पंडित नेहरूंनी पुण्यात १ ऑगस्टला टिळक पुण्यतिथीच्या निमित्ताने जे भाषण केले त्यात त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की, मुंबईत जेव्हा शांतता नांदेल तेव्हां आपण स्वतः मुंबई महाराष्ट्रात घालावी अशी महाराष्ट्रातर्फे वकिली करू. या भाषणाचा परिणाम गुजराती नेत्यांवर आणि मुंबईतील नेत्यांवर निश्चितपणे झाला. महाराष्ट्राने सुचविलेल्या द्विभाषिक राज्याला मान्यता दिली तर महाराष्ट्राची तक्रार राहणार नाही आणि आपल्यालाही मुंबईत राहता येईल असा मतप्रवाह लोकसभेतील मुंबई व गुजरातमधील सभासदांत आढळून येऊ लागला. आचार्य कृपलानी आणि अशोक मेहता, तसेच चिंतामणराव देशमुखही या नव्या योजनेला अनुकूल झाले. एच. व्ही. कामथ, आचार्य कृपलानी, अशोक मेहता, फिरोज गांधी आदींनी पुढाकार घेऊन द्विभाषिकासंबंधी एक खलिता तयार केला. त्यावर २८२ खासदारांच्या सह्या घेतल्या आणि पंडित नेहरूंना सादर केल्या. संसदीय काँग्रेस पक्षाने द्विभाषिकाच्या योजनेला आपला पाठिंबा व्यक्त केला. १० ऑगस्टला लोकसभेने विशाल द्विभाषिकाच्या बिलाला संमती दर्शविली.
दुसर्याच दिवशी ११ ऑगस्टला पुण्यात काँग्रेस भवनवर यशवंतरावांचे काँग्रेस कार्यकर्त्यापुढे भाषण झाले. यशवंतराव म्हणाले, ''सार्वभौम लोकसभेने जो द्विभाषिकाचा निर्णय घेतला आहे तो शिरोधार्य मानून आपण सर्व कार्यकर्त्यांनी जनतेला समजावून द्यायला हवाय. मुंबईच्या प्रश्नावर खूप रण माजले. महाराष्ट्राच्या प्रश्नापुढे देशावरील निष्ठा विसरली गेली. ज्यांनी गोंधळ माजविला, अशांतता पसरविली त्यांचेवरच एकसंध भाषिक महाराष्ट्र न मिळण्याची जबाबदारी आहे. लोकसभेचा निर्णय यशस्वी करण्यासाठी आपण प्रयत्नांची शर्थ करू या !'' यानंतर यशवंतरावांनी पुणे जिल्ह्याचा दौरा केला. सासवड, बारामती, इंदापूर, दौंड आदि ठिकाणी त्यांच्या सभा आयोजित केलेल्या होत्या. यशवंतरावांचा दौरा निर्धाराने आणि छातीठोकपणे चालू असल्याचे पाहून विरोधकांनी निदर्शने करण्याचा, अत्रे यांच्या सभा आयोजित करण्याचा प्रयत्न करून पाहिला. अत्रे आणि कोठारी ही दुक्कल पत्रकार होती, संपादक होती. तथापि त्यांनी आपल्या बोलण्यात, लेखनात सभ्यता दाखवावयाची नाही असा निर्धार केला होता. विनोद आणि बाष्कळपणा यामुळे लोकांची थोडावेळ करमणूक होत असे. पण लोक अत्र्यांना गंभीरपणे घेत नसत. यशवंतरावांची बारामतीची मिरवणूक व सभा एवढी प्रचंड झाली की समितीवाल्यांना परिस्थितीचा अंदाज येऊन चुकला आणि त्यांनी अत्र्यांच्या सभा बंद केल्या.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या कार्यकारिणीने १० ऑगस्टला विशाल मुंबई राज्यास एकमुखी पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. सर्वसाधारण सभेत पाठिंब्याचा ठराव भाऊसाहेब हिरे यांनी मांडला. या ठरावाला पाठिंबा दर्शविणार्या भाषणात यशवंतराव म्हणाले, ''राज्य पुनर्रचना ही कारभारविषयक सोयीची बाब समजली पाहिजे. राज्य पुनर्रचनेच्या प्रश्नाहून अधिक महत्त्वाचे प्रश्न देशाच्या विकासाचे आहेत. त्याकडे आपण लक्ष द्यायला हवे. विरोधी पक्षांनी संयुक्त आघाडी उभारण्याचे जे प्रयत्न चालविले आहेत त्यात त्यांची राजकीय दिवाळखोरी स्पष्टपणे दिसून येते. त्यांचेजवळ आर्थिक कार्यक्रम वगैरे कांही नसून लोकांच्या भावनांशी खेळण्याचे त्यांचे उद्योग चालू आहेत. यामागे काँग्रेसचा द्वेष, काँग्रेसला खाली खेचण्याचा प्रयत्न आहे.'' भाऊसाहेब हिरे यांनी द्विभाषिकाचा ठराव मांडला होता तरी त्यांची भूमिका डळमळीत होती. संयुक्त महाराष्ट्रवादी गाडगीळ आणि कुंटे यांच्या बाजूला त्यांचा कल अधिक होता.