• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

यशवंतराव चव्हाण (100)

जनता पक्षातीली कुरबुरी खूपच वाढल्यावर यशवंतरावांनी अविश्वासाचा ठराव मांडण्याच्या दृष्टीने वातावरण निर्मिती केली. तथापि अविश्वासाचा ठराव दाखल करण्यापूर्वीच अंतर्गत मतभेदामुळे मोरारजींचे सरकार कोसळले. त्यानंतर राजकीय घटनांनी जोराने वेग घेतला आणि देशाचे राजकीय चित्रच बदलून टाकले. जनसंघ बाहेर पडला आणि त्याने भारतीय जनता पक्ष'' हे नांव घेतले. समाजवाद्यांनी 'जनता पक्ष' हेच नांव पुढे चालू ठेवले. चौधरी चरणसिंगांनी उचल खाल्ली आणि स्वतः मंत्रिमंडळ बनविण्याचे दृष्टीने हालचाली सुरू केल्या. जनसंघ नेत्यांशी त्यांनी बोलणी केली, त्याचबरोबर काँग्रेसच्या नेत्यांशीही बोलणी केली. गांठीभेटी सुरू झाल्या. इंदिराजींनी राजकीय खेळी खेळण्याचे ठरवून पावले टाकण्यास सुरुवात केली.

विरोधी पक्ष नेत्याची जबाबदारी पार पाडताना यशवंतरावांचे संसदपटुत्वाचे वैशिष्ट्य खुलून दिसले. लोकसभा गृहातले त्यांचे वक्तव्य अथवा भाषण अभ्यासपूर्ण आणि वस्तुनिष्ठ असायचे. भाषण प्रभावी व्हायचे. प्रसंगावधान, वैचारिक समतोलपणा, समोरच्या बाकावरील (विरोधी) सदस्यांना विश्वासात घेण्याचे कसब यामुळे सगळेजण त्यांना मातब्बर संसदपटू म्हणायचे. लांबलचक भाषण करणे किंवा प्रवचन देणे हे कटाक्षाने टाळून यशवंतराव मोजके आणि प्रसंगोचित असेच बोलायचे. संरक्षणमंत्री, गृहमंत्री, अर्थमंत्री आणि विरोधी पक्ष नेतेपदावरून लोकसभेत त्यांनी प्रश्नांना ज्या पद्धतीने उत्तरे दिली, चर्चांना ज्या पद्धतीने उत्तरे दिली, प्रतिस्पर्ध्यांचे हल्ले ज्या पद्धतीने परतावून लावले त्यातून त्यांचे संसदीय नैपुण्य पुरेपूर दिसून आले. अटलबिहारी बाजपेयी, प्रा. हिरेन मुखर्जी, प्रा. एन. जी. रंगा, एन. दांडेकर, मिनू मसानी. गोपालन, मधोक यांच्यासारखे विरोधी पक्षांचे खंदे खासदार गृहाच्याबाहेर भेटले की यशवंतरावांची मुक्त कंठाने स्तुती करायचे. पंतप्रधान इंदिरा गांधी मात्र मनातून किल्मिष ठेऊन वागत, बोलत असत. यशवंतरावांची राजनीती आणि मुत्सद्देगिरी यशस्वी होऊ नये म्हणून इंदिरा गांधींनी शक्य ती खबरदारी घेतली होती. पंडित नेहरूंची भूमिका आणि राजवट लोकशाहीवादी होती. इंदिरा गांधींची भूमिका व राजवट एकतंत्री अथवा एकाधिकारशाहीची होती. म्हणूनच त्यांच्या राजवटीत काँग्रेसचे स्वरूप बदलले आणि राज्यकारभाराचेही.

नेहरू आणि शास्त्रीजींनी यशवंतरावांना मानाने, प्रतिष्ठेने, आदराने वागविले. इंदिराजींची वागणूक दुटप्पी असायची. काँग्रेसमधील चांगल्या, गुणी, कर्तबगार नेत्यांना त्यांनी नेस्तनाबूत करून स्वतःची प्रतिमा उभी करण्याचा कसोशीने प्रयत्‍न केला. ''इंदिरा म्हणजे भारत'' (इंदिरा इज इंडिया) असे आपल्या सहकार्‍यांनी म्हणावे येथपर्यंत त्यांची मजल गेली. बँकांच्या राष्ट्रीयकरणासाठी, संस्थानिकांचे तनखे रद्द करण्यासाठी चव्हाणांनी प्रयत्‍न केले, खटपटी केल्या आणि त्याचे श्रेय मात्र इंदिराजींनी उपटले. आणीबाणीबद्दल मौन बाळगण्याची भूमिका घेवून, तसेच मोरारजींचे अर्थमंत्रिपद काढून घेण्याच्या इंदिराजींच्या निर्णयाबद्दल मौन बाळगून यशवंतरावांना आपला राजकीय पराभव मान्य करावा लागला. राजकारणात पराभव होतात. पण ज्यांच्या पाठीशी शक्ती उभी करून पंतप्रधानपदावर आरूढ होण्यास मदत केली त्या इंदिरा गांधींनीच सातत्याने यशवंतरावांबद्दल आपला स्पर्धक या कल्पनेने मनात शंका व भीती बाळगली. त्यांच्या अधिक मोठे होण्यात अडथळे आणले. यशवंतरावांना उपपंतप्रधानपद स्वीकारण्याचा आग्रह करण्यामागे त्यांचा कोणता हेतू होता हे सर्व संबंधितांना नंतर उशीरा कळले. चरणसिंग यांचे सरकार अल्पावधीतच पाडायचे, नव्याने निवडणूका घ्यायला लावायचे आणि यशवंतरावांना पंतप्रधान होण्याची संधी मिळू द्यायची नाही असा इंदिराजींचा डाव होता.