• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

यशवंतराव चव्हाण : व्यक्तित्व व कर्तृत्व - ८५

पटनाईक यांचे वक्तव्य आणि दिल्लीत व कलकत्त्यात लष्करी अधिका-यांनी दिलेले इशारे ऐकल्यावर यशवंतराव दिल्लीत परतले तेव्हा त्यांनी या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावण्याचे ठरवले. मग त्यांनी स्वतःच्या हस्ताक्षरात पंतप्रधानांना उद्देशून पत्र लिहिले. त्यात त्यांनी लिहिले की, अजूनही तुम्हांला दोन संरक्षणमंत्री आहेत. यापुढे तुम्हांला व मला अडचणीत टाकण्याची माझी इच्छा नाही. तेव्हा मी परत जाण्याचा विचार केला आहे. परत जाऊन मला मुख्यमंत्री व्हायचे नाही. तिथल्या लोकांना कशा प्रकारे कारभार करावा हे माहीत आहे. मला फक्त परत जाण्याची इच्छा आहे. इतके लिहून शेवटी पंतप्रधानांना आभाराच्या काही ओळी लिहिल्या. हे पत्र पंडित नेहरूंच्या हातात पडेल अशी व्यवस्था करण्यात आली. दुस-या दिवशी रात्री नेहरूंनी यशवंतरावांना बोलावले. नेहरूंनी आपल्या टेबलाच्या खणातले यशवंतरावांचे पत्र काढले. मग एखादा पिता आपल्या मुलाशी बोलेल त्या त-हेने नेहरूंनी विचारले, तुम्हांला काय झाले आहे? हा वेडेपणा काय आहे? हे पत्र मला कां लिहिले? यावर यशवंतरावांनी आपल्या दृष्टिकोनातून विचार करून पाहण्याची नेहरूंना विनंती केली. वृत्तपत्रांत कोणत्या प्रकारचे लिखाण या संबंधात येते ते पाहावे. नेहरू म्हणाले, ‘वृत्तपत्रे ठेवा बाजूला. पटनाईक यांना मला सांभाळून घ्यायचे आहे हे तुम्हांला माहीत नाही काय? त्यांचा लष्करी वर्तुळाशी जवळचा संबंध आहे.’ इतके बोलणे झाल्यानंतर नेहरूंनी यशवंतरावांचे पत्र फाडून टाकले.

यशवंतरावांनी मग इंदिरा गांधींची भेट घेतली. ते सांगतात की, ते दोघेही एकमेकांशी त्या काळात बराच विचारविनिमय करत. यानंतर नेहरू, यशवंतराव व इतर काही सहका-यांना राजकीय व इतर विषयावर चर्चा करण्यासाठी बोलवू लागले. या संदर्भात यशवंतरावांनी मला सांगितलेल्या एका प्रसंगाचा उल्लेख करणे योग्य होईल. यशवंतराव काँग्रेस कार्यकारिणीबरोबरच संसदीय मंडळाचे सभासद होते. विधानसभा आणि लोकसभा यांच्या निवडणुकीच्या वेळी राज्यवार उमेदवारांची यादी अंतिम निर्णयासाठी संसदीय मंडळाकडे येत असे. ६२ साली लोकसभेच्या निवडणुकीसाठीच्या उमेदवारांच्या यादीचा विचार करण्यासाठी, नेहरूंच्या निवासस्थानी संसदीय मंडळाची बैठक होती, यशवंतराव बैठकीसाठी जात असता इंदिरा गांधींनी त्यांना थांबवून घेतले व त्या म्हणाल्या, बिजू पटनाईक लोकसभेत येऊ इच्छितात, पण त्यांना येऊ देऊ नये. ओरिसात ते ठीक आहेत. मग बैठक सुरू झाली. थोड्या वेळाने नेहरू काही काम असल्याचे सांगून उठून गेले पण इंदिराला काही सांगायचे आहे ते ऐकून घेतले तर बरे होईल, असे ते म्हणाले. इंदिरा गांधींनी इतर काही उमेदवारांबद्दल आपले मत सांगून पटनाईक यांना ओरिसातच ठेवणे त्या राज्याच्या हिताचे असल्याचा अभिप्राय दिला. पटनाईक-प्रकरणात यशवंतराव नेहरूंना भेटल्यानंतर इंदिरा गांधींशी चर्चा करताना, पटनाईक यांच्याबद्दल इंदिरा गांधींच्या मताची त्यांना आठवण होती, असे मानता येईल.

