या बैठकीत नेहरूंनी प्रत्येकाला त्याचे मत विचारले. कामराज यांचे मत पक्के झाले होते की नाही, हे स्पष्ट झाले नाही. मेनन यांना यशवंतरावांनी लिहिलेले पत्र नेहरूंनी वाचले होते, हे त्यांच्या बोलण्यावरून कळून येण्यासारखे होते. यशवंतरावांनी नेहरूंना सांगितले की, मेनन यांच्याबद्दल आपल्याला आत्मीयता आहे. त्यांना दूर करावे लागणे ही दुःखद गोष्ट आहे. पण दिल्लीतल्या दोन दिवसांच्या वास्तव्यात लोक मेनन यांच्यावर रागावले आहेतच, पण तुमच्यावरही टीका करू लागले आहेत, हे मला दिसून आले. तेव्हा तुमची सूचना काय, असा प्रश्न नेहरूंनी केला. यशवंतरावांनी उत्तर दिले की, आपण आताच जे म्हणायचे ते म्हटले आहे. या प्रसंगी जपूनच बोलले पाहिजे. हे ऐकल्यावर नेहरू उद्विग्न झाले. मग जरा तीव्रतेनेच त्यांनी विचारले की, हे लोक मेनन यांचा बळी मागत आहेत म्हणून मी त्याप्रमाणे वागू काय? आज जर मी हे ऐकले तर उद्या ते माझा बळी मागतील. यानंतर पाचदहा मिनिटे नेहरू अतिशय त्वेषाने बोलत राहिले. ते एक भाषणच होते. यशवंतरावांनी लेले यांना सांगितले की, नेहरूंच्या मेनन यांच्याबद्दलच्या काय भावना होत्या हे यामुळे कळून आले. ते म्हणाले की, मंत्रिमंडळात मेनन यांच्या तोडीचा कोणी नाही; मंत्रिमंडळातील चर्चेत तेच काही भरीव सूचना करतात. तथापि अखेरीस नेहरू म्हणाले, तुम्हा मंडळींचे विचार आपण जाणू शकतो आणि त्यामागे सद्भावना आहेत, हेही मला मान्य आहे. आता काय करायचे ते आम्ही ठरवू. यानंतर दुस-या दिवशी सकाळी मुंबईला परतण्याचा निर्णय यशवंतरावांनी घेतला.
या सर्व घडामोडींनंतर नेहरूंनी मेनन यांचे संरक्षणखाते स्वतःकडे घेतले आणि मेनन यांना मंत्रिमंडळातून न काढता संरक्षणसाहित्याचे उत्पादन खाते दिले. पण मेनन यांनी एका मुलाखतीत सांगितले की, आपले खाते बदलले असेल, पण तो तांत्रिक स्वरूपाचा बदल आहे. आपण पूर्वी जे काम करत होतो तेच आताही करतो. या त्यांच्या वक्तव्यामुळे संसदेत व देशात वादळ उठले. काँग्रेस पक्षाची बैठक घेण्याची भाषा सुरू झाली. तेव्हा नेहरूंनी मेनन यांना बोलावून राजीनामा मागितला. संसदेत या घोषणेचे स्वागत झाले.
पुढील घटनांबद्दल यशवंतरावांनी लेले यांना सांगितले की, नेहरूंनी संरक्षणखाते स्वतःकडे घेतले असले तरी ते त्यांनी स्वतःकडे न ठेवता, कोणाची तरी संरक्षणमंत्री म्हणून निवड करावी अशी चर्चा दिल्लीत सुरू झाल्याचे आपल्या कानांवर आले. तसेच मोरारजीभाई, कृष्णम्माचारी आणि सर्वांत महत्त्वाकांक्षी असे बिजू पटनाईक हे संरक्षण खाते मिळवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे आपल्या कानांवर आले. मुख्यमंत्र्यांच्या या बैठकीपूर्वी यशवंतराव व कृष्ण मेनन यांची भेट झाली होती. आपल्याविरुद्धच्या वातावरणाची मेनन यांना कल्पना होती. तेव्हा या विषयावर बोलत असताना यशवंतरावांनी मेनन यांना सांगितले की, त्यांनी तिन्ही सेनादलांतील काही निवृत्त सेनाधिका-यांना बोलवावे आणि त्यांच्याशी चर्चा करावी. तेही देशभक्त आहेत, तेव्हा त्यांच्याशी सल्लामसलत करण्यात काही वावगे नाही. अशांची एक संरक्षणविषयक समिती कां स्थापन करू नये? या सेनाधिका-यांवर लोकांचा विश्वासही असेल. या भेटीनंतर यशवंतरावांनी मेनन यांना याच धर्तीवर एक पत्रही लिहिले. पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती. नेहरूंच्या भेटीत ज्या पत्राचा निर्देश अप्रत्यक्षपणे झाला, त्याचा मथितार्थ हा होता.
