• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

यशवंतराव चव्हाण : व्यक्तित्व व कर्तृत्व - १३४

यशवंतरावांना विविध क्षेत्रांतील माणसांची चांगली पारख होती. त्यांनी हरिदेव शर्मा आणि लेले यांना अनेक तासांच्या ज्या प्रदिर्घ मुलाखती दिल्या होत्या, त्यांतून त्यांचे हे वैशिष्ट्य उठून दिसते. या मुलाखतींत महाराष्ट्राच्या राजकीय व्यक्तींचा निर्देश आहे तसाच तो देशाच्या निरनिराळ्या राज्यांतल्याही आहे. हेच वैशिष्ट्य परदेशी व्यक्तींच्या बाबतीतही दिसते ६५ सालातील भारत-पाकिस्तान युद्धानंतर ताष्कंद इथे शांततेची बोलणी झाली. या परिषदेला संरक्षणमंत्री म्हणून यशवंतराव हजर होते. त्यांनी लिहिले, ‘प्रेसिडेंट अयूब आणि भुत्तो या दोन्ही व्यक्तींना मी प्रथमच भेटलो. प्रे. अयूबला व्यक्तिमत्त्व आहे. उंचापुरा पठाण. चेह-यावर नाटकी हास्य भरपूर, बोलणेही अघळपघळ आणि गोड. माणूस प्रामाणिक नाही वाटत. त्यांच्या शब्दांवर विश्वास ठेवणे अवघड-नव्हे धोक्याचे आहे.’ निक्सन यांच्यानंतर आलेले जेराल्ड फोर्ड व डेमॉक्रॅटिक पक्षाचे जिमी कार्टर यांची अध्यक्षपदासाठी प्रचारमोहीम चालू असताना, यशवंतराव अमेरिकेत होते. त्यांनी लिहिले की, ‘निदान मला तरी कार्टर चलाख म्हणून धोकादायक वाटतो. फोर्ड गंभीर पण प्रामाणिक व्यक्ती वाटली.’ हे नंतर तंतोतंत खरे ठरले. कार्टर यांची अध्यक्षीय कारकीर्द अयशस्वी झाली. ते अध्यक्ष असताना तेव्हांचे पंतप्रधान मोरारजी देसाई व कार्टर या दोघांनाही नैतिक श्रेष्ठत्वाचा गंड होता आणि अण्वस्त्रांचा प्रसार थांबवण्यावर त्यांचा कटाक्ष होता. अर्थात कार्टर अमेरिकेची अण्वस्त्रे कमी करण्यास तयार नव्हते. भारतास या संबंधी मदत न देण्याच्या बाबतीत त्यांच्या मनात जे होते ते ध्वनिक्षेपक बंद असल्याच्या समजुतीने त्यांनी बोलून दाखवले. खरोखरच त्यांची गैरसमजूत होती, का ते मुद्दामच तसे बोलले हे सांगणे कठीण आहे. आज अमेरिकेने तालिबान व अल् काईदाच्या संकटासंबंधी मोहीम काढली आहे. पण अफगाणिस्तानात सोव्हिएत युनियनने लष्कर पाठवले तेव्हा तिथल्या मुजाहिदांना शस्त्रास्त्रांची मदत देण्याचे धोरण कार्टर यांनी अवलंबिले. अमेरिकेची शस्त्रे मूलतत्त्ववादी तालिबानच्या हातांत जातील हे माहीत असूनही कार्टर यांनी ती दिली. कारण तालिबानपेक्षा सोव्हिएत हा मोठा शत्रू आहे असे ते मानत होते.

