• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

यशवंतराव चव्हाण आठवण आणि आख्यायिका-पत्र ९-०५०७२०१२-२

'आवं मोटंच काय घिवूनशानी बसलाय ?  पांढरीवरलं किसन मास्तर सांगत व्होतं, यशवंतरावानं इंजिनबी काढल्यात नव्हं.  आता बगता बगता मोटा जातील्या.'  कुंभारगुरुजी म्हणाले.

'आता ही इंजिन म्हंजी काय वं ?'  एकजण म्हणाला.
'रेल्वे बगीतलीयास नव्हं लोणंदात ?'
'व्हय व्हय, तसलं इंजिन म्हणताय ?'
'हं.  बगा, पण ते चालतंया कोळशावर, आन् हे इंजिन चालतंया तेलावर.'
'चालतया म्हंजे ?  का रेल्वेवाणी पळतंया ?'
'आवं पळंल कशाला ?  ते हिरीतलं पाणी वर वडतंया.'

'व्हय ?  च्या बायला, हे बारीक नामी झालं.'  चर्चा संपली.  सार जण हळूहळू घराकडं निघालं.  आम्हाला गुरुजींनी झोपायला सांगितलं.  आमी वाटच बगत व्हतो. दिवं फुकलं.  आंधार.  गप डोळं मिटलं.

चारपाच दिवसांतच एक कौतिक झालं.  पांढरीवरल्या हिरीवर किसन पाटलानं इंजिन बसावलं.  समदं गाव ह्ये काय इंजिन हाय, ते बगायला उलाथलं.  हिरव्या रंगाचं लोखंडी उभं एक चाक.  त्याला फिरवायला हांडेल.  किसन मास्तरचा भाऊ गरागरा चाकाला हांडेल लावून फिरवायचा.  तसं भाक भाक करीत इंजिन काळा धूर वकायचं.  डाव्या हातानं धरल्यालं उभं इटीवाणी लोकांड झाली टाकायचा.  तसं वेगात आलेला हांडेल अलगद काडायचा आन् झालं की इंजिन सुरू !  आन् तिकडं थारूळ्यानं पायपातनं पाण्याचा मुसींडा. अख्खी निरगुडी बगायला आलीती.  सारं आकरीत घडत व्हतं.  दहावीस मोटंचं पाणी टाकीत व्हतं इंजिन !

गावकरी नुसते हारकुन गेले व्हते.  थारूळ्यातलं पाणी पाटात मावत नव्हतं.  पलानीनं पाणी शेतात कवा आलं ते समाजलं न्हाय.  मोटंवाणी आता पाण्यासाठी वाट बगीत बसायचं नव्हतं.  इंजिनाचा धूर आन् फाकफाक आवाज.  आवाजानं सारी गावंपांढरी दुमदुमायला लागली.  जो तो इंजिनाचीच चर्चा करीत व्हता.  इंजिनातनं पाणी कसं येतं.  ज्यो त्यो तिखटमीठ लावलावून दुसर्‍याला सांगीत व्हता.  आम्ही पोरं तर काय, दिसभर तिथनं हाललो नव्हतो.  एक लोखंडी पाईप हिरीतल्या पाण्यात सोडलेली आन् दुसरीनं पाणी थारूळ्यात.... काय गम्मत व्हती म्हणून सांगू !  पहिल्या दिवशी आमी सारेच पाण्याला घाबरलो व्हतो.  येवढ्या जोरात पाणी थारूळ्यात आपटत व्हतं, की त्याच्या चिपळ्यांनी कासराभरात भिजलं व्हतं.  पाण्याजवळ कुणी जाईना.  शेतातल्या माणसाला दारी धरताना काय व्हतंय कां ते बगीत व्हते सारेजण.  किसनमास्तर हुशार.  ते सार्‍यांना चिडवीत व्हते, 'आरं पाणी हाय ना, त्याला शॉक लागतूया.  पाण्याला हात लावून नगा.  ते लांब फेकतया.'  झालं !  सारी घाबरून लांबनंच बगत व्हती पाणी.  

सुप्रिया, हा नुसता बदल नव्हता.  क्रांती होती, क्रांती !  यंत्रयुगाची सुरुवात व्हती.  लोखंडाच्या साच्यानं असं पाणी ओढता येतं हे अडाणी शेतकर्‍याच्या डोक्यात बसत नव्हतं. किसनमास्तरच्या आईनं घरातनं ताटं आणलं, नारळ आणला, उदबत्त्या, गुलाल सारा पूजेचा सरंजाम आणला.  पाण्याची शांती केली पायजेल का नको ?  सार्‍या आया बाया जमल्या, म्हणून म्होरं सार्‍या सवासणींनी पूजा केली.  चोळीचा खण, नारळ उचलून थारूळ्यात पाण्यावर पाच येळा ओवाळला आन् 'ये ये भागिरथी कल्याण कर गं' म्हणून पाटाच्या पाण्यात सोडलं.  सारे जमल्याले गावकरी बायापोरांसह हळदीकुंकू वाहूनशानी पाया पडले.  आता काय लागीर व्हनार न्हाय.  इंजिनाला आन् माणसानला.  किसनगुरुजींनी पाण्याला नमस्कार केला आन् स्वतः पाण्यात उतरले तसं सार्‍यांनी जोरजोरात टाळ्या पिटल्या.  आन् मंग काय बगता, ज्यो त्यो पाचपावन केल्याला पाण्याला शिवायला लागला.  आम्ही पोरांनी अंगावरले आंगडी काढली आन् एकएक जण थारूळ्यात उड्या मारायला लागलो.  गावाच्या मनातली भीती गेली.  माणसांनी इंजिन आपलंसं केलं.  ज्या त्यो म्हणत व्हता.  'शेतकरी सुखी तर जग सुखी, शेतकर्‍यांचा कल्याण कर राजा.'  यशवंतराव हे अगदी त्यांच्या अंतापर्यंत शेतकर्‍यांनी आपआपल्या काळजात जपून ठेवले व्हते.  एकही निवडणूक ते कधी हरले नाहीत.