• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

यशवंतराव राष्ट्रीय व्यक्तिमत्त्व-चरित्र व संपन्न व्यक्तिमत्त्व-ch ४

४. सह्याद्रीचे लेणे (रामभाऊ जोशी)

यशवंतरावांचं व्यक्तिदर्शन हा अभ्यासाचा स्वतंत्र विषय आहे, कारण त्यांचे व्यक्तित्व व कर्तृत्व हे सह्याद्रीचे कोरीव लेणे होते.  यशवंतराव चव्हाण यांचे व्यक्तिरूप, त्यांच्या संवयी, त्यांच्या आवडी-निवडी, सर्वसामान्य वागणं, बोलणं, तत्त्वज्ञान, त्यांच्या देशनिष्ठा, राष्ट्रभक्ती, स्वभाव, सामाजिक व राजकीय व्यवहार, या सर्वांना एक कलात्मक आकार होता.  तुकड्या-तुकड्यांनी ते समजणार नाही.  त्यातले देखणेपण भावणार नाही.  कारण या प्रत्येकाचा त्यांच्यामध्ये एक विशेष आढळतो.

यशवंतरावांच्या सार्‍या आयुष्याचं आणि चरित्राचं महत्त्व असं आहे की मानव्याचे आजवर जे प्रचंड प्रतिनिधी झाले आहेत त्यांतच यशवंतरावांची गणना करायला हवी.  राजकारणात अहर्निश राहूनही यशवंतराव माणुसकीची एक दृश्य मूर्ती होती.  मानवी मनाची ती एक बेरीज होती.  त्यांच्या चरित्रात आणि कर्तृत्वात उत्तरोत्तर प्रगल्भ होत जाणारे मानवी मनाचे अनेकानेक अनुभव कोंडून धरलेले होते.  कस्तुरीचा सुगंध कोंडून धरावा तसे.  

माणसाच्या मनाला पडणारे सगळे प्रश्न त्यांना पडलेले असणारच, कारण ते माणूस होते.  यातील अधिकांत अधिक प्रश्न त्यांनी सोडविले हे त्यांचं खरं वैभव.  हे वैभव उठून दिसतं ते खरं परंतु लोकहिताचं कार्य आघाडीवर राहून करणार्‍या राजकारणी नेत्याला किती आणि कशा अनंत यातना भोगाव्या लागतात याचं यशवंतराव हे एक प्रतीक आहे.  प्रारंभापासूनच त्यांचं जीवन पाहिलं तर अविश्वास, अवमान, फितुरी, निंदा, टीका अशा अनेक प्रसंगांतून त्यांच्या जीवनाचा प्रवास घडलेला आढळतो.  जनतेच्या उन्नतीला आवश्यक आणि सदैव उपकारक होणारे उपाय सुचतील त्यांचा लोकांना उपदेश आणि राज्ययंत्रणेद्वार प्रयोग करीत राहणं हे त्यांनी जीविताचं इतिकर्तव्य मानलं होते.  ते राजकारणी निश्चित होते.  परंतु आपल्या दिनक्रमाला त्यांनी धंदेवाईक राजकारणाचं स्वरूप प्राप्‍त होऊ दिलं नाही.  धंदेवाईक राजकारणी स्वार्थाकडे लक्ष ठेवून असतात.  यशवंतरावांचं लक्ष होतं जनतेच्या उन्नतीकडे.  यशवंतराव आणि अन्य पुष्कळसे राजकारणी यांच्या दृष्टिकोणात मुळातच ही तफावत होती.  

