खेड्यांपाड्यांतील गरिबांना जिल्ह्याचे ठिकाणी, मुंबईच्या सचिवालयात हेलपाटे घालायला लागू नयेत, त्यांची कामे नजिकच्या ठिकाणी लवकर व्हावीत म्हणून सत्तेचे विकेंद्रीकरण करण्याची गरज यशवंतराव बोलून दाखवीत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनल्यावर त्यांनी वसंतराव नाईक समिती नेमून तिच्याकडे सत्तेच्या विकेंद्रीकरणाचा प्रश्न सोपविला. बलवंतराय मेहता समितीने लोकशाहीच्या विकेंद्रीकरणाच्या संबंधात सूचना केलेल्या होत्या. त्यांचा अभ्यास करून नाईक समितीने आपल्या शिफारशी सादर केल्या. त्या शिफारशींच्या आधारे सरकारने एक बिल तयार केले. विधीमंडळात या बिलावर चर्चा झाली आणि डिसेंबर १९६१ मध्ये हे बिल संमत करण्यात आले. यानंतर १९६२ मध्ये जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या अस्तित्वात आल्या. त्यापूर्वी असलेली लोकलबोर्डस् संपुष्टात आली. पंचायत राज्य सुरू करण्याचा मान महाराष्ट्राने मिळविला. या स्थानिक स्वराज्य संस्थांची रचना, निवडणुका, कारभार याबाबत महाराष्ट्राने जी पद्धत स्वीकारलेली होती तिचे कित्येक राज्यांनी कौतुक करून आपल्या राज्यात त्या पद्धतीचा उपयोग केला.
कला-साहित्याच्या क्षेत्रातील त्याचप्रमाणे क्रीडा-करमणुकीच्या क्षेत्रातील उणिवा व अडचणी याकडे यशवंतरावांनी जातीने लक्ष दिले. करमणूक करात सूट दिली, नाट्यकलेला उत्तेजन-सहाय्य दिले. कलावंतांना आर्थिक सहाय्य सरकारतर्फे देण्याची तरतूद केली. चांगल्या साहित्याला पारितोषिके आणि लेखकाला उत्तेजनार्थ सहाय्य देऊ केले. साहित्य-संस्कृती मंडळाची स्थापना केली. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्याकडे त्या मंडळाचे अध्यक्षपद सोपविले. त्यानंतर वाईला या मंडळाने स्थापन केलेल्या विश्वकोश काया्रलयाचे उद्घाटन स्वतः यशवंतरावांनी केले. मराठी भाषेच्या विकासासाठी डायरेक्टोरेट ऑफ लँग्वेजेस (भाषा विभाग) सुरू केले. लोकसाहित्याला उत्तेजन दिले. या सार्या निर्णयाबरोबरच त्यांनी आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला तो नवबौद्धांबाबत. खेड्यापाड्यांतील हरिजन बांधवांनी, पददलितांनी बौद्ध धर्माचा स्वीकार करून ते स्वतःला नवबौद्ध समजूसंबोधू लागले होते. तरी त्यांची आर्थिक-सामाजिक-शैक्षणिक स्थिती कांही सुधारली नव्हती. या दृष्टीने ते मागासच राहिले होते. त्यांनी आपल्या कांही मागण्या मांडल्यावर यशवंतरावांनी त्यांना 'सवलती' जाहीर केल्या. नागपुरात जेथे या मंडळींनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली त्या भूमीका 'दीक्षाभूमि' संबोधून तेथे स्मारक उभे करण्यास सहाय्य केले. डॉ. आंबेडकरांच्या जयंती-दिनी (१४ एप्रिल) सुट्टी जाहीर केली. महार-वतनाची पद्धत बंद करणारा कायदा करून अस्पृश्यांची शेकडो वर्षांची गुलामगिरी नष्ट केली. सुमारे ३० वर्षांपूर्वी डॉ. आंबेडकरांनी केलेल्या मागणीची यशवंतरावांनी पूर्तता करून हरिजनांना हक्काने जगण्याचा अधिकार प्राप्त करून दिला. अस्पृश्यता नष्ट करण्याचे, हरिजनांना इतर माणसांच्या बरोबरीने आणण्याचे फार मोलाचे काम यशवंतरावांनी केले.
११ जुलै १९६१ ला रात्री पानशेत धरण फुटले आणि पुणे शहराला पुराचा जबर तडाखा बसला. पानशेत फुटल्यामुळे खडकवासला धरणही फुटले आणि पुराचे पाणी शहरात शिरून शेकडो घरे कोसळली, मालमत्तेचे प्रचंड नुकसान झाले. संपूर्ण राज्यावर एक प्रकारे संकट कोसळले. ही वार्ता मुंबईत पोहोचताच यशवंतराव तांतडीने विमानाने पुण्याला निघाले. विमान पुण्याला पोहोचले. तथापि शहरावर घिरट्या घालण्याखेरीज दुसरा मार्ग सांपडणेच कठीण झाले. कारण शहरातील रस्ते पाण्याखाली बुडालेले, पूल पडलेले, वीजेचे खांब पडून तारा इतस्ततः पसरलेल्या. खाली जमिनीवर उतरायचे कसे आणि लोकांचे सांत्वन करून त्यांना धीर द्यायचा कसा असा प्रश्न यशवंतरावांपुढे उभा राहिला. पुराचे पाणी ओसरल्यावर यशवंतराव अधिकार्यांसह शहरात पोहोचले. लोकांना निवारा, औषधे, पिण्याचे पाणी, कपडे यांची तांतडीने आवश्यकता आहे हे पाहून कलेक्टरांकडे २० लक्ष रुपये तांतडीने देण्याची व्यवस्था यशवंतरावांनी केली. पूर निवारणाचे कार्य तांतडीने सुरू करण्याचा आदेश दिला.