साठे हुशार आणि धूर्त. त्यांनी प्रश्न टाकला की, कूपर गट निवडणुकीत उतरल्यावर त्यांच्या उमेदवारांपुढे काँग्रेसचे उमेदवार टिकतील का ? त्यावर यशवंतरावांनी उत्तर दिले, ''शंकररावजी, आम्ही फक्त एक जागा मागत आहोत, ती पण कराड-वाळव्याची. मराठा समाजाचा उमेदवार तेथे निश्चित निवडून येईल.'' सोमणांनी उमेदवारीचा प्रश्न प्रांतिकवर सोपविला. आत्मारामबापूंनी सातारा-पुणे असे बरेच हेलपाटे घातले. त्यांच्याकडून यशवंतरावांना हकिगत कळत असे. प्रांतिकला जुनी, जमीनदार माणसे हवी होती असे प्रांतिक नेत्यांशी झालेल्या चर्चेत आत्मारामबापूंना आढळून आले. अखेरीस वल्लभभाई पटेल यांना भेटून त्यांच्या कानावर सारी स्थिती घालावी असे ठरले आणि त्याची जबाबदारी यशवंतराव चव्हाण यांच्यावर टाकण्यात आली. यशवंतराव मुंबईला गेले. बाबूराव गोडसे यांच्याकडे उतरले. त्यांच्या मदतीनेच सरदार पटेलांच्या घरापर्यंत पोहोचले. वल्लभभाई हे आपले चिरंजीव डाह्याभाई यांच्याकडे उतरले होते. थोड्या प्रयासाने भेट झाली. सरदारांनी यशवंतराव चव्हाणांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले आणि शेवटी विचारले, ''तुमचा, शेतकर्यांचा प्रतिनिधी पडला तर त्याची जोखीम कोण घेणार ?'' यशवंतरावांनी तात्काळ उत्तर दिले, ''जिल्ह्यातील सर्व तरुण कार्यकर्ते जबाबदारी घेतील.'' पटेलांची मुलाखत संपली आणि यशवंतराव पुणेमार्गे सातारला परतले. त्यांनी आत्मारामबापूंसह सर्व कार्यकर्त्यांना घडलेला वृत्तांत सांगितला. यानंतर यशवंतराव शिक्षणाचे उरलेले वर्ष पुरे करण्यासाठी कोल्हापूरला गेले. चार-दोन दिवसांत त्यांना निरोप समजला की, आत्मारामबापूंची उमेदवार म्हणून निवड करण्यात आली. यशवंतरावांना आनंद झाला. आपले प्रयत्न फळाला आल्याबद्दल समाधान वाटले. ग्रामीण भागातील नेतृत्वाचा उदय होण्यास सुरुवात झाली अशी खूणगांठ त्यांनी मनाशी बांधली.
आत्मारामबापूंच्या उमेदवारीचे संबंध सातारा जिल्ह्यात स्वागत झाले. निवडणूक अटीतटीची झाली. आत्मारामबापूंच्या विरोधात अण्णासाहेब कल्याणी आणि शंकरराव मोहिते उभे राहिले. त्यांच्या जवळ पैशाची, साधनांची कमतरता नव्हती. आत्मारामबापूंचा प्रचार काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सायकलवरून, सर्व्हिस मोटारीतून हिंडून हिरिरीने केला. जिल्ह्यात काँग्रेसचे एकूण तीन उमेदवार उभे होते. एक ब्राह्मण, एक मराठा आणि एक जैनहीगेइ४नव्हती. आत्मारामबापूंचा प्रचार काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सायकलवरून, सर्व्हिस मोटारीतून हिंडून हिरिरीने केला. जिल्ह्यात काँग्रेसचे एकूण तीन उमेदवार उभे होते. एक ब्राह्मण, एक मराठा आणि एक जैन. श्री. शिराळकर, आत्मारामबापू आणि भाऊसाहेब कुदळे हे ते तीन उमेदवार. पंडित नेहरू प्रचारासाठी आले आणि त्यांच्या प्रचारसभा सातारा व कराड येथे झाल्या. कराडला कृष्णाकांठी प्रचंड सभा झाली. पंडितजींचे भाषण ऐकण्यासाठी शेतकरी लांबलांबून आले होते. त्यांच्यावर नेहरूंच्या भाषणाचा अनुकूल परिणाम झाल्याचे दिसून आले. दुसरे मोठे नेते मानवेंद्रनाथ रॉय पण प्रचारासाठी आले होते. यशवंतरावांनी त्यांना प्रथमच पाहिले आणि प्रथमच त्यांच्याशी भेट झाली. निवडणुकीचा प्रचार अत्यंत प्रभावी झाल्याने आत्मारामबापू पाटील प्रचंड बहुमताने निवडून आले. पांडुअण्णा शिराळकर पण निवडून आले. काँग्रेसला बहुमत मिळाले. तथापि मंत्रिमंडळ बनवायचे की नाही याबाबत नेत्यांत मतभेद झाले. वगि कमिटीने सत्ता राबवावी असा ठराव केल्यावर मात्र मतभेदाचे वादळ शांत झाले आणि मंत्रिमंडळाविषयी चर्चा सुरू झाली. आत्मारामबापूंना मंत्रिपद मिळण्याची शक्यता वाटत नव्हती. तथापि विधिमंडळात ते शेतकर्यांचे, गरिबांचे प्रश्न हिरिरीने मांडतील अशी खात्री सर्वांना वाटत होती. आत्मारामबापूंकडे कार्यकर्त्यांचे जाणे-येणे सुरू झाले व तेही कार्यकर्त्यांकडे येऊ-जाऊ लागले. मंत्रिमंडळ बनविण्यात आले. नरिमन यांच्याएवेजी बाळासाहेब खेरांना मंत्रिमंडळ बनविण्याची संधी देण्यात आली.