राजकीय क्षेत्रात वावरणारांच्या दृष्टिकोणात अशी मूलभूत तफावत असेल तर त्यातून विधायक दृष्टिकोणाचा पाठपुरावा करणाराला कोंडीत पकडून नेस्तनाबूत करण्यासाठी धंदेवाईक राजकारणी टपून बसलेले असतात.  लोकांच्या मनात गैरसमज निर्माण करून देण्याच्या कामात आघाडीवर राहतात.  यशवंतराव गैरसमजाचे बळी ठरावेत अशासाठी अनेकदा प्रयत्‍न झाले.  त्यांच्या बाबतीत त्यांच्या राजकीय शत्रूंचाच गैरसमज होता असं नव्हे, चांगले मित्र म्हणविणार्‍यांचाही गैरसमज होता.  दृष्टिकोणात तफावत हे त्याचे मुख्य कारण.  त्यातून कठोर टीका झाल्या, अवमान करण्यात आला, निंदानालस्ती करण्यात आली.  विश्वासाला तडा जाईल असेही प्रसंग उभे राहिले.  राजकारणातील अन्य एखाद्या माणसाचा या टीकेनं चोळामोळा झाला असता.  टीकेचा मनावर परिणाम हा होतोच.  यशवंतरावांचं मन कठोर नव्हतं.  परंतु त्यांनी टीका सहन केली याचं कारण जबरदस्त आत्मसंयमन !  टीकेचा उपयोग त्यांनी क्षमाशीलता वाढविण्याकडेच केला.  टीकेतून नवा विचार, नवा मुद्दा शोधला.  टीका ही मार्गदर्शक ठरते, स्वतःला त्यांतून सुधारणा घडवून आणता येते हा त्यांचा सिद्धान्त !  देशात आणि जगात होणार्‍या दैनंदिन घडामोडींचा मागोवा, रोज प्रातःकाळी समोर येणार्‍या वर्तमानपत्रांतून ते घेत असत.  त्याचप्रमाणे त्यांनी स्वतः केलेल्या निर्णयांतून समाजात कोणा व्यक्तीवर, कोणा गटावर अन्याय झाला नाही ना याचा शोध, टीकात्मक लिखाणांतून, विचारांतून घेत असत.  टीकेतून स्वतःमध्ये सुधारणा घडवून आणता येते हा त्यांचा सिद्धान्त यातूनच तयार झाला असला पाहिजे.  हा सिद्धान्त त्यांच्या मनीमानसी पूर्णत्वानं रुजला होता.  टीकापटू सक्षम त्यांच्या तोंडावर टीका करीत असत.  दुराग्रहानं काही सांगत असत पण अशा वेळी 'अरे ला कारे' असं न करता 'तुम्ही म्हणता अशीही एक बाजू असू शकते' असं अगदी माफक अन् मृदू शब्दांत बोलून टीकापटूला ते गप्प करीत.  टीकाटिप्पणीचे अधिकाधिक काळ चर्वितचर्वण होत राहणं हे राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या दृष्टीने कोणालाच फलदायी ठरत नाही.  राजकारणातले विरोधक जरी झाले तरी ते जनतेच्या उन्नतीच्या तळमळीपोटीच टीकेचा अवलंब करीत असतात.  अशा टीकेतील विधायक आशय यशवंतराव आत्मसात् करीत असत.  जनतेची उन्नती हीच एक गोष्ट त्यांना अभिप्रेत होती.  त्यामुळे कमालीची कठोर टीका झाल्यावरही वर उल्लेख केलेले मृदू शब्द त्यांच्याकडून ऐकावयास मिळत असावेत.

यशवंतरावांच्या निघून जाण्यानं खरं खरं नुकसान झालं असेल तर समाज-परिवर्तनवादी, लोकशाहीवादी राजकारणातील विरोधकांचं !  विरोधकांचा विरोध व्यवहारी भूमिकेतून समजून घेऊन त्यांना मुत्सद्दीपणानं हाताळणारा आणि त्यांच्या कठोर टीका बोथट बनवून देशाच्या प्रगतीच्या कामात विरोधकांचा सहभाग निर्माण करून घेणारा मुत्सद्दी, संसदपटू अशी त्यांनी आपली प्रतिमा दिल्लीत निर्माण केली होती.  पार्लमेंटमध्ये त्यांनी विरोधकांचे चौफेर हल्ले हसत हसत झेलले आणि परतवले ते आत्मसंयमनामुळे आणि देशहिताला प्राधान्य देण्याच्या दूरदृष्टीमुळेच होय.