• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

यशवंतराव चव्हाण (84)

रेड्डी यांच्या उमेदवारीमुळे श्रीमती गांधी खूपच अस्वस्थ झाल्या. आपल्या अधिकाराला, पंतप्रधानपदाला, काँग्रेस श्रेष्ठींनी हे आव्हान दिले असून आपण त्याचा मुकाबला करायचा असे त्यांनी मनाशी पक्के केले. पत्रकार परिषदेत पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना त्यांचा राग स्पष्टपणे दिसून आला. यशवंतराव चव्हाण यांच्यासंबंधीही त्या कटुतेने बोलल्या. उमेदवार ठरविण्याबाबत काँग्रेस श्रेष्ठींना आपण विश्वासात घेतले नाही असे म्हटले जाते हे खरे का ?  या प्रश्नाला उत्तर देताना इंदिराजी म्हणाल्या, ''मी, श्रेष्ठींचे मत वेळोवेळी विचारले होते. त्यांच्या मर्जीविरुद्ध मला माझा उमेदवार लादावयाचा नव्हता. माझा जनतेवर विश्वास आहे.''  बंगलोरहून दिल्लीला परतल्यावर इंदिराजी या. प्रे. गिरींना भेटल्या. त्यांनी आपल्या भावी योजनांची कल्पना त्यांना दिली. गिरी रागातच होते. काँग्रेस श्रेष्ठींनी आपल्यासारख्याला बंगलोरमध्ये अशी वागणूक द्यावी याबद्दलची नापसंती व्यक्त करून त्यांनी राष्ट्रपतिपदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शविली. इंदिराजींनी त्यांची समजूत काढून थोडे दिवस थांबण्याची विनंती केली. चव्हाण बंगलोरहून मुंबईला गेले. त्यांनी महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांशी चर्चा करून त्यांना आपली भूमिका समजावून दिली. संजीव रेड्डींजवळ राष्ट्रीय प्रतिमा असून अनुभवही भरपूर आहे. आपण गट वगैरे काही केलेला नव्हता, त्यामुळे मोरारजी, स. का. पाटलांच्या गटात आपण सामील झालो होते हे खरे नाही असे यशवंतरावांनी स्पष्ट केले. आर्थिक ठरावाबाबत आपण जशी तडजोड घडवून आणली तशीच राष्ट्रपतिपदाच्या उमेदवाराबाबतही तडजोड घडवून आणणे शक्य होते असेही सांगून टाकले. पंतप्रधान इंदिरा गांधींनी आपले संबंध विशिष्ट गटाशी (सिंडिकेटशी) जोडले याचा आपल्याला विषाद वाटतो असेही बोलून दाखविले. इंदिरा गांधी कोणती पावले उचलतात याकडे सर्वांचे लक्ष लागू राहिले. १६ जुलैला इंदिराजींनी अर्थखाते मोरारजी देसाई यांच्याकडून काढून स्वतःकडे घेतले. स्वाभिमानी मोरारजींनी त्वरित राजीनामा देऊन टाकला. उपपंतप्रधानपदी राहून आपण दुसरे कोणतेही खाते स्वीकारू शकत नाही असा निरोप धाडला. मंत्रिमंडळात आणि काँग्रेसच्या नेत्यांत खळबळ उडाली. यशवंतरावांनी राजीनामा देऊन बाहे पडावे असा सिंडिकेटमधील कांही काँग्रेस नेत्यांनी आग्रह धरला. चव्हाणांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यावर संसदीय मंडळात श्रीमती गांधी यांच्याविरुद्ध अविश्वासाचा ठराव मंजूर करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या. यशवंतरावांच्यावर खूपच दडपण आले. तथापि त्यांनी सिंडिकेटला स्पष्ट कल्पना दिली की आपण त्यांचेबरोबर जाऊ शकत नाही.

मोरारजींच्या राजीनाम्याचे दुसरे दिवशी यशवंतरावांनी पंतप्रधान इंदिरा गांधींची भेट घेतली आणि मोरारजीभाईंशी मोकळेपणाने चर्चा करण्याची विनंती केली. त्या म्हणाल्या, ''मी चर्चा करायला जरूर तयार आहे. तथापि मोरारजींचे अर्थखाते त्यांचेकडे पुन्हा सुपूर्द करण्यास आपण तयार नाही.''  इंदिराजी-मोरारजी भेट होऊन दोघांत चर्चा झाली. इंदिराजींनी मोरारजींना सांगितले की, अर्थविषयक जो ठराव ए.आय.सी.सी.ने मंजूर केला आहे त्याची अंमलबजावणी करण्यासाठी आपण स्वतःकडे अर्थखाते घेतले आहे. मोरारजींनी राजीनामा देण्याचा आग्रह धरला, इंदिराजी राजीनामा स्वीकारण्यास मोकळ्या झाल्या. काँग्रेसमधील सत्तेच्या राजकारणाने आपला बळी घेतला असे मोरारजीभाईंनी बोलून दाखविले. मोरारजीभाई आपल्या निवासस्थानी परत आल्यावर महाराष्ट्रातील काही खासदारांनी अनंतराव पाटील यांच्यासमवेत यशवंतराव चव्हाणांची भेट घेतली. मोरारजींसारख्या ज्येष्ठ नेत्याला व मंत्र्याला पंतप्रधानांनी ज्या पद्धतीने वागविले त्याबद्दल तीव्र नापसंती व्यक्त केली. यशवंतरावांनीही आपली नापसंती व्यक्त करून राजीनामा देण्याची तयारी करावी असे भेटीला गेलेल्या खासदारांनी सुचविले. यशवंतरावांपुढे पेच पडला.