उपकारक सामाजिक पार्श्वभूमी आणि स्वकष्टार्जित बौद्धिक तयारी या गोष्टींमुळे यशवंतराव समाजवादाचा विचार सहज समजावून घेऊ शकले. सत्यशोधक चळवळीने अप्रत्यक्षतः एक नवा ध्येयवाद त्यांच्या मनात पेरलेलाच होता. क्रांतिकारक विचारसरणी स्वीकारण्याची पूर्वपीठिका त्यातून तयार झाली होती. सावकारी पाश, कुळांची कायम ससेहोलपट वगैरे जे शेतकरी समाजाचे जिव्हाळ्याचे आर्थिक प्रश्न होते, त्यांकडे जिल्हा व प्रांतिक काँग्रेसचे नेते दुर्लक्ष करतात, हे पाहून यशवंतराव अस्वस्थ होत असत. १९३१ साली मसूर (तालुका कराड) गावी भरलेल्या राजकीय परिषदेत एका ठरावाला उपसूचना मांडून माधवराव बागड यांनी जेव्हा राजकीय मागण्यांच्या जोडीला काही आर्थिक मागण्या ठरल्या, तेव्हा तांत्रिक अडचणी पुढे करून नेत्यांनी त्या डावलल्या, हे यशवंतरावांना खटकले होते. त्यांनी खुल्या अधिवेशनात बागलांना पाठिंबा दिला होता. शेतकरी समाजाच्या तातडीच्या प्रश्नांबद्दलही परिषद काहीच बोलणार वा करणार नसेल, तर शेतकरी समाजाने स्वातंत्र्य-आंदोलनात घेतलेला भाग फुकट जाईल, अशी त्यांची भावना झाली होती. आपल्या आत्मचरित्रात ते याबद्दल लिहितात :
''शहरातल्या पांढरपेशा वर्गातील कार्यकर्त्यांना व पुढा-यांना राजकीय स्वातंत्र्य प्रिय होते, पण त्यातून उद्भवणारे सामाजिक व आर्थिक प्रश्न त्यांना नको होते, असा अर्थ मी मनाशी काढला आणि माझे मन अतिशय कष्टी झाले.'' ('कृष्णाकाठ', १०३)
समाजातील आर्थिक व सामाजिक संबंध आमूलाग्र बदलल्याशिवाय स्वातंत्र्य अर्थपूर्ण ठरणे शक्य नाही, अशी त्यांची खात्री झाली. ('विण्डस् ऑफ चेंज', १५७).
सामान्य स्तरातील जीवनानुभव यशवंतरावांना समाजवादाच्या दिशेने असा घेऊन जात असतानाच वैचारिक अंगानेही समाजवादाचे संस्कार मिळण्याची संधी त्यांना प्राप्त झाली. १९३२-३३ साली यशवंतराव विसापूर कारागृहात होते. तिथे त्यांची बारा नंबरची बराक म्हणजे यशवंतरावांच्या बौद्धिक जडणघडणीची संस्कारशाळाच ठरली. आचार्य भागवत, रावसाहेब पटवर्धन, अतीतकर, मामा गोखले, वि. म. भुस्कुटे, एस. एम. जोशी, ह. रा. महाजनी प्रभृती अभ्यासू राजकीय नेत्यांच्या सहवासात अनेक विषयांचा अभ्यास करण्याची संधी त्यांना मिळाली. विविध विचारसरणींचा सविस्तर व तौलनिक अभ्यास त्यांनी केला. गांधीवाद, साम्यवाद, समाजवाद, मार्क्सवाद, वगैरे 'राजकीय विचारांच्या वेगवेगळ्या छटा आणि त्यांचा परस्परांशी संबंध' त्यांना स्पष्ट झाला. वाचन-चिंतन-मनन आणि विचारविमर्श यांमधून विविध विचारसरणींच्या तात्त्वि आधारांचे इतके पिंजण तुरुंगात झाले, की बाहेर पडताना आपण केवळ काँग्रेसवाले राहिलो नसून समाजवादी निष्ठेची जोड घेऊन आलो आहोत, अशी खुद्द यशवंतरावांची धारणा झाली होती ('कृष्णाकाठ', १८२).