• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

यशवंतराव चव्हाण राजकारण आणि साहित्य - ३६

संयुक्त महाराष्ट्राची स्थापना

संयुक्त महाराष्ट्राच्या प्रतिष्ठापनेने यशवंतरावांच्या राजकीय कारकीर्दीचे सुवर्णयुग सुरू झाले.  ग्रामीण व जनसामान्य संस्कृतीचे पाथेय आणि सामाजिक परिवर्तनाची सुस्पष्ट वैचारिक दिशा यांच्या आधारे महाराष्ट्राच्या राजकारणात काही तरी मौलिक कार्य त्यांच्या हातून घडून येईल, अशा अपेक्षा निर्माण झाल्या होत्या.  खुद्द यशवंतरावांनी त्याप्रसंगी केलेल्या भाषणांनी या अपेक्षांना खतपाणी घातले होते.

यशवंतरावांनी संयुक्त महाराष्ट्रासमोरील साध्ये निर्धारित करताना प्रादेशिक असंतुलन दूर करण्याला अग्रक्रम दिला होता.  विदर्भ, मराठवाडा व कोकण या अप्रगत भागांचा इतिहास, भूगोल व अर्थकारण लक्षात घेऊन त्यांच्या विकासाचे कार्यक्रम हाती घेणे, त्यांच्या मनातले पूर्वग्रह व संशय यांचे निराकरण करून त्यांचा विश्वास संपादणे हे त्यांच्या दृष्टीने सर्वाधिक महत्त्वाचे होते.  कारण त्याखेरीज उर्वरित महाराष्ट्राशी हे प्रदेश एकरूप होणार नाहीत, याची त्यांना जाणीव होती.  जातीयवादाने भंगलेले सामाजिक जीवन सांधणे हे त्यांच्या मते दुसरे आव्हान होते.  'हे राज्य मराठी, की मराठा ?' या प्रश्नाचे निःसंदिग्ध 'मराठी' असे उत्तर त्यांनी दिले होते.  औद्योगिक विकास आणि शेतीसुधारणा या दोहोंबद्दलचे काही आखाडे यांनी बांधले होते.  औद्योगिक विकासात प्रादेशिक संतुलन राखले जावे, शहरे व खेडी यांच्यांतील अंतर कमी व्हावे, शेतीमालावर प्रक्रिया करणारे उद्योग ग्रामीण भागात सुरू व्हावेत, मराठी-अमराठी भ्रातृभाव वाढीस लागावा; कूळकायदा, कमाल जमीनधारणा, भू-संधारण, जमिनींचे फेरवाटप, वीज व पाणी यांचा पुरावठा, आधुनिक शेतीपद्धती वगैरेंबरोबरच शेतक-यांचा सर्वांगीण विकास व्हावा व त्यांच्या ठिकाणी औद्योगिक मानसिकता, नवी मूल्य-व्यवस्था व जीवनदृष्टी विकसित व्हावी, अशी काही उद्दिष्टे यशवंतरावांनी निर्धारित केली होती.

महाबळेश्वरच्या पक्षकार्यकर्त्यांच्या शिबिरात सामान्य नागरिकांच्या दृष्टीने नियोजनाचा विचार मांडताना, आहे त्या साधनांचा जास्तीत जास्त विकास करून जीवन समृद्ध करणे हा नियोजनाचा अर्थ यशवंतरावांनी सांगितला होता.  विकासाचा मेळ सामाजिक न्यायाशी घालवण्यासाठी शासनयंत्रणेने कालसंगत बदलले पाहिजे, यावर त्यांनी विशेष भर दिला होता.  सहकार आणि विकेंद्रीकरण ही नवसमाजरचनेची साधने ठरावीत, त्यांच्याद्वारे सामान्यांच्या गरजा भागवल्या जाव्यात, नवे सुसंस्कारित नेतृत्व पुढे यावे, अशा यशवंतरावांच्या अपेक्षा होत्या.

यशवंतरावांनी संयुक्त महाराष्ट्रासंबंधी केलेले हे स्वप्नरेखाटन सत्यसृष्टीत उतरेल, असे वाटण्याजोगी राजकीय परिस्थिती त्या काळात झाली होती.  विरोधी पक्षांच्या संघटित विरोधाची धार महाराष्ट्र निर्मितीनंतर बोथट होऊ लागली होती.  सत्तारूढ पक्षाशी सहकार्य किंवा मैत्रीपूर्ण संवाद करण्याच्या मनःस्थितीत अनेक विरोधी पक्ष होते.  यशवंतरावांच्या पुरोगामी पवित्र्यांचा निमित्तमात्र आधार घेऊन विरोधी पक्षांमधील अनेक वजनदार नेत्यांनी यशवंतरावांच्या अपेक्षेनुसार काँग्रेसप्रवेश घ्यायला प्रारंभ केला होता.  प्रसप आणि शेकापला विशेष गळती लागली होती.  रिपब्लिकन पक्षातील अंतर्गत यादवी गतिमान करण्यात यशवंतराव यशस्वी ठरले होते.