यशवंतराव चव्हाण राजकारण आणि साहित्य - १०२

''साहित्य कोणत्याही रंगाचे असले, तरी चालेल, पण आजूबाजूच्या परिस्थितीचा डोळसपणे अभ्यास करून समाजात सर्व स्थरांत निर्माण झालेल्या अस्वस्थतेची जाणीव असणारे समाजचिंतन त्यात असले पाहिजे.'' ('ॠणानुबंध', २०७).

त्यांच्या मते जे वाङ्मय मानवाच्या मूलभूत सद्भावनांना आवाहन करते आणि मानवाला जीवनसंघर्षासाठी समर्थ बनविते, ज्यामुळे समाज नित्य प्रगतीला अभिमुख राहतो, तेच अक्षर वाङ्मय या संज्ञेस पात्र ठरते. (कित्ता, २००).

यशवंतराव दलित साहित्याचे स्वागत करतात, समर्थन करतात.  दलितांच्या राजकीय हक्कांना सामाजिक बळ न लाभल्यामुळे आपल्या समाज-जीवनात जो विसंवाद व संकुचितपणा निर्माण झाला आहे, त्याची दलित साहित्य ही अपरिहार्य फुलश्रुती आहे, असे त्यांना वाटते.  दलित साहित्यिकांनी मराठी साहित्यक्षेत्रात मोलाची भर घातली, हेही ते खुल्या मनाने मान्य करतात.  

''उच्चभ्रू साहित्याचे किंवा त्यांच्या संकल्पनांचे मानदंड लावून (दलित साहित्याला) जोखणे चुकीचे आहे.  उच्चभ्रू साहित्यात पाश्चात्य वळणाची अश्लीलता आपणाला चालते, दलित समाजातून येणा-या साहित्यिकांच्या भाषेस मात्र आपण नाके मुरडतो.  हा नैतिक भेदभाव आहे, दुहेरी मानदंडाची भावना त्यामगे आहे.''  (कित्ता, २१०) अशा शब्दांत दलित साहित्याची तरफदारी यशवंतरावांनी केली आहे.

दलित साहित्यिकांच्या भाषेला अशिष्ट व ओंगळ ठरवणा-या समीक्षकांना कानपिचक्या देऊन यशवंतराव त्या भाषेचे कार्यकारण दर देतातच, शिवाय या नव्या प्रवाहातून मराठी भाषेला व समाजाला होणार असलेल्या संभाव्य फायद्यांचे संसूचनही करतात.  त्यांच्या मते भाषेचे माध्यम जर अभिव्यक्तीसाठी असेल, तर तिचा सामाजिक अभिव्यक्ती हाही एक अविभाज्य भाग मानणे क्रमप्राप्तच ठरते.  हजारो वर्षे दडपल्या गेलेल्या समाजाचा पहिला उद्गार निघाला, हेच सामाजिकदृष्ट्या महत्त्वाचे असल्यामुळे आपण त्याचे स्वागत करायला पाहिजे, असे यशवंतरावांना वाटते.  हजारो वर्षांचे संस्कार अशा अभिव्यक्तीतून बाहेर पडले, तर ते सामाजिकदृष्ट्या आरोग्यादायक ठरेल, उपेक्षित सामाजिक स्थरांच्या भावनांची कोंडी फुटून त्याचा सामाजिक सुधारणेसाठी व सामाजिक प्रक्रियेसाठी उपयोग होऊ शकेल, अशी खात्री ते बाळगतात.  त्यांच्या मते त्या समाजगटांचे एकूण समाज-व्यवस्थेसंबंधीचे मत, त्यांचा अनुभव इत्यादींचे जे आविष्करण दलित साहित्यातून घडते, त्याचा उपयोग समाजव्याधींवर इलाज करू पाहणा-या सुधारकांना निश्चित होऊ शकेल. अशा प्रकारे साहित्यबाह्य निकषांसाठीही दलित साहित्य त्यांना मौल्यवान वाटते.