• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

यशवंतराव चव्हाण राजकारण आणि साहित्य - २१

२.  यशवंतराव आणि महाराष्ट्राचे राजकारण

यशवंतराव चव्हाण आणि महाराष्ट्राचे राजकारण यांच्यामधील अन्योन्याश्रयी संबंध देशात बिनतोडच म्हणावे लागतील.  एक नेता आणि एक राज्य यांच्या राजकीय वाटचालीची इतकी घनिष्ठ सांधेजोडे इतक्या प्रदीर्घ कालावधीसाठी अन्यत्र क्वचितच घडलेली असावी.  यशवंतराव महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात नऊ वर्षे होते किंवा मुख्यमंत्रिपदावर सहा वर्षे होते, एवढ्यापुरता हा संबंध मुळीच सीमित नव्हता.  गृहखात्याचे सांसदीय सचिव म्हणून यशवंतराव जगाला माहीत होण्याच्या कित्येक वर्षे आधीपासून ते आपल्या पद्धतीने आपल्या मर्यादित कार्यक्षेत्रात महाराष्ट्राच्या राजकारणाला वळण देण्याची धडपड करीत आले होते आणि १९६२ साली देशाचे संरक्षणमंत्री म्हणून दिल्लीला गेल्यानंतरसुद्धा महाराष्ट्राच्या राजकारणावर यशवंतरावांची पकड अनेक वर्षे कायम होती.  तसे पाहू गेल्यास त्यांचे निधन होईपर्यंत त्यांच्याशी इमान ठेवून असणारा एक शक्तिप्रवाह मराठी राजकारणात कमी-अधिक प्रभाव गाजवीतच होता.  त्यामुळे यशवंतराव आणि महाराष्ट्राचे राजकारण या विषयाचा परामर्श घ्यायचा, तर उण्यापु-या अर्ध्या शतकात घडून गेलेल्या घडामोडींचा संदर्भ अपरिहार्यतः घ्यावा लागेल. 

यशवंतरावांची राजकीय वाटचाल निष्कंटक कधीच नव्हती.  उलट, ती धकाधकीचीच होती.  कमाल लोकप्रियता आणि तितकीच लोकनिंदा दोहोंचा वर्षाव चव्हाणांवर झाला होता.  महाराष्ट्राच्या राजकारणाने अत्युत्कट आनंदाचे क्षण जसे त्यांना उपभोगायला दिले, तद्वतच अवहेलनेचे व मानहानीचे दाहक अनुभवही त्यांच्या पदरात घातलेले आहेत.  'महाराष्ट्रात काँग्रेस जिवंत ठेवणारे धुरंधर मुत्सद्दी' असे गौरवोद्गार जसे त्यांच्या वाट्याला आले, त्याचप्रमाणे 'महाराष्ट्राचे मारेकरी, विश्वासघातकी सूर्याजी पिसाळ' अशा शेलक्या विशेषणांनी त्यांची निर्भत्सनाही मराठी माणसांनी प्रसंगोपात्त केली आहे.  महाराष्ट्राचे राजकारण करीत असताना त्यांनी संकुचित प्रांतनिष्ठेपेक्षा व्यापक राष्ट्रनिष्ठेला सदैव प्रमाण मानल्याचे सांगून त्यांच्या चुकांवर पांघरूण घालणारे राजकीय भाष्यकार जसे आढळतात, तसेच अखिल भारतीय पातळीवर एकाहून एक वरचढ महत्त्वाच्या भूमिका पार पाडीत असतानाही चव्हाण आपल्या संकुचित प्रादेशिक प्रतिमेच्या चौकटीतून बाहेर पडू शकले नाहीत, असा बोल लावणा-या टीकाकारांचीही कधीच वाण भासत नाही.

बौद्धिक वकूब आणि शैलीदार आविष्कारशक्ती अंगी असूनही चव्हाणांनी आपल्या आक्षेपकांना प्रत्युत्तर दिल्याचे सहसा कधीच आढळत नाही.  वेळोवेळी वादास्पद ठरलेल्या त्यांच्या भूमिका, विधाने वा निर्णय यासंबंधी त्यांची अधिकृत भूमिका त्यांनी कुठेच संगतवार नमूद करून ठेवलेली सापडत नाही.  त्यांच्या राजकीय वर्तनाच्या संदर्भात असंख्य प्रश्न अभ्यासकांना पडतात.