पत्र - ९
दिनांक - ०५-०७-२०१२
चि. सुप्रिया,
सप्रेम जयभीम.
स.न.वि.वि.
दिवाळीच्या सुट्ट्या नुकत्याच संपल्यात्या, थंडीची नुसती सुरुवात झाली व्हती. आई, बा सारी पोटं भरायला गेली, पण मी आता एकटाच निरगुडीला राहून शाळेत जात व्हतो. मला शिकायचं व्हतं. कळायला लागलंतं, माझा मीच स्वयंपाक करून जेवत व्हतो. गावांतल्या कुणाचं बी पडेल ते काम करायचो. त्यानं लय करून सयपाकच करायला लागायचा नाही. कुणीतरी कोर-चतकोर द्यायचं. आन् सारं शिवार होतंच ना ? सकाळपास्न सांज पवतोर एका जागेला पाय ठरायचा नाही. कुणी विचारायला नाही. आमकं कर, तमकं करू नको असं कोण विचारणार ? आईला काळजी असायची. ती पोटामागं गेलेली. आपला जलम गल्लीतल्या प्राण्यासारका. दुपारची शाळा सुटली की, सारी पोरं आपआपल्या घरी जेवायला जायची. मी आन् माझ्यासारखे चारपाच मित्र घरी जायचो नाही. घरी जेवणच नासायचं. खायचेच वांदे म्हणून आम्ही एक नामी युक्ती शोधलेली होती. गावांत चारपाच विहिरी. त्यानं पाचदहा जणांच्या बागायती. बाकी सारी जिरायती. कुणब्यांची घरं, बागायतीत ऊस आन् केळी. शाळा सुटली की आम्ही टोळीनं कुणाच्या तरी ऊसात घुसायचो. पार आत फडात जायचं पन ऊस मोडायचा नाही. ऊस मोडला तर फार मोठा फटाकड्यासारखा आवाज होतो. असा आवाज झाला, तरी शेतकरी पळत येतो. आत मग उसाच्या चिंध्या होस्तोवर मरणाचा मार खावा लागतो. म्हणून ऊस मोडायचा नाही. मुळापस्न उपटायचा. मुळाची माती झाडायची आणि आखा ऊस बुडक्याकडून खायला सुरुवात करायची. चुईट्या खड्डा करून पुरायच्या. पोट भरून ऊस खाऊन झाला, की एकाएकानं बाहेर निघायचं. तोंड मनगटानं पुसायचं. नाहीतर केळीच्या फडात शिरायचं. पाडाची केळं खायची. साल खड्डा करून पुरायची. दुसरा खड्डा काढायचा. त्यात गाभाळलेली पाडाची केळं काढून पुरायची. वरनं केळीचाच पाला घालायचा. पुरून झाली की त्यावर खुणेसाठी दगडं, विटंचा तुकडा ठेवायचा आणि पोटभर केळी खाऊन शाळेकडे सुटायचं. सापडलं तर शिव्यांची लाखोली. गालफाडं फुटायची. पुन्हा शाळंत मास्तर मारणार ते वेगळंच. पण, पोटातली भूक भागलेली असायची. आसं रोज चालू व्हतं. शाळा हेच आता घरं झालं व्हतं. झोपायलाही शाळंत. त्यावेळी सारीच पोरं अभ्यासाला, झोपायला, शाळंत असायची. कुंभार नावाचे एक शिक्षक अगदी आमच्यापेक्षा जरासे मोठे, सातवी झाली की तेव्हा शिक्षकाची नोकरी चालून घरी यायची. कुंभार मास्तरांची नुकतीच नेमणूक झालेली. मिसरूड नुकतंच फुटलेलं. ते आमच्यातच मिसळायचे. आम्ही सारी पोरं त्यांच्यासोबत खूप वेळ असायचो. रोज संध्याकाळी चिमण्या, कंदील घेऊन आम्ही शाळेत अभ्यासाला बसायचो. काळा धूर नाकात जाऊन सार्यांची नाकं काळी व्हायची. गाव सारं काळ्याकुट्ट अंधारात दिवंलागणीलाच झोपल्यालं असायचं. चौकाचौकांत ग्रामपंचायतीनं लाकडाच्या ठेंब्यावर कंदील लावलेली असायचे. अंधारामुळं खूप मोठ्या चोरांच्या, दरोडेखोरांच्या टोळ्या डाका घालायला यायच्या. अंधारात गडी आलं, घरं फोडली आणि पसार झाली तरी समजायचं नाही. सांच्याला गुरुजींबरोबर गावातली तरुण मंडळी गप्पा मारत बसायची. आमचं वाचण्यापेक्षा त्यांच्या शिळूप्याच्या गप्पा ऐकण्यातच सारं ध्यान असायचं. गप्पा म्हणजे राजकारण असायचं. आन् राजकारणात यशवंतराव हा विषय महत्त्वाचा असायचा.
गावशिवारात आन् गावात माणसांची वर्दळ वाढलेली असायची. पाचसात माणसं चावडीवरच झोपायची. कुंभारगुरुजी कार्यकर्त्यांना सांगत व्हते, 'आता बगा तुम्ही, यशवंतराव मुख्यमंत्री हाईती. कसा कायापालट व्हतो गावाचा ते.' एक म्हणाला, आहो गुरुजी, गावशिवारात लय खड्डं काढायचं चाललंया बगा. लोखंडाचं मोठ्यांलं पोलच्या पोल पडायला लागल्यात. गावातली आन् परगावातली लय पोरं काम करत्यात. खड्डं काडत्यात, पोल रवत्यात आन् जरमलाच्या तारवाणी अंगठ्यावाणी तारांची भेंडूळी फिरवीत पोलास्नी जाम फिट बसवून तारा वडत्यात. रोज बी मिळतूया की कणकून.
दुसरा म्हणाला, 'आवं गुरुजी, ह्या खेळ कशाचा म्हणायचा ? का ह्या बी यशवंतरावाचा खेळ हाय ?' एक साठीतला मिशावाला म्हातारा मोठ्यांदा हसत म्हणाला.
'तात्या, आवं हासू नका. ह्या खेळ न्हाय.' गुरुजी म्हणाले.
'आवं आसं तारास्नी कवा दिवं लागल्यालं बगीतलय ? सांगाकी गुरुजी.'
'तात्या, आवं ही खांबं सारी लायटीची हाईती. ह्या तरा लाईटीच्या हाईत्या.
खांबावरनी दिवं लागत्याल. आन् सारा गाव उजीडात भरून जाईल.'