• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

यशवंतराव चव्हाण आठवण आणि आख्यायिका-पत्र ७-१६ जून २०१२-२

तर चव्हाणसाहेब सांगत व्हते, 'या मोटेवरल्या विठोबाची  पोरं आता या शाळेत आली पायजेल.  शिक्षक बंधुभगिनींनो, गावात एकही मूल शाळेबाहेर ठेवायचं नाही.  जातपात, धम, लिंग काहीही बघायचं नाही.  कोणत्या का वयाचं मूल असेना.  शाळेत बसवा.  त्याला लिहायला-वाचायला शिकवा.  वयाचा विचारच करू नका.  सहा, सात, आठ, नऊ, दहा-कितीही वयाचं लेकरू असू द्या.  बसवा त्याला वर्गात.  गैरहजेरीची सोयच ठेवू नका.  सारे हजरच ठेवा.  शाळेच्या वेळा बदला.  आता इंग्रज नाहीत.  आपणच आपले मालक.  शिकण्यासाठी कायदा, नियम कशाचीच तुम्हाला अडचण येणार नाही, हे मी बघेन.  शाळा लवकर भरणार, रात्री उशिरापर्यंत चालू ठेवा.  शेतकर्‍यांच्या पोरांना शिकवायचं आहे.  शेतीची कामं लक्षात घेऊन वेळापत्रक तयार केलं पायजेल.  शाळेत पोरं येत नसतील, तर शाळा बांधाबांधावर भरवा.  मी तुम्हाला उघड्यावागड्यावर बसू देणार नाही.  ती माझी जबाबदारी.  कुणाही पोराला किंवा पालकाला त्याचं उत्पन्न विचारू नका.  आपल्या घटनेनं सगळ्यांना शिक्षण मोफत आणि समान करण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर टाकली आहे.  सोयी, सवलती, तुमचे पगार, भत्ते, कशाचीच काळजी करू नका.  मी तुम्हा सार्‍या गुरुजींच्या साक्षीनं या शाळेच्या इमारतीचं उद्‍घाटन झालं असं जाहीर करतो.

आता कार्यकर्त्यांसाठी थोडं सांगतो आणि मी आपली रजा घेतो.  मी आपला फार वेळ घेणार नाही.  महात्मा फुले, सावित्रीमाई फुले या दाम्पत्यानं आपल्या बहुजन समाजाला शिक्षणाची दारे खुली केली.  जोतिराव म्हणाले होते,

विद्येविना मती गेली
मतीविना गती गेली
गतीविना वित्त गेले
वित्ताविना शूद्र खचले
इतके अनर्थ एका अविद्येने केले...

काय वाट्टेल ते करा, पण कष्ट करणार्‍या, काम करणार्‍या, शेतकर्‍यांची पोरं, गोरगरीब रयतेची पोरं शिकलीच पायजेल.  एकही पोर उनाडक्या करत रानात, गावात हिंडणार नाही हे बघा.  मुलं माझी की त्याची, हा प्रश्न नाही.  मुलं ही देशाची संपत्ती आहे, हे लक्षात घ्या.  कुणी बाप आपल्या मुलाला शाळेत पाठवत नसला तर त्याला माझा निरोप द्या.  मुलाचं शिक्षण महत्त्वाचं.  शिक्षण हा त्याचा हक्क आहे.'

आसं बरंच काही ते बोलले.  मध्ये मध्ये टाळ्यांचा, हशांचा पाऊस पडत होता.  सभा संपली, गाड्या निघून गेल्या. गावकरी, पंचक्राशीतले शिक्षक यशवंतरावांच्या कौतुकात बुडाले व्हते.  आमच्या शाळेतले आकोबा सस्तेगुरुजी माझ्या बाबरोबर बोलत होते.  माझ्या बाला मला शिकवण्याची भलतीच घाई. आकोबागुरुजींनींच नाव शाळंत घातलेलं.  ते बाला रागवत असावेत.  पोरांचा कालवा.  गर्दी.  त्यात या दोघांचं बोलणं सुरू होतं.

सुप्रिया, अगं माझ्या शाळंची ही मोठी चित्तरकथा.  गुरुजींनी पंचावन्न साली माझं नाव शाळंत घातलं ते दिवाळीला.  म्हणजे ५५ साल गेलं.  मी परीक्षेला बसलोच नाही.  ५६ ला मी सप्टेंबरपर्यंत निरगुडीत व्हतो.  पुढे आम्ही पोट भरायला गेलो मावळात, कोकणात.  तिकडून परत आलो, तर परीक्षा संपलेल्या. पुन्हा मी पहिलीत आणि सत्तावन्नलाबी मी पहिलीत !  म्हणून गुरुजी रागवले व्हते बाला.  आता परीक्षेला बसवलं नाहीस, तर हे वर्ष पण जाईल म्हणाले.  मग बानं प्रयत्‍न केले असावे.  सत्तावन्नला मी पहिलीची परिक्षा दिली.  यशवंतरावांच्या या सभेनं मला दुसरीत घातलं.  पण ही गोष्ट काही माझी एकट्याची  नाही.  दहा-अकरा वर्षाचे, घोड्यासारखे घोडे पयली-दुसरीत असायचे.  अगं, मी सातवीला गेलो ना, तेव्हा काही पोरांना दाढ्यामिश्या आल्या व्हत्या.  गावात मुलगामुलगी उंडरत फिरतायेत म्हटलं, की गुरुजी मोठी पोरं घिऊन यायचे आन् अकरा वाजता सार्‍या गावातली पोरं उचलबांगडी करून शाळंत आणायचे.  कुणी कुणी चारचारदा नापास व्हायचे. त्याच वर्गात.  पाया पक्का झाला पायजेल  ना ?  सारे हसत.  पण, माझी शाळा मार्गाला लागली.  मला शिकण्याची ओढ लागली.  तिथं बिर्‍हाडं जात त्या गावच्या शाळेत मी जाऊ लागलो.  दर तिसर्‍या दिवशी नवी शाळा, नवे गुरुजी, नवे सोबती, नव्या कविता, नव्या चाली.  प्रत्येक शाळेतले शिक्षक कवितांना चाली लावत.  माझा आवाज चांगला व्हता.  मी एकच कविता अनेक चाली लावून म्हणत असे.  त्यात प्रत्येक शाळंत मी हौसेनं कविता म्हणून दाखवत असे.  परीक्षेला मात्र निरगुडीला जात असे.  चौथी पास होईपर्यंत बा मला परिक्षेला घिऊन जात असल्याचं मला आठवतं.  यशवंतराव नुसते मंत्री, मुख्यमंत्री नव्हते; तर ते बहुजन समाजातल्या गोरगरिबांच्या पोरालेकरांचे पालकही होते.