मुंबईतील वातावरण तारीख १८ नोव्हेंबरच्या सत्याग्रहापासून तपालेले होते. त्यातच स. का. पाटील यांच्या सहाय्याने मोरारजींनी मुंबई प्रदेश काँग्रेस कमिटीला २० नोव्हेंबरला चौपाटीवर जाहीर सभा घेण्यास उद्युक्त केले. काँग्रेस पक्षाची भूमिका समजावून देण्यासाठी जाहीर सभा असे जरी म्हटले होते तरी त्यामागे हेतू वेगळाच होता. मोरारजीभाईंना खरे तर या सभेत सामील करून घ्यायला नको होते. गडबड, अशांतता, गुंडगिरी करून मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही असे मोरारजीभाईंनी भाषणात सांगितले तर स. का. पाटलांनी पुढील ५००० वर्षांत मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही असे बोलून लोकांच्या भावना भडकावल्या. सभेवर दगडफेक झाली. चपला फेकण्यात आल्या. या गोंधळामुळे महाराष्ट्र काँग्रेसचे नेते अस्वस्थ झाले. त्यांनी मोरारजी, स. का. पाटील यांना दोष देण्याऐवजी लोकांनाच दोष दिला. शंकरराव देवांनी प्रायश्चित म्हणून पाच दिवसांचे उपोषण केले.
संयुक्त महाराष्ट्र कृति समितीने २१ तारखेला हरताळ पाळण्याबाबत आदेश दिलेला होता. हा हरताळ प्रचंड प्रमाणावर यशस्वी झाला. दुसर्या दिवशी संतापलेले हजारो लोक कौन्सिल हॉलच्या रोखाने चालत निघाले. पोलीस-होमगार्ड यांनी रस्ते अडवून धरले होते. फ्लोरा फौंटनजवळ पोलीस आणि लोक यांच्यात रेटारेटी सुरू झाली. लोकांची संख्या प्रचंड असल्यामुळे त्यांना मागे रेटणे पोलिसांना अशक्य होऊन बसले. पोलिसांनी प्रथम लाठीहल्ला केला, नंतर अश्रुधुराचा वापर केला आणि पाठोपाठ गोळीबार सुरू केला. गोळ्यांना न जुमानता लोक पुढे सरकण्याचा प्रयत्न करु लागले. परिस्थिती पोलिसांच्या आटोक्याबाहेर गेली. गोळीबारात १५ लोक ठार व ३०० जखमी झाले. माणसे गोळ्यांनी मारली जात आहेत असे वृत्त कौन्सिल हॉलवर पोहोचताच एस. एम. जोशी, नौशेर भरुचा, अमूल देसाई गृहाबाहेर पडले. त्यांनी बेभान झालेल्या लोकांना आवरले. चौपाटीवर सभेला चला म्हणून सांगितले. चौपाटीवर तांतडीने सभा आयोजित करण्यात आली.
अशांत बनलेल्या परिस्थितीत सभागृहात ठरावावर चर्चा चालू ठेवणे अयोग्य वाटून यशवंतराव चव्हाण, भाऊसाहेब हिरे, बाळासाहेब देसाई, बॅ. जी. डी. पाटील हे मोरारजींना भेटले आणि चर्चा तहकुबीसाठी दिल्लीची संमती त्वरित मिळवा अशी त्यांच्याकडे मागणी केली. मोरारजीभाईंनी फोनवर संमती मिळविली व पक्षांतर्गत निर्माण झालेला पेच तात्पुरता सुटला. नोव्हेंबर २२ ला असेंब्लीत २४२ विरुद्ध २८ असे मतदान होऊन चर्चा तहकुबीला मंजुरी देण्यात आली. घटना वेगाने घडत होत्या. गुंतागुंत वाढतच होती. श्री. हिरे यांच्या निवासस्थानी नेते मंडळी जमली. सभापती नानासाहेब कुंटे हे पण प्रथा बाजूला सारून उपस्थित राहिले. महाराष्ट्र काँग्रेसच्या आदेशाप्रमाणे वागायचे की काँग्रेस वगि कमिटीची आज्ञा प्रमाण मानावयाची यावर बराच खल झाला. भाऊसाहेब हिरे यांनी चर्चेचा एकूण रंग पाहून सांगितले की, ११६ आमदारांनी आपल्याकडे राजीनामे आणून दिले आहेत. कुंटे यांनी यावर सुचविले की हे राजीनामे प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षांकडे न पाठविता सभापतींकडे पाठवून द्यावेत. कुंटे यांच्या या सूचनेशी शंकरराव देव आणि भाऊसाहेब हिरे यांनी असहमती दर्शविली. यशवंतराव चव्हाण यांनी सांगितले की, आपण काँग्रेस वगि कमिटीची आज्ञा मानणार आहोत. प्रदेश काँग्रेसच्या कांही नेत्यांच्या मताप्रमाणे वागणे आपल्याला मान्य नाही. चव्हाणांना पाठिंबा देणार्यांचे राजीनामे आलेले नव्हते. चव्हाणांच्या भूमिकेवर टीका करण्यात येऊन त्यांना विश्वासघातकी असे संबोधण्यात आले. देव हे यशवंतरावांबद्दल तुच्छतेने बोलू लागले. देवांना यापुढील सभेला बोलाविण्यात येऊ नये अशी भूमिका यशवंतरावांनी घेतली. देव आणि हिरे वाटाघाटीसाठी दिल्लीला गेल्यावर देवांचे नेतृत्व आपण झुगारून देत आहोत असे यशवंतरावांनी जाहीर केले.