चौफेर अखंड वाचन
ललित लेखक होण्याचे आपले स्वप्न यशवंतरावांना आपल्या सामाजिक-राजकीय जीवनाच्या धावपळीत बाजूला ठेवून द्यावे लागले असले, तरी मनात खोलवर रुजलेल्या वाङ्मयीन संस्कार मात्र कधीच मिटला नाही. उभ्या हयातीत ते जे जे बोलले वा त्यांनी जे काही पांढ-यावर काळे केले, त्यातून हा संस्कार प्रगट होत राहिला, मुख्य म्हणजे कोणताही अनुभव तादात्म्य पावून घेण्याची जी क्षमता या संस्कारातून त्यांच्या अंगी आली, ती तर त्यांच्या शब्दाशब्दांतून आविष्कृत झाली आहे. राजकारणात हयात घालवली, तरी त्यांचे व्यक्तिमत्त्व कधीच एकारले नाही, याचे श्रेयही या संस्कारालाच द्यावे लागते. राजकारण हे आपले संपूर्ण जीवन आहे, असे त्यांनी कधीच मानले नाही. कला, साहित्य, संगीत, खेळ, नाट्य या सर्व क्षेत्रांत त्यांनी रस घेतला. जीवनाच्या सर्व दालनांच्या सतत संपर्क-साहच-यातून आपल्या व्यक्तिमत्त्वाची चैतन्यभूक ते भागवीत राहिले.
वाचक ही आपली साहित्यक्षेत्रातली प्राथमिक भूमिका तर यशवंतरावांनी अत्यंत निष्ठेने व चोखपणे पार पाडलेली आढळते. त्यांच्या वाचनासंबंधीचे त्यांच्या लेखनभाषणांतून आलेले संदर्भ नुसते जरी एकत्र केले; तरी त्यांच्या जिज्ञासेच्या कथा किती विशाल होत्या, याचा प्रत्यय मिळतो. उल्लेख न झालेल्या पुस्तकांची संख्या तर कित्येक पटींनी मोठी असावी. मनाची केव्हाही विश्रब्ध अवस्था झाली, की पुस्तक काढून वाचीत बसणे, प्रवासात नवनवीन पुस्तके नजरेखालून घालणे हा यशवंतरावांचा- आपल्याकडच्या राजकारण्यांमध्ये अतिदुर्लभ असलेला- छंद होता. वैचारिक लेखनाबरोबरच कथा, कविता, कादंबरी वगैरे साहित्य-प्रकारही ते साक्षेपाने वाचीत असत. 'आपल्याला आवडलेले पहिले पुस्तक पहिल्यांदा कसे आणि केव्हा वाचले, याची आठवण मनात ताजी असते. हे पुस्तक आपल्या हातात घेऊन कसे कुरवाळले.... नव्या को-या पुस्तकाला येणारा सुरेखसा वास कसा येत होता-' ही खास ग्रंथप्रेमी माणसालाच पटणारी खूणगाठ सांगून आपण खांडेकरांची 'दोन ध्रुव' कोल्हापुरातल्या भुसारी वाड्यातील खोलीत एका पावसाळी दुपारी वाचली, ही आठवण यशवंतराव कित्येक वर्षानंतर आळवून सांगतात (कित्ता, २४८). खांडेकरांच्या लेखन-वैशिष्टयांचा परिचय देताना त्यांच्या कादंब-यांमधील पात्रे, प्रसंग व संवादांचा हवाला आपल्या उत्स्फूर्त भाषणातून ते देतात, तेव्हा त्यांच्या सूक्ष्म आस्वादक वाचकत्वाचीच साक्ष मिळते. त्यांच्या भाषणांत महानुभाव, मराठी संत, अव्वल दर्जाचे आंग्ल नाटककराव-कवी, आधुनिक मराठी नाटककार-कवी, अन्य क्षेत्रांतील कलावंत- एवढेच नव्हे, लोकजीवनाशी एकरूप झालेले गोंधळी-वासुदेव प्रभृती लोककलावंत, इत्यादिकांचे नाना प्रकारचे संदर्भ आलेले आढळतात. त्यावरून त्यांच्या चौफेर व चतुरस्त्र ग्रहणशक्तीची साक्ष पटते. स्वतः ते साहित्याच्या सामाजिक बांधिलकीचे पुरस्कर्ते असल्यामुळे तसे साहित्य त्यांना विशेष आवडत असले, तरी रोमँटिक साहित्याचेही त्यांना वावडे नव्हते. नारायण सुर्वे आणि ना. धों. महानोर या दोघांचीही कविता ते सारख्याच चवीने वाचीत.