• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

यशवंतराव चव्हाण : व्यक्तित्व व कर्तृत्व - १०७

मग आणखी एक व्यक्ती यात आली. ती म्हणजे संजीव रेड्डी. यशवंतराव सांगतात, एक दिवस त्यांचा फोन आला आणि आपण भेटायला येतो असे ते म्हणाले. लोकसभेचे अधिवेशन संपत आले होते आणि नंतर ते परदेशी जाणार होते. यावर तुम्ही येऊ नका, मीच येतो, असे उत्तर दिले. सभापतीने मंत्र्यांकडे जायचे नसते म्हणून मी असे म्हणालो. तेव्हा ते कां भेटायला येत होते हे प्रत्यक्ष भेटीत सांगितल्यावर स्पष्ट होईल, असे त्यांचे म्हणणे होते. मग दुस-या दिवशी पंतप्रधानांना भेटायला आपण तुमच्या बाजूला येणार आहोत तेव्हा तुमच्याकडे येतो. असा खुलासा त्यांनी केला. इतर काही बोलणी झाल्यावर त्यांनी राष्ट्रपतिपदाचा विषय काढला. ते कामराज यांच्या जवळचे असल्यामुळे कामराज यांचे मत काय आहे? ते तुमच्याशी काय बोलले, अशी विचारणा केली रेड्डी यांचे उत्तर असे होते की, कामराज स्वतःच्या मनातले काही बोलत नाहीत. या पाठोपाठ रेड्डी यांनी स्वतःच्या उमेदवारीसंबंधी मत विचारले. ते असेही म्हणाले की, इंदिरा गांधींना भेटलो असता त्यांनी आपल्याला विचारले की, तुम्ही कां उभे राहत नाही? हे ऐकल्यावर आपण सांगितले की, जर पंतप्रधानांना तुम्ही हवे असाल तर आम्ही सर्व तुम्हांला पाठिंबा देऊ. पंतप्रधानांना तुम्ही हवे आहांत याबद्दल तुमची खात्री आहे काय? असे पुन्हा विचारले असता त्यांनीच आपल्याला तुम्ही उमेदवार कां होत नाही, असा प्रश्न विचारल्याचे रेड्डी यांनी सांगितले. मग कामराज यशवंतरावांना भेटले असता त्यांचे मत काय असे विचारून संजीव रेड्डी यांचा विषय काढला. कामराज यांचे उत्तर असे होते की, त्यांनी निश्चित काही ठरवले नाही, पण गिरी नको याबद्दल आपले मत पक्के असल्याचा खूलासा त्यांनी केला. यशवंतराव म्हणतात की, त्या वेळी हे असे घडत होते आणि पंतप्रधानांचे निश्चित मत काय, हे मात्र समजले नव्हते. त्यातच आणखी कांही नावे पुढे आली. हे सर्व लक्षात घेता, पंतप्रधानांना कोणीही स्वतंत्र वृत्तीची व्यक्ती नको असल्याचे आपल्या मनाने घेतले. अनेक प्रकारची अनौपचारिक चर्चा चालत होती. संजीव रेड्डी यांना संधी दिसते. कारण पंतप्रधानांनी त्यांना उभे राहण्यास सांगितले आहे, असे आपण काही जणांसी बोललो असा खुलासा यशवंतरावांनी केला.

१० जुलै रोजी बंगलोर इथे काँग्रेस महासमितीची बैठक सुरू झाली. कार्यकारिणी आणि संसदीय मंडळाची बैठक तिच्या बरोबरच होती. संसदीय मंडळात राष्ट्रपतिपदाच्या उमेदवाराची निवड निश्चित करायची होती. त्याच्या आदल्या रात्री इंदिरा गांधींनी यशवंतरावांना बोलावले होते. त्या वेळी फकरुद्दिन अली अहमदही हजर होते. इंदिरा गांधींनी पुन्हा एकदा राष्ट्रपतिपदाच्या उमेदवारसंबंधी काय करायचे? असा प्रश्न विचारला. यशवंतराव सांगतात की, त्यावर आपण त्यांचेच मत काय हे ते स्पष्ट करायला सांगितले. त्या म्हणाल्या, आपल्या डोळ्यांपुढे दोन नावे आहेत. एक गिरी व दुसरे जगजीवन राम. गिरी तुम्हां लोकांना पसंत नाहीत. यावर कामराज व मोरारजी यांच्याशी बोलून घेण्याची सूचना आपण केली. आपल्या सगळ्यांना हे ठरवायचे आहे तेव्हा असा विचारविनिमय करणे बरे, असे यशवंतरावांनी सांगितले. यावर उद्या सकाळी बोलू असे इंदिरा गांधींनी उत्तर दिले. सर्व बोलणे इतक्यावरच थांबले होते. गिरी की बाबूजी, असा पर्याय होता.

दुस-या दिवशी सकाळच्या बैठकीतील ठरावाचा मसुदा यशवंतरावांनी तयार केला होता. ठराव आर्थिक धोरणासंबंधी होता. महासमितीच्या बैठकीच्या आधी इंदिरा गांधीनी आपली काही टिपणे धाडली होती. त्यांत पाचसहा मोठ्या बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्याची प्रमुख सूचना होती आणि जमीनसुधारणेस चालना देण्यासंबंधीचे विचार होते. यशवंतरावांनी यास संमती होतीच तेव्हा ठराव त्यांनी तयार करणे साहजिक होते. पण या ठरावातील सूचना, विशेषतः बँक सरकारी मालकीच्या करण्याची सूचना, वादग्रस्त झाली. पक्षात डावे व उजवे असे तट पडले होते आणि इंदिरा गांधींनी टिपणांच्या द्वारे आपला कल डाव्यांकडे असल्याचे जाहीर केले होते. निजलिंगप्पा, मोरारजी व स. का. पाटील यांचा बँकांच्या राष्ट्रीयीकरणास विरोध होता. कामराज, यशवंतराव, जगजीवन राम व फकरुद्दिन अली अहमद यांचा पाठिंबा होता. या स्थितीत कार्यकारिणीत याच प्रश्नावर फूट पडण्याचा संभव होता. परंतु सर्वांनी तडजोडीची तयारी दाखवल्यामुळे तसा ठराव करण्याचा निर्णय झाला. त्यानुसार यशवंतरावांवर ठरावाचा मसुदा तयार करण्याची जबाबदारी आली. मोरारजींनी हा ठराव मांडला व यशवंतरावांनी दुजोरा देणारे भाषण केले.