''.... आज पन्नास वर्षानंतरही हे मी कबूल केले पाहिजे की माझ्या आजपर्यंतच्या अनुभवाने ही कसोटी माझ्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाची आणि व्यवहार्य कसोटी म्हणून नित्य वावरत राहिली आहे.'' ('कृष्णाकाठ', १८५)
आयुष्यात जेव्हा जेव्हा त्यांच्यासमोर दोन वा अधिक प-यायांमधून एकाची निवड करण्याचा प्रसंग आला, तेव्हा त्यांनी याच कसोटीवर निर्णय घेतला. रॉयवादी, शे. का. पक्ष व समाजवादी हे गट काँग्रेसबाहेर पडले, त्या प्रत्येक वेळी काँग्रेसमध्येच राहण्याचा त्यांचा निर्णय आणि त्यानंतरचा फेरबदलाचा निर्णय हे सारे त्यांनी वरील कसोटी लावूनच घेतलेले दिसतात.
जननिष्ठा आणि पक्षनिष्ठा या दोन संज्ञा चव्हाणांसाठी समानार्थीच होत्या. संस्कारक्षम वयात निष्ठासमर्पणार्थ निवडलेल्या काँग्रेसशी त्यांची बांधिलकी त्यामुळेच इतरांपेक्षा अधिक दृढ होती. राष्ट्रव्यापी पक्षनिष्ठखातर पूर्वायुष्यात त्यांनी सत्यशोधकी संस्कार जसे टाकले, तद्वतच बहुजन-समाजाचा रेटा काँग्रेसबाहेर जाण्यास अनुकूल असण्याच्या काळात ते काँग्रेसला धरून राहिले, द्वैभाषिकाचा निर्णय त्यांना स्वतःला अमान्य असूनही पक्षनिष्ठेपायी त्यांनी तो निर्णय अमलात आणला आणि संयुक्त महाराष्ट्राची मागणी महाराष्ट्राच्या कानाकोप-यांतून उग्र स्वरूपात मांडली जात असतानाही ते शांत चित्ताने पक्षश्रेष्ठीचा कौल मिळवण्यात मग्न राहिले. प्रसंगी जननिष्ठेवरही मात करणारी ही त्यांची प्रामाणिक पक्षनिष्ठा पाहूनच संघपातळीवरच्या श्रेष्ठींनी - विशेषतः नेहरूंनी - त्यांना अचूक हेरले आणि तशी वेळ येताच केंद्र शासनाची एक जोखीम बिनधास्तपणे त्यांच्या हवाली केली.
वैचारिकतेची डूब असलेले नेतृत्व
वैचारिकतेची डूब हा यशवंतरावांच्या नेतृत्वाचा असाच एक लोभस पैलू होता. तरुणपणीच गंभीर वाचनाची आवड जडलेल्या यशवंतरावांना १९३२-३३ च्या कारावासात बुद्धिमंतांच्या सान्निध्यातून आणि उदंड ग्रंथाध्ययनातून भरपूर वैचारिक खुराक मिळाला. राजकीय विचारांच्या वेगवेगळ्या छटा आणि त्यांचा परस्परांशी असलेला संबंध त्यांना उमगला. समाजवाद, साम्यवाद, मार्क्सवाद, गांधीवाद वगैरे विचारसरणींमधील बारकावे त्यांच्या लक्षात आले. पुढे जन्मभर त्यांनी चिंतनप्रधान काव्य-कथा-कादंब-यांपर्यंत चौफेर वाचन सुरूच ठेवले. त्यांच्याइतके विविधांगी वाचन करणारा नेता महाराष्ट्र काँग्रेसमध्ये तर सोडाच, पण त्या पक्षाच्या अखिल भारतीय पातळीवरही विरळाच म्हणावा लागेल. नेहरूंच्या निधनानंतर तर या पक्षाला बुद्धिविरोधानेच ग्रासले. ग्रंथांविषयी व वैचारिक विश्वाविषयी प्रच्छन्न घृणा बाळगणा-या या पक्षात, 'नेता कोणास म्हणावे ?' या प्रश्नाचे उत्तर 'ज्याला अमूर्त विषयांचे वाचन-मनन करण्याची उसंत वा इच्छाच नसते, तो' असेच रूढ झाले होते. ग्रंथ वाचणारा कृतिवीर असूच शकत नाही, असा संकेत पक्षात प्रचलित असतानाही यशवंतराव निष्ठेने व्यासंग करीतच होते.