यशवंतराव चव्हाण यांच्या राजकीय नेतृत्वशैलीची काही वैशिष्टये प्रस्तुत पुस्तकात अन्यत्र नोंदवलेलीच आहेत. सभ्य व सुसंस्कृत संसदपटू म्हणून साध्या आमदारापासून मुख्यमंत्री, संरक्षणमंत्री, गृहमंत्री, वित्तमंत्री, परराष्ट्रमंत्री, उपप्रधानमंत्री आणि संसदीय विरोधी पक्षनेते अशा विविध भूमिका यशवंतरावांनी पार पाडल्या. ज्या जिल्ह्यात कुर्हाडीचे राजकारण प्रचलित होते आणि खुद्द यशवंतरावांपर्यंत ते साक्षात पोचले होते, तेथे राजकीय नेतृत्वाचे प्राथमिक धडे गिरवले असूनही यशवंतरावांनी स्वतः बेरजेचेच राजकारण केले. त्यासाठी मैत्री, सद्भावना याबरोबरच व्यवहारचातुर्य आणि मुत्सद्देगिरी यांचाही कुशल वापर केला. संकुचित सांप्रदायिक विचारापासून आणि क्षुद्र जातिवादापासून स्वतःला कटाक्षाने दूर ठेवले. स्वतःच्या पक्षाची महाराष्ट्रात पुनःप्रतिष्ठापना जशी त्यांनी केली, तसेच विरोधी पक्षांनी त्यांनी एकेक करून नेस्तनाबूत केले. अर्थरचना, प्रशासनपद्धती व शिक्षण हे तिन्ही मूलभूत विषय मूलगामी पद्धतीने व विशिष्ट हेतू मनात बाळगून यशवंतरावांनी हाताळले. नव्या महाराष्ट्राचा आराखडा मनात बाळगून कारभार केला.
संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याच्या काळात सूर्याजी पिसाळ, कुंपणावरचे नेते, केंद्रीय पक्षश्रेष्ठींच्या ओंजळीने पाणी पिणारे, महाराष्ट्रद्रोही, गुजराती भांडवलदारांचे पित्तू अशा अनेक दूषणांनी ज्यांचा टीकाकारांनी सतत पाणउतारा केला होता; त्या यशवंतरावांनी आपल्या सहा वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कालावधीत ती कलुषित प्रतिमा जनमानसातून पुसण्यात यश मिळवले. ते श्रेष्ठींचे कळसुत्री बाहुले नाहीत किंवा महाराष्ट्राचे मारेकरीही नाहीत हे त्यांनी आपल्या कर्तृत्वाने सिद्ध केले.