स्वत:चे सामर्थ्य आणि स्वत:च्या मर्यादा या दोन्हींची जाण असलेल्या व अधिकारपद भोगत असलेल्या वा भोगलेल्या व्यक्ती थोड्या दिसतात. यशवंतराव अशा व्यक्तिपैकी एक होते. शक्तिस्थानामुळे ते अहंकारी बनले नाहीत आणि मर्यादांमुळे काही पदे मिळाली नाहीत, म्हणून ते कुढत बसले नाहीत. मुख्य म्हणजे ते पूर्णत: राजकारणग्रस्त नव्हते. साहित्य, संगीत, चित्रकला, नाटके, चित्रपट यांत ते आनंद घेत असत. त्यांनी आवडीची पुस्तके जमवली आणि शास्त्रीय संगीताची चांगली जाण असल्यामुळे त्याचा उत्तम संग्रह जमवला. या अशा छंदामुळे ऐन वेळीही ते एखाद्या विषयावर चांगले भाषण करीत. तरुणपणापासूनच यशवंतरावांना चांगली व्याख्याने ऐकण्याची आवड होती. श्रीनिवास शास्त्री, भुलाभाई देसाई, डॉ. राधाकृष्णन यांच्या उत्कृष्ट इंग्रजी भाषणांचा त्यांच्यावर प्रभाव पडला होता. लोकसभेत त्या वेळी हिरेन मुखर्जी हे एकेकाळचे इंग्रजीचे प्राध्यापक, कम्युनिस्ट पक्षाचे खासदार होते. त्यांचे इंग्रजी भाषण फार सुंदर होत असे. यशवंतरावांनी  लोकसभेत मुखर्जी यांच्या भाषणाची जाहीरपणे प्रशंसा केली होती.

गृहमंत्री असताना यशवंतरावांच्या कारभारकौशल्याचा व वाक्पटुत्वाचा खरा प्रत्यय आला. त्यांनीच लिहिले आहे की, ‘एक वेळ पार्लमेंटमध्ये कम्युनिस्ट व नक्षलवादी यांच्यासंबंधी मला बोलावयाचे होते आणि त्या बोलण्याच्या ओघात मी सभागृह इतके ताब्यात घेतले, की एक वेळ अशी आली, की माझ्या वाक्याची सुरुवात झाल्यानंतर त्यातील पुढील शब्द कोणते असतील याची कल्पना विरोधी व माझ्या पक्षातील सदस्यांना येत होती. तसेच, वाक्याचा शेवट कसा करणार, याचे शब्द ते बोलू लागले. हा अनुभव विशेष होता.’

मराठी वाक्यांत यशवंतरावांनी तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी व काकासाहेब गाडगीळ यांच्या भाषणांचा आपल्यावर प्रभाव पडला, असे म्हटले आहे. तर्कतीर्थांचे भाषण विचारांनी परिपूर्ण असते आणि काहीतरी नवे विचार ऐकायला मिळतात, असे यशवंतरावांनी लिहिले आहे. ना. सी. फडके यांच्या मराठी शब्दांच्या उच्चारांचा आपल्यावर परिणाम झाला असल्याचे सांगून, इतके स्वच्छ मराठी बोलणारा माणूस मी क्वचितच पाहिला आहे, अशी ग्वाही ते देतात. अशा अनेक वक्त्यांची भाषणे यशवंतरावांनी मनापासून ऐकली, पण त्यांनी कोणाचीही शैली उचलली नाही. महाराष्ट्रात ज्यांची भाषणे लोक आवडीने ऐकत, त्यांत यशवंतरावांचा समावेश होता. त्यांचे भाषण हे श्रोत्यांशी संभाषण केल्यासारखे असे. ते कधीही लांबलचक भाषण करत नसत. प्रत्येक भाषणात काही नवा मुद्दा असायचा. दुसरे म्हणजे त्यांनी उपदेशकाची भूमिका कधी घेतली नाही. त्यांनी प्रचंड जाहीर सभा जिंकल्या असल्या तरी त्यांच्या भाषणाचा बाज संसदीय पद्धतीशी विशेष संवादी होता. यशवंतरावांचे विविध विषयांवरील ग्रंथवाचन, अनुभवाचे व्यापक क्षेत्र आणि लोकांपुढे आपले विचार मनापासून मांडण्याची धाटणी; यामुळे ते श्रोत्यांची मने जिंकत. यास जोड मिळाली होती ती त्यांच्या स्मरणशक्तीची. कालिदासाचे मेघदूत त्यांना अर्धेअधिक पाठ होते. आनंदीबाई शिर्के यांच्या कथेच्या जुन्या संग्रहाची व कथेची आठवण त्यांनी अनेक वर्षांनी शिर्के यांना दिली होती. ते काव्यप्रेमी असल्यामुळे त्यांना अनेक कविता पाठ असत.