• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

यशवंतराव चव्हाण : व्यक्तित्व व कर्तृत्व - १३१

इंदिरा गांधी पंतप्रधान होताच त्यांनी महाराष्ट्रातील संयुक्त आघाडीचे सरकार बरखास्त केले. तीच अवस्था इतर राज्यांतली काँग्रेतर मंत्रिमंडळांची झाली. यशवंतरावांपुढे पेच उभा राहिला. त्या काळात यशवंतराव व वेणुताई यांना मी माझ्या घरी जेवायला बोलावले होते. तेव्हा अनेक विषय बोलून झाले. मग मी त्यांना म्हणालो की, तुम्ही यापुढे काँग्रेस वा इतर कोणत्याही पक्षात न जाता, अपक्ष म्हणून डॉ. कुंझरू यांच्याप्रमाणे राहाल तर ते प्रतिष्ठेचे होईल. यशवंतरावांना हे पसंत पडल्याचा माझा ग्रह झाला होता. त्यांच्या काही मित्रांनी व चाहत्यांनी त्यांना अपक्ष म्हणून लोकसभेत राहा असे सांगितले. इतरही काहींनी हेच सांगितल्याचे नंतर मला कळले. हा सल्ला आपल्याविषयीच्या आपुलकीमुळे दिला जात असल्याची यशवंतरावांना जाणीव होती. पण अखेरीस त्यांनी इंदिरा काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. इंदिरा गांधींनी निवडणुकीत यश मिळवून खरी काँग्रेस कोणाची हे सिद्ध केले असल्यामुळे, आपण त्या पक्षात जाणार असे त्यांनी ठरवले. त्याप्रमाणे त्यांनी अर्ज केला. तो मंजूर करण्यास विलंब लावण्यात आला. यशवंतरावांनी इंदिरा काँग्रेसमध्ये जाऊ नये असे म्हणणारांनाच नव्हे, तर पक्षीय राजकारणाशी संबंध नसलेल्या महाराष्ट्रातल्या असंख्य लोकांना हा महाराष्ट्राचा अपमान आहे असे वाटले. या प्रकारची वागणूक त्यांना मिळायला नको होती अशी सार्वत्रिक भावना होती. अखेरीस प्रवेश देण्यात आला आणि काही काळ यशवंतराव वित्तीय आयोगाचे अध्यक्ष म्हणून काम पाहू लागले. पण त्यास काही अर्थ नव्हता. आपण काँग्रेसमध्ये तरुणपणापासून वाढलो तेव्हा अखेरचे दिवस काँग्रेसमध्येच घालवणे श्रेयस्कर अशी त्यांची भावना होती. बुद्धिनिष्ठतेने विचार केल्यास या भावनात्मकतेचे समर्थन करणे अशक्य होते. यामुळे टीका होणे अनिवार्य होते. परंतु यशवंतरावांच्या निधनाला आता पाव शतक उलटल्यानंतर विचार केल्यास त्यांचा निर्णय हा समजण्यासारखा होता, पण समर्थनीय मात्र नव्हता असे म्हटले पाहिजे. पण ज्यांनी एका पक्षात इतकी वर्षे घालवली, मोठी जबाबदारी स्वीकारली आणि अधिकारपदे भोगली, त्यांची पक्षाबद्दलची भावना वेगळी असू शकते.