यानंतर ६ नोव्हेंबर १९६२ रोजी दुपारी यशवंतराव सचिवालयात काम करत बसले असताना पंतप्रधान नेहरू यांचा फोन आला. त्यांनी यशवंतरावांना सांगितले की, तुमच्या कार्यालयात कोणी असतील तर त्यांना थोडा वेळ दूर होण्यास सांगा, कारण मला अत्यंत खाजगी बोलायचे आहे. नेहरू म्हणाले, मी जे सांगणार आहे ते पूर्णपणे गुप्त राहिले पाहिजे. याची वाच्यता होता कामा नये. नेहरू नंतर म्हणाले की, तुम्ही मला दिल्लीत संरक्षणमंत्री म्हणून यायला पाहिजे. यावर यशवंतराव म्हणाले, की आपल्याला थोडा वेळ द्यावा आणि निदान एका व्यक्तीला हे सांगावेच लागेल. नेहरूंनी विचारले, अशी कोण व्यक्ती आहे? यशवंतराव म्हणाले, माझी पत्नी. नेहरू यावर हसले आणि त्यांनी पुन्हा एकदा गुप्तता पाळण्यास सांगितले. यशवंतरावांनी उत्तर दिले की, आपण तुम्ही बोलवाल तिथे येऊ, पण तुम्हांला मी खरोखरच यायला हवा काय, याचा निर्णय तुम्ही घ्या. नेहरूंनी, त्यांनी यायला हवे असल्याचा त्यांचा निर्णय सांगितला. नंतर केंद्रीय गृहमंत्र्यांचाही फोन आला. संरक्षणमंत्री म्हणून दिल्लीला जाण्याची गोष्ट यशवंतरावांनी वेणुताईंना सांगितली तेव्हा त्यांना प्रथम तितका उत्साह वाटला नाही. तिथले वातावरण पूर्णतः अपरिचित तेव्हा कसे होणार, इत्यादी विचार त्यांच्या मनात आले. पण यशवंतरावांना कर्तव्याची ही हाक ऐकावी लागेल याची त्यांना कल्पना असल्यामुळे, वेणुताईंनी आलेली जबाबदारी स्वीकारणे योग्य असल्याचे मत दिले. यशवंतराव मग नेहरूंच्या आमंत्रणावरून १० तारखेला दिल्लीला गेले आणि नेहरूंना भेटले. लालबहादूर शास्त्रीही नेहरूंबरोबर होते. त्या दोघांनी यशवंतरावांना अखेरचा निर्णय सांगितला. आपल्याला संरक्षणविषयाची काही माहिती नाही, ती करून घेण्यास थोडा अवधी लागेल असे यशवंतरावांनी सांगितले; तेव्हा तुम्ही ती लवकर करून घ्याल याची आपल्याला खात्री असल्याचे उत्तर नेहरूंनी दिले. त्याचबरोबर ते म्हणाले की, संरक्षणमंत्रिपद त्यांना न देता तुम्हांला दिल्यामुळे टि. टि. कृष्णम्माचारी बरेच प्रक्षुब्ध झाले आहेत. आपल्याला भेटून त्यांनी संरक्षणमंत्रिपद देण्याची विनंती केली. याबद्दल ते बरेच भावनाशील झाले होते अशीही माहिती नेहरूंनी दिली. पण तुमच्याबद्दल आपण अखेरचा निर्णय घेतला असून तुम्ही शक्य तितक्या लवकर दिल्लीत हजर व्हा. यानंतर ठरवण्यासारखे काही राहिले नव्हते. संरक्षणमंत्रिपद मिळवण्यासाठी काहीजण इतकी खटपट करत असता यशवंतरावांकडे ते आपणहून चालत आले.