या पाठोपाठ शे. का. पक्षाचे अधिवेशन नाशिक जिल्ह्यातल्या दाभाडी इथे भरले व ते २९ ते ३१ मे असे तीन दिवस चालले. या अधिवेशनात पक्षाची उभारणी कोणत्या विचारांनुसार करायची यासंबंधी एक प्रबंध मांडण्यात आला. अधिवेशनास हजर राहण्यासंबंधीही नियम करण्यात येऊन, प्रनिधींची संख्या मर्यादित केलेली होती. सोव्हिएत युनियन व चीन या देशांतील कम्युनिस्ट पक्षाच्या धर्तीवर पक्षबांधणी करण्याच्या उद्देशाने हे सर्व झाले होते. शंकरराव मोरे हे या प्रबंधाचे प्रमुख निर्माते होते. प्रबंधात भारताने रशियाच्या गटात सामील व्हावे म्हणजे गरीबांचे हित साधेल असे मत व्यक्त झाले होते. नेहरूंचे सरकार भांडवलदारी अमेरिका व ब्रिटन यांच्या गोटात असल्याबद्दल टीका होती. चीनमधील कम्युनिस्ट पक्षाचे यश आणि पूर्व युरोपात रशियाने मुक्त केलेले देश पाहता, समाजवादी गटाचे प्राबल्य वाढण्याची खात्री व्यक्त झाली होती. कम्युनिस्ट पक्षाने सोव्हिएत युनियनने केलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे वर्तन केले नाही आणि राष्ट्रीय चळवळीपासून तो दूर राहिल्यामुळे कामगारक्षेत्रात मध्यमवर्गीय समाजवाद्यांचे वर्चस्व स्थापन झाल्याची मीमांसा केलेली होती. अशा मध्यमवर्गीय समाजवाद्यांच्या बरोबर करार करण्यास आपला पक्ष का तयार झाला होता, याचा खुलासा करण्यात आला नाही. भारताचे स्वातंत्र्य वरकरणी व बेगडी आहे असाही अभिप्राय प्रबंधाने दिला होता. म्हणजे कम्युनिस्ट पक्षाची जी भूमिका होती त्यापेक्षा ही विशेष वेगळी नव्हती. शंकरराव जी तात्त्विक भूमिका घेत होते तशी ती पक्षातले किती पुढारी घेत होते याबद्दल शंका आहे. मोरे कम्युनिस्ट व समाजवादी या पक्षांचेही टीकाकार होते आणि मार्क्सवादाचा वेगळा अर्थ लावून करणा-या नवजीवन या गटाचे धोरणही त्यांना मान्य नव्हते. आपण व आपला पक्ष हाच कम्युनिझम आणण्यात यशस्वी होईल आणि हे लक्षात घेऊन सोव्हिएत युनियन त्यास अधिकृतपणे मान्यता देईल असा विश्वास, शंकरराव कशाच्या आधारे बाळगत होते ते त्यांना माहीत. हे काही न होता, शे. का. पक्षातच नंतर फूट पडू लागली. त्यातले काही कम्युनिस्ट पक्षात गेले.
दाभाडी प्रबंधात भारतातील कम्युनिस्ट पक्षाच्या कारभारावर व धोरणावर झोड उठवून, समाजवादी क्रांती आपलाच पक्ष करील असा विश्वास व्यक्त झाला होता. या प्रबंधात नेहरूंच्या धोरणावर टीका होती. पण याच वेळी भारतीय कम्युनिस्ट पक्षाला सोव्हिएत नेत्यांनी वेगळेच मात्रेचे वळसे दिले होते. याची काही कल्पना शे. का. पक्षास नव्हती. हे वळसे देण्याचे कारण कम्युनिस्ट पक्षाचे तेव्हाचे चिटणीस बी. टी. रणदिवे यांची साहसवादी भूमिका. तेही शंकरराव मोरे यांच्याप्रमाणे पोथीनिष्ठ विचार करून क्रांती करू पाहत होते. म्हणून त्यांनी, माओने शेतक-यांना हाताशी धरून क्रांती केली ती खरी कम्युनिस्ट क्रांती नव्हे, असा सिध्दान्त मांडला. स्टालिन प्रारंभी याच मताचा असला तरी त्याला चीनएवढा देश दूर ठेवणे परवडणारे नाही, हे समजले होते. म्हणून त्याने माओचा मार्ग हाही कम्युनिस्ट क्रांती घडवून आणू शकतो अशी भूमिका घेतली. मग रणदिवे यांच्यावर आंतरराष्ट्रीय कम्युनिस्ट पक्षाची नियतकालिके टीका करू लागली व कम्युनिस्ट पक्ष गोंधळात पडला.
तेलंगण भागात कम्युनिस्ट पक्षाचे कार्येकर्ते हिंसक उठाव करत होते, त्यामुळे मतभेद होऊ लागले होते. मुख्य म्हणजे नेहरूंचे सरकार प्रतिगामी व पाश्चात्य भांडवलदारी देशाचे हस्तक आहे की नाही, हा मतभेदाचा मुद्दा झाला होता. तेव्हा सोव्हिएत युनियनच्या नेत्यांनी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नव्याने नेमलेले चिटणीस अजय घोष, तसेच डांगे, बसवपुनिया, राजेश्वर राव इत्यादी नेत्यांना मॉस्कोस बोलावले. दोन दिवसांच्या या बैठकीस दुस-या दिवशी स्टालिन स्वत: हजर होता. सर्व ऐकून घेतल्यावर स्टालिनने सांगितले की, माओ स्वत:च्या बळावर क्रांती करू शकत नव्हता. त्याला वारंवार एकेक भाग सोडून देणे भाग पडत होते. अखेरीस तो मांच्युरियात आला आणि मग त्याला आधार मिळाला, तो सोव्हिएत युनियनचा. मांच्युरियाला लागून रशियाची हद्द आहे आणि त्यामुळे रसद मिळू लागली. तुम्ही ज्या भागात उठाव करत आहांत तिथे तुम्हांत मदत कोणाची मिळणार? शिवाय तुमच्यापाशी शस्त्रबळ किती आणि भारतीय सैन्याचे किती? तुमची अशी समजूत आहे की, नेहरू हे चँग कै शेकसारखे दुबळे आहेत. पण ही चुकीची समजूत आहे. नेहरूंची राजकीय मुळे जनतेत खोल रूजली आहेत. तुम्ही कम्युनिस्ट क्रांती करायला निघाला आहांत, पण तुमचा पक्ष अगदी दुबळा आहे. तेव्हा हा विचार सोडा आणि परत जाऊन सरकारकडे शस्त्रे परत करा. (भारत व जग, पृष्ठे १३३-३९) ही अधिकृत कागदपत्रे आता उपलब्ध असून त्याचे इंग्रजी भाषांतर दिल्लीहून दर सहा महिन्यांनी निघणा-या ‘रेव्होल्यूशनरी डेमॉक्रसी’ या नियतकालिकात प्रसिध्द झाले होते.