यशवंतराव बहुजन समाजाचे नेते होते हे सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ आहे. परंतु बहुजन समाज म्हणजे एक विशिष्ट समाजाचा वर्ग असं काही मंडळी गृहीत धरतात. यशवंतरावांना याचीही जाणीव होती. त्यामुळे बहुजन समाज म्हणजे नेमका कोणात समाज हे बहुजन समाजाला आणि अन्य समाजालाही त्यांनी समजून सांगितलं ते असं की, 'ज्यांची सुखदुःखं समान आहेत तो बहुजन समाज.' वस्तुतः यशवंतराव या समाजाचे प्रतिनिधी होते. परंतु 'मराठा नेता' असा शिक्का मारणारांना त्याचे काय !
बहुजन समाज या शब्दाबद्दल म्हणजे एका विशिष्ट वर्गाबद्दल यशवंतरावांना मनापासून कधी प्रेम वाटलं नाही. महाराष्ट्राच्या आणि देशाच्या समाजजीवनातले सर्व थर शहाणे व्हावेत, त्यांना विकासाची संधी मिळावी यासाठीच त्यांनी प्रयत्न केले. व्यक्तिपूजा आणि एकाच माणसाचं नेतृत्व ही कल्पना त्यांना असह्य वाटे. निश्चित अशा कार्यक्रमावर आधारलेलं सामुदायिक नेतृत्व त्यांना मान्य होतं. अशा नेतृत्वाच्या मार्गदर्शनामुळेच त्यांचा पिंड घडला. त्यामुळे महाराष्ट्रात असताना आणि दिल्लीत पोहोचल्यावरही राजकीय क्षेत्रात नेतृत्व प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी निरनिराळ्या जिल्ह्यांतील जिद्दीच्या कार्यकर्त्यांना मोठ्या प्रमाणात संधी मिळवून दिली. राजकारणाच्या मुख्य प्रवाहात त्यांना सामील करून घेतले. महाराष्ट्रात नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची एक नवी पिढी त्यातून जन्माला आली. याच पिढीतील काहीजण पुढच्या काळात यशवंतरावांना अपमानित करण्यास धजावले. हे त्यांचं दुर्दैव ! महाराष्ट्रातलं राज्य हे 'मराठी' राज्य आहे, 'मराठा' नाही असं त्यांनी उच्च रवानं सांगितलं होतं, परंतु दिल्लीकरांनी आणि त्यांच्या कच्छपी असलेल्यांनी त्याकडं सोयीस्कर दुर्लक्ष केलं.
असं असलं तरी अपमानित करणार्यांनाही कटुतेची वागणूक द्यायची नाही हे व्रत त्यांनी अखेरपर्यंत पाळलं. राजकीय क्षेत्रात त्यांच्याविषयी कठोरपणानं बोलणार्यांना आणि वागणार्यांनाही त्यांनी सन्मानानं वागवलं. याचं कारण त्यांच्यासमोर, बोलणार्या, लिहिणार्या किंवा वागणार्या माणसांपेक्षा देशहित हे प्रकर्षानं होतं. त्यांनी आपल्या स्वभावधर्माला मुरड पडू दिली नाही. अगदी आयुष्याची संध्याकाळ समीप आलेली असताना, एकाकी आयुष्य घालवीत असताना, दिल्लीनं त्यांना अपमानास्पद वागणूक दिली. महाराष्ट्रातील एकेकाळचे सवंगडी कुत्सितपणे हसत आहेत हेही त्यांनी पाहिलं. तरी यशवंतरावांनी कोणाबद्दलच आपल्या मनात कटुता ठेवली नाही. उलट ज्यांच्या मनात कटुतेनं घर केलं होतं ती त्यांची कटुता नाहीशी करण्याचाच आपल्या शांत वागणुकीनं प्रामाणिक प्रयत्न केला.
स्वभावाचा हा एक आगळा पैलू म्हणावा लागेल !
यशवंतरावांच्या व्यक्तिमत्त्वात जागोजागी आशावादित्व आढळतं. निराशेच्या निबिड अंधकारातून त्यांचा आयुष्याचा प्रवास घडला. परंतु निराशेचा कोणताही कठोर अनुभव त्यांना निराशेत दडपू शकला नाही. याचं कारण, त्यांनी आपली दृष्टी नेहमीच प्राप्त परिस्थितीच्या आणि प्राप्त काळाच्या पलीकडे ठेवली. दृष्टीची गती पल्लेदार राखल्यानं निराशा त्यांना रोखू शकली नाही. प्राप्त कर्तव्य करीत राहिलं तर संकटाचा अंत घडवून आणता येतो हा अनुभव त्यांच्या राजकीय आणि सामाजिक वाटचालीत भरपूर जमा झालेला आढळतो. ते स्वतः लोकसंग्राहक आहेत. स्वतःच निराश बनते तर त्यांना इतरांना प्रेरणा देता आली नसती. सर्वसामान्य लोकांसाठी त्यांनी अखंड काम केलं आणि हे करीत असताना प्रतिकाराचे तीव्र आघात सोसले. तरीही ते आशावादी राहिले.
कर्तृत्ववान माणसांचा सहवास हा त्यांचं व्यक्तिमत्त्व घडण्यास पुष्कहच उपयुक्त ठरला. शांत व गंभीर वृत्ती ठेवून आपल्या कार्यक्षेत्रात अनेक कर्त्या माणसांना यांनी सामावून घेतलं. शुद्ध विचाराचा सतत पाठपुरावा केला. टीका झाली, हेत्वारोप झाले, शिवीगाळ झाली तरी लोकनेत्याला आवश्यक असलेली मनाची शांतता ढळू दिली नाही. स्वतः माणुसकीनं जगायचं आणि सभोवतालच्यांना जगवायचं तर मनाची शांतता अथांग ठेवावी लागते. तशी ही शांतता होती. राजकीय आणि सार्वजनिक जीवनात त्यांनी यशाचा जो पल्ला गाठला याचं मूळ त्यांच्यातील व्यक्तिगत गुणवत्तेचा दर्जा, सचोटी, प्रामाणिकपणा, चारित्र्य आणि अंगीकृत कार्याबद्दलची निष्ठा यांत सापडते. त्यांच्या ठिकाणची विनम्रता आणि शिष्टाचार या गोष्टी तर सर्वमान्य होत्या. त्यांचे मित्र आणि राजकारणातले विरोधक देखील त्यांच्या शिष्टाचारपूर्ण वागणुकीवर खूष असत. टीकाकारांनी एखाद्या प्रश्नाच्या संबंधात त्यांचे वाभाडे काढले असतील, पण हा एक उद्धट, चढेल माणूस आहे असे उद्गार चुकूनही कोणी काढले नाहीत.