संरक्षणमंत्री म्हणून १९६४ मध्ये यशवंतरावांनी रशियाला पहिली भेट दिली. त्या वेळी आपली मनःस्थिती कशी विशेष होती, याचे त्यांनी वर्णन केले आहे. त्यात तिथल्या समाजवादी समाजरचनेविषयीची जिज्ञासा व आकर्षण तर होतेच; पण लेनिन आणि टॉलस्टॉय या दोन सुपुत्रांची मायभूमी पाहण्याची ओढ त्यांना तीव्रतेने जाणवत होती. आपल्या देशासाठी युद्धसाधनांची जोडणी करण्याच्या हेतूने तिथे गेलेल्या या संरक्षणमंत्र्याच्या मनाला शांततेच्या संदेशाने भारले होते. या त्यांच्या विरोधाभासात्मक विकल मनःस्थितीचेच वर्णन त्यांनी 'शांतिचितेचे भस्म' या आपल्या लेखात केले आहे. या लेखाबद्दल प्रस्तावनेत ते म्हणतात,
''दुस-या महायुद्धात प्रत्यक्ष रणभूमी झालेल्या रशियाने लक्षावधी माणसांचे बलिदान केले होते. शत्रूशी लढताना आवश्यक असलेल्या पराकोटीच्या शौर्याचे जसे तेथे दर्शन होत होते, त्याचप्रमाणे युद्धाग्नीमुळे होणा-या संहाराची प्रतिक्रिया म्हणून उचंबळून येणारा माणुसकीचा गहिवरही क्षणाक्षणाला जाणवत होता. त्या भारावलेल्या मनःस्थितीत तो लेख तयार झाला.'' (कित्ता, ६).
लेखकाच्या मनाच्या या भारावलेपणाची साक्ष या लेखातील शब्दाशब्दांतून वाचकाला मिळते. वोल्गा नदीच्या काठावर त्यांनी अनुभवलेले क्षण अत्यंत भावस्पर्शी शब्दांत त्यांनी नेमके पकडले आहेत. वोल्गाच्या प्रवाहात त्यांना जगन्मातेचे दर्शन घडले होते. ते लिहितात,
''वोल्गाच्या तीरावरील वोल्गागार्ड हे जगातील एक जागृत तीर्थ आहे. रशियातील यच्चयावत मानवता येथे साकार झाली आहे.''
दुस-या महायुद्धात वोल्गाच्या तीरावर जी अभूतपूर्व रणधुमाळी झाली तिचे वर्णन करून ते म्हणतात :
'' 'लाल' क्रांतीतही हिमशुभ्र राहिलेली वोल्गा या धुमाळीत लालीलाल झाली. शूरमर्दिनी भू-माता आरक्त बनली आणि नंतर रक्तलांछित होऊन काळीठिक्कर पडली. तिच्या आश्रयाला कोणी जीवजिवाणू उरले नाही.''
जगात अनेक युध्दे झाली. तरी वोल्गाकाठावरचे युद्ध अद्वितीय होते, हे सांगताना यशवंतराव वर्णन करतात,
''रक्ताचे सडे सांडले, हाडांची माती झाली. तेथे कोण कोणासाठी संपला, हा हिशेब निरर्थक आहे. जे घडले, त्यामुळे रक्तमांसाचा चिखल झाला. ह्या चिखलात माणुसकी कुजून गेली. सजीवता उगवेनाशी झाली. पिढीच्या पिढी निराधार झाली. सारे सारे उदास, भकास, भयाण आणि भयंकर झाले.''
आजही अखंड वाहत असलेली वोल्गा त्या भीषण इतिहासाचे स्मरण देते. यशवंतरावांना वोल्गाकाठी तिचे शब्द स्पष्टपणे ऐकू आले होते. (कित्ता, १२४)