पुढारी विरुद्ध कार्यकर्ते
बदलत्या काळाचे भान ठेवून पक्षश्रेष्ठींनी शेतक-यांचा प्रतिनिधी असलेल्या आत्माराम बापू पाटील या तरुण कार्यकर्त्याला निवडणुकीचे तिकीट द्यावे, असा प्रयत्न यशवंतरावांनी केला. जिल्हा-पातळीवर त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही. सोमण-गोसावी प्रभृतीचा कल जुन्या ब्राह्मणेतर पक्षातल्या कूपर गटाकडे होता. एका अर्थाने पुढारी व कार्यकर्ते यांच्यांत एक संघर्ष उभा राहिला होता. ग्रामीण महाराष्ट्रात नव्या विचाराने भारलेली व नव्या शक्तीने संघटित झालेली नवीन माणसे उभी राहिली आहेत, हे सत्य स्वीकारायला प्रांतिकचेही पुढारी तयार नव्हते. शेवटी सरदार पटेल यांनाच प्रत्यक्ष भेटून आपले म्हणणे सांगण्याचे धाडस यशवंतरावांनी केले. नव्या उमेदवाराच्या यशाची हमी त्यांनी कार्यकर्त्यांच्या वतीने सरदारांना दिली. सरदारांनी त्यांचा प्रस्ताव स्वीकारला.
यशवंतरावांनी आत्माराम बापूंच्या उमेदवारीवर केलेले भाष्य त्यांच्या त्या वेळच्या मनःस्थितीचे द्योतक होते. ते लिहितात :
''जनजीवनाला ढवळून काढणा-या एका आंदोलनानंतर त्या आंदोलनात सैनिक असलेल्या कार्यकर्त्यांला जर लोकप्रतिनिधी म्हणून मान्यता मिळाली नसती, तर त्या आंदोलनाचा तो अपमान झाला असता... सातारा जिल्ह्यातील नव्या ग्रामीण नेतृत्वाचा उदय या उमेदवारीने केलेला आहे, ही ऐतिहासिक वस्तुस्थिती आहे. ही उमेदवारी आत्माराम पाटलांना न मिळता जर जुन्या ब्राह्मणेतर चळवळीतील कुणा जुन्या प्रतिष्ठिताला मिळाली असती, तर चळवळीमध्ये एक प्रकारचे निराशेचे वातावरण निर्माण झाले असते'' (कित्ता, १७६).
विधिमंडळात गोरगरीब शेतक-यांचे प्रश्न पोटतिडकीने मांडण्यासाठी त्यांचेच प्रतिनिधी निवडून जाणे आवश्यक आहे, हे सूत्र पकडून यशवंतराव आणि त्यांचे सहकारी यांनी प्रचार केला. आत्माराम बापू निवडून आले.
पण लवकरच यशवंतरावांच्या हे निदर्शनास आले, की पक्षश्रेष्ठींच्या शहरी उच्चभ्रू भूमिका आणि देशाची परतंत्र अवस्था यामुळे विधिमंडळाच्या द्वारे ठोस काहीही घडून येण्याची मुळीच शक्यता नाही. ही परिस्थितीच पालटणे आधी आवश्यक आहे आणि चळवळीचा रेटा वाढवूनच ती पालटणे शक्य आहे; आणि अल्पावधीतच चळवळीतून राष्ट्रीय स्वातंत्र्य-लढ्याची ताकद वाढवण्याची संधी १९४२ च्या 'चले जाव' आंदोलनाने चव्हाणांसमोर चालून आली.