इंदिराजींचा रोष
त्या वेळी श्रीमती गांधींचा राग यशवंतरावांवर होता. कारण किमान ते तरी आपण राष्ट्रपतिपदासाठी सुचवलेल्या नावाला पाठिंबा देतील, ही त्यांची अपेखा, यशवंतरावांनी खोटी ठरवली होती. (द्वा. भ. कर्णिक, पूवोक्त, १०३). यशवंतरावांचे राजकारण बव्हंशी नैतिकतेचे राहत आल्यामुळे संजीव रेड्डींच्या नावाला पाठिंबा देण्याबद्दल आपण शब्द दिला आहे, शिवाय श्रीमती गांधींनी नाव सुचवण्यापूर्वी आपल्याला विश्वासात घेतलेले नाही, तेव्हा त्यांनी सुचवलेल्या नावाला पाठिंबा देण्याची नैतिक जबाबदारी आपल्यावर नाही, अशी नैतिकदृष्ट्या रास्त भूमिका यशवंतरावांची होती. पण ही नैतिकता श्रीमती गांधींना मुळी राजकारणात अभिप्रेतच नव्हती. त्या पूर्णपणे कौटिल्याच्या शिष्या होत्या. बंगलोर अधिवेशनाच्या आधी हैदराबादेत झालेल्या अधिवेशनापासूनच यशवंतरावांबद्दल इंदिराजी संयशग्रस्त झालेल्या होत्या. ते कार्यकारिणीत आपली माणसे भरण्याच्या प्रयत्नात श्रेष्ठींशी संगनमत करीत आहेत, असा इंदिरा गांधींचा समज झाला होता. कारण वसंतराव नाईकांना कार्यकारिणीत घेण्यासाठी यशवंतरावांनी खटपट केली होती. बंगलोर अधिवेशनात त्यांनी रेड्डींच्या नावाला पाठिंबा दिल्यामुळे तो बळावला श्रीमती गांधींनी चव्हाणांना 'श्रेष्ठीं'च्या यादीत जमा करून टाकले. चव्हाणांच्या या कथित 'विश्वासघाता'मुळे त्या अधिकच दुखावल्या. प्रहार त्यांना चव्हाणांवरच करायचा होता; पण डावपेचाच्या दृष्टीने त्यांनी तो मोरारजींवर केला, कारण चव्हाण त्या मानाने प्रबळ प्रतिस्पर्धी होते. (कित्ता, १०४).
श्रीमती गांधींची पुरोगामी प्रतिमा दिवसेंदिवस तेजाळत होती. बँका यापुढे सामान्यांच्या हितासाठी राबणार, मोरारजी वगैरे झारीतले शुक्राचार्य होते, निजलिंगप्पा व स. का. पाटील हे जनसंघ व स्वतंत्र या उजव्या पक्षांच्या कच्छपी लागले आहेत, ही सर्व ज्येष्ठ मंडळी काँग्रेस पक्षाच्या तत्त्वाशी द्रोह करीत आहेत, वगैरे गोष्टींचा प्रभावी प्रचार सुरू झाला होता. काँग्रेसची मूल्ये व तत्त्वे तुडवणा-या या लोकांमागे उभे राहण्याची सक्ती इंदिराजी काँग्रेसजनांना कशी करणार ? त्यांचा उमेदवार निवडणे म्हणजे त्यांची तत्त्वच्युती पुरस्कारणेच ठरेल ! म्हणून श्रीमती गांधींनी फतवा काढला, की या अपवादात्मक प्रसंगी आमदार-खासदारांना त्यांच्या 'स्वतःच्या' सदसद्विवेक बुद्धीच्या निर्णयाबरहुकूम राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत मतदान करण्याचे स्वातंत्र्य असेल ! याचा अर्थ स्पष्ट होता, पक्षाच्या अधिकृत उमदेवाराला मत न देता गिरींना मत द्यावे, ही श्रीमती गांधींची इच्छा स्पष्ट होती.
परिणाम असा झाला, की पक्षाचा अधिकृत उमेदवार पडला आणि गिरी राष्ट्रपती झाले. सिंडिकेटने जळफळाट केला. श्रीमती गांधींविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करायचे त्यांनी ठरवले. पण श्रीमती गांधींनीच डाव त्यांच्यावर उलटवला. संघटना काँग्रेस आणि सत्तारूढ काँग्रेस अशी पक्षाची दोन शकले झाली. लोकप्रियतेच्या व निवडणूकयशाच्या बळावर आपलाच पक्ष म्हणजे खरी काँग्रेस आहे, हे श्रीमती गांधींनी सिद्ध केले.