नेहरूंशी झालेल्या भेटीचा परिणाम नंतर दिसू लागला. पटनाईक यांचे प्रस्थ संपले. कृष्णम्माचारी यांना संरक्षणखात्याचे जे काम दिले होते, त्याची जबाबदारी त्यांच्याकडे राहणे अशक्य होते. पण त्यांची समजूत काढण्याची जबाबदारी नेहरूंनी यशवंतरावांवर सोपवली. ती त्यांनी काढली. कृष्णम्माचारी यांचा अहंकार दुखावला जाणार नाही, असा तोडगा काढण्यात आला. संरक्षण खात्याच्या संबंधात नेहरूही काही हस्तक्षेप करत नव्हते; याचा प्रत्यय लगेच आला. चिनी युद्धाच्या काळात बी. एम. कौल यांच्या अकार्यक्षमतेबद्दल बरेच लिहिले गेले होते. त्यांना काढून टाकावे अशी लष्कराच्या मुख्य कार्यालयाची शिफारस होती. काहीजणांच्या मते लष्करी न्यायालयाकडून चौकशी करणे योग्य होणार होते. यशवंतरावांनी कौल यांच्यासंबंधीची कागदपत्रे वाचली आणि त्यांचा लगेच राजीनामा घ्यावा, असा शेरा मारला. ती फाईल रीतीप्रमाणे नेहरूंकडे गेली. त्यांनी सही करून लगेच परत पाठवली. लष्करी अधिका-यांना नेहरूंच्या संमतीबद्दल खात्री नव्हती, पण ती मिळाल्यामुळे त्यांना समाधान वाटले आणि नव्या संरक्षणमंत्र्यांबद्दल विश्वास निर्माण झाला.

कृष्ण मेनन यांच्याबद्दल यशवंतरावांची व यशवंतरावांची संरक्षणमंत्री म्हणून नेमणूक झाल्याबद्दल मेनन यांची काय प्रतिक्रिया झाली असे जयंत लेले यांनी विचारले असता, यशवंतरावांनी दिलेले उत्तर नमूद करण्यासारखे आहे. ते म्हणाले की, आपल्या नेमणुकीनंतर दुस-याच दिवशी मेनन यांचा फोन आला व केव्हा भेटू असे त्यांनी विचारले. आपण सांगितले की, औपचारिकपणा दाखवण्याचे कारण नाही, या. मेनन यांच्याशी आपले संबंध चांगले होते. ते तीक्ष्ण बुद्धीचे होते. तथापि मेनन यांचे कम्युनिस्ट पक्षाशी आसलेले जवळचे संबंध आपल्याला पसंत पडत नसत. त्यांचे व आपले वैचारिक मतभेद मात्र होते. चीन, पाकिस्तान इत्यादींच्या बाबतीतील त्यांची व आपली मते जुळत नसत. ते कम्युनिस्ट देशांवर टीका करत नसत; पण पाश्चात्त्य देश व अमेरिका यांच्यावर मात्र जहरी टीका करत. तुमचे व मेनन यांचे मैत्रीचे संबंध होते काय ? या लेले यांच्या प्रश्नाला यशवंतरावांनी नकारात्मक उत्तर दिले. ते म्हणाले की, एक पंडित नेहरू सोडल्यास मेनन यांचे कोणाशी मैत्रीचे संबंध असतील असे वाटत नाही.