विस्तार कारणीभूत झालेला आहे व होणार आहे ही वस्तुस्थिती कोणालाच विसरता येत नाही.  

ज्यांच्या कर्तृत्वाची व बुद्धीची, विचारांची झेप मोठी, ते या विस्ताराला कारण होत आलेले आहेत.  अर्थात त्यांचं स्मरण मनात होत राहावं हे मानवी जीवनाच्या सामंजस्याच्या दृष्टीने ओघानेच येते.  

यशवंतरावांचे स्मरण मराठी मनाला सतत होत राहील हे तर खरेच, पण त्याचबरोबर त्यांनी संग्रहित केलेले ज्ञानभांडार, विचारभांडार कोठे तरी गळबटून पडलेले आहे अशी स्थिती राहता उपयोगी नाही.  त्यांच्या विचाराचे पाट महाराष्ट्रात, देशात, जिकडे तिकडे वाहात राहिले पाहिजेत.  त्यासाठी आता कोण पुढे सरसावतो ते पाहावयाचे !  हे माझे म्हणणे भावनातिरेकाचे वाटेलही कदाचित, परंतु पंचवीस-तीस वर्षे त्यांच्या सान्निध्यात राहिलेल्या माझ्यासारख्यानं खरं हे सांगितलंच पाहिजे.  

यशवंतरावांच्या जीविताचं सार्‍या लोकांना नवल वाटतं ते हे की, महाराष्ट्राच्या मातीत, एका सामान्य घरात जन्मलेल्या या माणसानं नाना प्रकारच्या विचारांची आणि कर्तृत्वाची क्षेत्र उल्लंघिली तरी कशी ?  ज्या समाजात ते जन्मले तिथं तरी काही अनुकूलता ?  रेम्याडोक्या माणसांचे, भुईला नाक टेकवून जगणारी माणसे, असे भोवतालच्या माणसांचं जीवन !  गेलेल्या आणि येणार्‍या दिवसांत फरक असा नाहीच.  आजचा दिवस कालच्या सारखा आणि उद्याचा आजच्यासारखा अशी स्थिती !

अशा या सामाजिक वातावरणात जन्म घेऊन लहानाचे मोठे झालेल्या यशवंतरावांनी मात्र नित्य नवा दिवस पाहावा, कर्तृत्वाचं एकेक दाल झपाझप मागं टाकून पुढील स्तबकात प्रविष्ट होत राहावं हे घडलं तरी कसं ?  आश्चर्य वाटावं, अचंबा वाटावा असं जरी हे असलं तरी एक गोष्ट मात्र खरी की, यशवंतरावांच्या मनानं, बुद्धीनं जे चापल्य दाखविलं ते महाराष्ट्राच्या आणि देशाच्या इतिहासात, माणुसकीच्या इतिहासात अद्‍भुत वाटावं असं आहे.