वाढत्या आंदोलनामुळे सरकारची दडपशाही वाढत गेली होती. अनेकांना विनाचौकशी तुरूंगात ठेवले होते. या सर्वाचा विचार करण्याकरीता एक बैठक झाली. तीत सातारच्या काही पुढा-यांची उपस्थिती होती. तीत एकाने सांगितले, की बिळाशी भागातील दडपशाही विशेष उग्र स्वरूपाची आहे. त्याने याची काही उदाहरणेही कथन केली. तेव्हा वस्तुस्थिती काय आहे हे पाहण्यासाठी प्रथम दोन तरूणांना धाडावे व त्यांनी जिल्ह्याच्या पुढा-यांना अहवाल द्यावा असा निर्णय होऊन, यशवंतराव व त्यांचे मित्र राघूअण्णा लिमये यांची निवड झाली. बिळाशीच्या जवळच्या गावातील देशपांडे या जमीनदारांच्या घरी यशवंतराव व राघूअण्णा यांचा मुक्काम झाला. गावातील वातावरणामुळे त्यांसंबंधी गुप्तता पाळलेली होती. दुस-या दिवशी कार्यकर्ते येऊन आपले अनुभव सांगत होते. मग दोघेही बिळाशीत गेले. तिथे पोलिस बंदोबस्त बराच होता व त्यांनी अत्याचारही केले होते. पण तिथल्याच एका गृहस्थाने पोलिसांना बरीच दारू पाजून, यशवंतराव व राघूअण्णा यांची भेट व्यवस्थित पार पाडली होती. बिळाशीत लोकांनी सरकारी यंत्रणेला पर्यायी व्यवस्था स्थापन करून, ग्रामराज्याचा प्रयोग केला होता आणि त्यामुळे सरकारी अधिकारी संतप्त झाले आणि त्यांनी दरारा बसेल अशी दडपशाही केली होती. बिळाशीचे काम झाल्यावर आपले मूळ गाव साखरपे इथे आपल्या लिमयांपैकी कोणी आहे काय, हे पाहण्याची कल्पना राघूअण्णांनी काढली त्या गावाला भेट देऊन दोघेही रत्नागिरीस गेले. हे व यापूर्वी जे राजकीय कार्य यशवंतरावांनी गुप्तपणे केले, त्याचा १९४२च्या आंदोलनात भूमिगत असताना काही उपयोग झाला असेल.
रत्नागिरीस जाण्याचे दोन हेतू होते. ते म्हणजे यशवंतरावांनी तोपर्यत समुद्र बघितला नव्हता. तो पाहावा आणि रत्नागिरीत स्वातंत्र्यवीर सावरकर राहत होते, त्यांना पाहावे. सावरकरांच्या व्यक्तीमत्त्वासंबंधी यशवंतरावांनी बरेच ऐकले होते. शिवाय अंदमानातील अनुभवांवर आधारलेले माझी जन्मठेप हे पुस्तक, श्रध्दानंद या नियतकालिकात क्रमश: प्रसिध्द होत असताना त्यांनी ते बरेचसे वाचले होते आणि त्याचा प्रभाव मनावर पडला होता. स्वातंत्र्यासाठी बेहोशीने जीवन झोकून देण्या-या या व्यक्तीला पाहण्याची उत्कंठा यशवंतरावांना होती. ती रत्नागिरीच्या भेटीत पुरी करण्याची त्यांना इच्छा होती. सावरकरांची अंदमानातून सुटका झाल्यानंतर त्यांना रत्नागिरीत ठेवून तिथून न हलण्याचा व राजकारणात भाग न घेण्याचा निर्बध लादण्यात आला होता. समुद्र पाहिल्यावर राघूअण्णा व यशवंतराव थक्क होऊन गेले. मग या दोघांची सावरकरांशी भेट झाली.
या भेटीचे यशवंतरावांनी केलेले वर्णन उल्लेखनीय आहे. ते लिहितात, “ मध्यम उंचीचे, काहीसे किरकोळ बांध्याचे, डोळ्यांवर चष्मा आणि पलीकडे पाहणारी त्यांची भेदक नजर; अशी ती मूर्ती नजरेसमोर आली. अंगात स्वच्छ सदरा आणि तितकेच स्वच्छ पांढरे सैलसे धोतर, पायांत साध्या वहाणा अशा या घरगुती वेषात ते होते—“ एवढा लांबचा प्रवास कशासाठी केला, बाळ ?” मग राघूअण्णांनी आम्ही मिठाच्या सत्याग्रहातील काँग्रेसचे कार्येकर्ते आहोत, अशी माहिती दिली. बिळाशीच्या बंडाची हकिगत त्यांना सांगितली आणि तेथे नुकतेच जाऊन आलो, तीही हकिगत सांगितली. सावरकरांच्या तेजस्वी डोळ्यांत काहीसे हसू दिसले. “ मोठेच पराक्रमी दिसता तुम्ही” खळखळून हसत ते म्हणाले. थोड्या वेळाने ते म्हणाले, “ तुम्हांला काही विचारावयाचे आहे काय ?” मी सांगितले, “निदान मला काही विचारावयाचे नाही. मला फक्त आपणांस डोळे भरून पाहायचे होते.” ते उठून माझ्याजवळ आले. “ माझ्यात बघण्यासारखे काय आहे ? मी तुमच्यासारखाच माणूस. तुमच्या आधी जन्माला आलो, देशसेवेचे व्रत घेतले आणि बलिदानाची प्रतिज्ञा करून कामाला लागलो. यात विशेष असे काय आहे ? आमच्या पिढीने त्यांना योग्य वाटले, ते करायचा प्रयत्न केला. आता तुमची पिढी काय करते आहे ते पाहायचे” आणि नंतर ते गंभीर होऊन खाली बसले.
त्यांना आठवण झाली नाशिकच्या कान्हेरेची. ते म्हणाले, “तुम्ही मंडळी मोठ्या संख्येने चांगले काम करता आहांत. परंतु स्वातंत्र्य-आंदोलनासाठी जेव्हा कोणीच अवतीभोवती तयार होत नव्हते, तेव्हा एकाकीपणाने आम्ही हे राष्ट्रकार्य करीत होतो. अनंत कान्हेरे फासावर गेले. हल्लीचे तुम्ही लोक त्या बलिदानाला विसरला आहात, अशी मला उगीच हळहळ वाटते.” राघूअण्णांनी सांगितले, “ ते आम्ही कसे विसरू ? आपल्याकडूनच स्फूर्ती घेऊन त्यांनी बलिदान केले, म्हणूनच आपले दर्शन घ्यायला आम्ही आलो आहेत.” सावरकरांना बरे वाटले. सागर व सावरकर हे रत्नागीरीत एकाच वेळी पाहण्याचे भाग्य लाभल्यामुळे, रत्नागिरीची माझी आठवण ह्या भेटीशी कायमची संलग्न आहे.(कृष्णाकांठ पृ. ८८-९).