मग महाराष्ट्राने काय करावे ? संयुक्त महाराष्ट्र झाला त्या वेळी मी म्हणालो होतो की, महाराष्ट्र निर्मितीसाठी शिवशक्ती निर्माण झाली आहे तर ती कायम टिकवली पाहिजे. ते आनंद सोहोळ्याचे दिवस साजरे करीत असतानाही माझ्या मनात हे विचार होते. कारण मला मनापासून वाटते की, महाराष्ट्राला राष्ट्रसेवेचे वेड होते म्हणून तो मोठा झाला. ते वेड, ती जिद्द, तो कणखरपणा, ते शुद्ध चारित्र्य, ती विद्वत्तेपुढे नमणारी राजकीय नम्रता या देशाला हवी आहे आणि या गोष्टी महाराष्ट्राच्या परंपरेत आहेत. कसदार जमीन असणार्या शेतकर्याला आपल्या शेताचा अभिमान असतो तसा मला महाराष्ट्राचा अभिमान आहे. हे सारे गुण देशात सर्वत्र असावेत असे मला वाटते. म्हणून महाराष्ट्राने या गुणांची जोपासना करावी-त्या गुणांना अनुकूल असे वातावरण सरकारने निर्माण करावे, असे मला वाटते. महाराष्ट्राने कोण व्हावे असे मला कुणी विचारले तर मी म्हणेन भारताचा पुरोगामी व कणखर ध्येयवाद असलेला नम्र सेवक व्हावे. कारण अशा सेवकांची आज देशाला गरज आहे. आपण सध्या फार मोठ्या संक्रमण काळातून जात आहोत. गेल्या तीन वर्षांत देशाला धक्के बसले. देशाने उराशी बाळगलेल्या मूल्यांना आव्हान दिले गेले. आपले अस्तित्व धोक्यात आणण्याचे प्रयत्न झाले आणि भविश्यकाळातही तसे होईल. म्हणून अशा वेळी केवळ सरकार नव्हे तर सारे राष्ट्र कणखर व ध्येयवादी व्हावयास हवे.
भारताच्या सध्याच्या संक्रमणकाळातही काही मूलभूत ध्येयावर त्याला ठामपणे उभे राहावे लागणार आहे. भारताला राष्ट्र म्हणून मानाने जगावयाचे असेल तर दोन ध्येयसूत्रांवर त्याची उभारणी करावी लागेल. एक स्वावलंबी व समाजवादी अर्थव्यवस्था व दुसरे राष्ट्रीय स्वाभिमानावर व मानवतेच्या मूल्यांनी प्रसिद्ध झालेला प्रखर राष्ट्रवाद. या दोन्ही ध्येयवादांची साधना वाटते तेवढी सोपी नाही. त्यात अडचणी आहेत. काही भक्कम आर्थिक विचार व त्यासाठी लागणारी लोकावरील श्रद्धा असल्याविना आर्थिक समता येणार नाही. मला वाटते महाराष्ट्रात या दृष्टीने अनुकूल वातावरण आहे. समाजवादाची ती आदर्श प्रयोगभूमी ठरण्याची शक्यता आहे. तेथील सहकारी चळवळ, तेथील मध्यमवर्गीय जनतेची, कामगारांची, शेतकर्यांची राजकीय जागृती व त्याचा कार्यक्षम कारभारासाठी होणारा उपयोग हे लक्षात घेता तेथे समाजवादी विचार प्रबळ होईल.
दुसरे ध्येयसूत्र राष्ट्रीय ऐक्याचे. महाराष्ट्राला राष्ट्रवादाचे बाळकडू आहे. शिवाजी महाराजांच्या काळापासून ही राष्ट्रीय प्रेरणा, ते राष्ट्रीय चैतन्य, आपल्या जीवनात सळसळत आहे. अगदी अलीकडे हिंदीच्या प्रश्नावर भारतात एवढा वादविवाद झाला, पण महाराष्ट्राने याबाबत मुळीच शंका व्यक्त केली नाही. महाराष्ट्राने हे केले ते राष्ट्रीय ऐक्याच्या दृष्टीतून आणि तेही स्वयंस्फूर्तीने. एक राष्ट्रीय भाषा हे राष्ट्रैक्याचे महत्त्वाचे साधन आहे या श्रद्धेने महाराष्ट्राने हिंदीला पाठिंबा दिलेला आहे. ही त्याची उपजत राष्ट्रीय वृत्ती ही भारताची आजची मोठी निकड आहे.
पण हे राष्ट्रीय किंवा सांसकृतिक ऐक्य हे केवळ घोषणांनी होणार नाही. त्यासाठी नित्य संस्कार हवेत. तसे संस्कार करणार्या व त्यासाठी विविध उपक्रम करणार्या संस्था हव्यात. महाराष्ट्राच्या भूमीत आंतरभारतीसारखा ध्येयवाद आणणारे साने गुरुजी किंवा दुसर्या प्रांतात जाऊन काम करणारे बाबा राघवदास, बाबूराव पराडकर किंवा सखाराम देऊसकर यांच्यासारखे देशभक्त ही अशा महाराष्ट्राच्या विशाल दृष्टिकोणाची प्रतीके आहेत. पण हे कार्य आता व्यक्तींचे नाही. अशा संस्था निर्माण केल्या पाहिजेत. त्यांच्याभोवती बुद्धिमंतांचे जाळे विणले पाहिजे. महाराष्ट्रातील बुद्धिमंतांनी या कामी पुढाकार घेतला तर पुन्हा एकदा राष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्राच्या बुद्धिवादी राष्ट्रनिष्ठ परंपरेचा प्रभाव पडू लागेल.
भारताच्या राष्ट्रीय ऐक्याची ही भावनिक बाजू सांभाळणे हे महाराष्ट्राला शक्य आहे. तसेच त्याची सामाजिक बाजूही महत्त्वाची आहे. सामाजिक विषमता कायम राहिली तर कोणतीही राजकीय रचना वा आर्थिक रचना टिकणार नाही. कधीतरी त्या विषमतेतून असंतोष निर्माण होईल आणि त्या असंतोषाचा स्फोट होऊन ती रचना उडवली जाईल. म्हणून सामाजिक समता आणि सामाजिक न्याय यांची काळजीपूर्वक जोपासना या देशाला करावी लागणार आहे. म. फुले- आगरकर-आंबेडकर अशी पुरोगामी सामाजिक विचारांची परंपरा असणार्या महाराष्ट्राला आता ते पुरोगामी विचार राष्ट्रीय जीवनात आणले पाहिजेत. आपली संतांची आणि आधुनिक समाज-सुधारकांची परंपरा ही काही केवळ महराष्ट्रासाठी नाही. त्यांचे विचार मानव्याचे होते. त्यांची स्वप्ने विश्वव्यापी होती. त्यांची तळमळ, त्यांची करुणा सगळ्या मानवतेतील दीन-दुःखितांसाठी होती. आता हे पर्याय आपण भारताच्या या विचारप्रवाहात आणून सोडले पाहिजेत. त्यासाठी महाराष्ट्राने समाजसुधारणेची आपली परंपरा जागृत ठेवली पाहिजे.