या संबंधात दोन उदाहरणे देण्यासारखी आहेत. १९७१ सालच्या लोकसभा निवडणुकीत जनसंघाला २२ जागा मिळाल्या होत्या. जनसंघ नव्हे, तर इंदिरा गांधीच पाकिस्तानशी समर्थपणे मुकाबला देऊ शकतील अशी भावना, रा. स्व. संघाच्या अनेक सदस्यांत पसरल्याचे तेव्हा उघडपणे बोलले जात होते. निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर काही दिवसांनी अटल बिहारी बाजपेयी यांना दिल्लीत मी भेटलो असता, तुमचे तुमच्या पक्षाशीच बरेच मतभेद असल्याची चर्चा चालू आहे. तसे असेल तर तुम्ही या पक्षात कसे काय राहू शकता ? असा प्रश्न मी विचारला असता अटलजींनी उलट सवाल केला, ‘जायें तो जायें कहाँ ?’ ताजे उदाहरण लोकसभेचे निवृत्त सभापती सोमनाथ चतर्जी यांचे. त्यांना मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने दूर केले आहे. पण मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सभासद म्हणूनच जीवनाची अखेर व्हावी अशी इच्छा त्यांनी प्रगट केली आहे. आजकाल पक्षनिष्ठा अशी काही शिल्लक राहिलेली नसल्यामुळे ही उदाहरणे कालबाह्य मानली जातील.

इंदिरा काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर यशवंतरावांची लोकसभेत काही भाषणे झाली. त्यातील अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात लष्कर पाठवल्याबद्दल, सरकारवर अविश्वास दर्शवणा-या विरोधी पक्षाच्या ठरावास विरोध करणारे भाषण उल्लेखनीय होते. या लष्करी कारवाईच्या अगोदर यशवंतराव पंजाबमध्ये गेले असता, त्यांनी अकाली दलाच्या काही नेत्यांशी आणि प्रशासनातील अधिका-यांशी चर्चा केली होती. त्यांना एकंदर प्रशासनच हतबल झाल्याचे आढळले आणि अकाली दलाच्या नेता भिद्रनवाले याचे बंदी झाल्याचे दिसले. भिद्रनवाले याने त्याच्या साथीदारांसह सुवर्णमंदिर हे शस्त्रास्त्रांचे आगर बनवून एखादा किल्ला लढवावा तशी तयारी केली होती. पंजाबमध्ये यशवंतराव यांनी जे पाहिले त्याची माहिती त्यांनी इंदिरा गांधींना दिली होती. त्या वेळी सर्व कोंडी झाल्यामुळे लष्करी कारवाईशिवाय दुसरा मार्ग उरला नव्हता, हे यशवंतरावांनी लोकसभेतील भाषणात स्पष्ट केले. ते म्हणाले, की पंजाबमध्ये धर्मस्थानाचा असा उपयोग करण्यास मोकळीक दिली असती, तर देशभर अनेक धर्मस्थानांचा असाच उपयोग करण्याचा मार्ग मोकळा झाला असता. पंजाबचा प्रश्न इतका विकोपाला जाण्याचे मूळ कारण, आनंदपूरचा ठराव हे असल्याचे यशवंतरावांनी मत दिले. या आनंदपूरसाहेबातील अकाली दलाचा ठराव अतिरेकी अकालींच्या दडपणाखाली संमत झाला होता. त्यांत शीख हे अलग आहेत, एक राष्ट्र आहेत असे म्हटले होते. भिंद्रनवाले याने हेच मुख्य सूत्र धरून आपले हिंसक आंदोलन चालवले होते आणि अमृतसरच्या देवालयात शस्त्रास्त्रांचा साठा करून, सरकारचा पायाच नष्ट करण्याचा घाट घातला होता. यापासून त्याला परावृत्त करण्याचे सर्व प्रयत्न फोल ठरल्यावर लष्करी कारवाई हाच एक उपाय होता. यशवंतरावांनी याचा ऊहापोह केला. लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की, डाव्या विचारसरणीचे, इतकेच नव्हे तर, कम्युनिस्ट पक्षाचे एकेकाळचे सक्रिय कार्यकर्ते निखिल चक्रवर्ती, यांनी ही कारवाई समर्थनीय असल्याचा अभिप्राय दिला होता. आनंदपूरसाहेब इथला अकाली दलाचा ठराव कसा विघटनात्मक होता, हे मधू लिमये यांनी काही लेख लिहून दाखवून दिले होते. सुवर्ण मंदिरातील कारवाईची दुर्दौवी परिणती होऊन इंदिरा गांधी यांचा खून, चार महिन्यात त्यांच्या शीख शरीररक्षकांनी केला.