'आरं, यशवंतरावानं नव्हं. नाना पाटील अशा सजा द्यायाचे. त्यांनी दिली आसंल नव्हं.'
'आरं बाबा, आपल्याला का करायचं नामावली ? यशवंतराव येणार हाईत नव्हं भाषणाला ? त्यानं स्वांग घियाचं. बापू तुला सांगतू, तुझं टोपलं इल का मला इनायला ? तसच हे बी हाय. खोटंनाटं स्वांगाचं ती. नाना पाटलांचा पवाडा आमचा ज्योती कसा रंगवू रंगवून म्हणतू. तसा यशवंतरावांचा बी पवाडा म्हणतू. त्यो पवाडा म्हणणार, त्याचं जोडीदार संबुळ वाजवणार, आन् आम्ही दोगं गर्दीत थाळ्या फिरवणार.'
आसं कायबाय म्हणत चार-पाच जणांची टोळी टाळ मृदंग वाजवीत माळावरनं खाली गावाकडं उतारली. आन् बा म्हणाला, 'आपूनबी उद्याच्याला दहिवडी गाठायची. इथं मोठी सभा हाय. लय माणसं जमत्याल खेड्यापाड्याची. चार कणग्यांची गिराईकं घावत्याल. झापं-कुडीकं खपत्याल. घावलं तर बॅन्डालाबी काम मिळंल. सारी बरोबरची बिराडं तयारीला लागली. उदारीपादारी उकळून घ्या. उद्या सकाळचं ऊन व्हायाच्या आत दहिवडी गाठली पायजे.'
सुप्रिया, यशवंतराव, किसनवीर, नाना पाटील, बापूनाना कचरे, कासेगावकर वैद्य, नागनाथअण्णा नायकवडी यांचे पोवाडे आमचे लोक गात असत. पूर्वी शिवाजी आणि शिवाजीच्या सवंगड्यांच्या पराक्रमाचे पोवाडे गाणारे शाहीर आमचेच, हागनदारीत राहणारे. या लोककलावंतांनीच गांधी, नेहरू, सुभाषबाबू, यशवंतराव यांचे पोवाडे खेड्यापाड्यात नेले. काँग्रेस पक्ष गोरगरिबांपर्यंत यांनीच नेला. दांगट, गोसावी, जोशी, नाथपंथी डवरी गोसावी हे अत्यंत शीघ्र कवी यशवंतरावांच्या पराक्रमाच्या कथा बहारीनं सादर करत असत. खेड्यापाड्यात त्या काळात हीच करमणूक व्हती, प्रबोधन व्हतं. टी.व्ही. आतासारखा घराघरात नव्हता. सिनेमासुद्धा मोठ्या शहरात व्हता. भारूडं, तमाशा, पोवाडे, गोंधळ, जागरणं, बहुरुप्यांची सोंगं, नाना रंगाचे नाना ढंगांचे आमचे लोक माणसांबरोबर जनावरांचेही खेळ करीत. केवळ कवनांनी जिताजागता भूतकाळ लोकांपुढं उभा करीत. यशवंतराव आता या आख्यायिकांचा भाग झाले व्हते. नाना पाटील, यशवंतराव, नागनाथअण्णा, किसनवीर, सातार्यातल्या घराघरात गेले, ते या लोकांच्या प्रसारामुळे. प्रचाराची मोठी फळी बिनपगारी, पोटावारी पक्षाला मिळायची. आता लोककलावंतांना मानधनं मिळतात. तशी ती तेव्हा नव्हती. या लोककलांना, लोकलावंतांना राजाश्रय दिला तो यशवंतरावांनी. नाट्यपरिषद मंडळ, राज्य नाट्यस्पर्धा, तमाशा विकास परिषद हे सारे उपक्रम यशवंतरावांनी सुरू केले. पुढे काही चाललेत, काही बंद पडले. भीक मागण्यासाठी हा समाज मात्र दारोदार हिंडतच राहिला.
दुसर्या दिवशी आमची गाढवं दहिवडीच्या वाटंला लागली. शंभू महादेवाच्या डोंगररांगांत त्यावेळी डोंगर उतरला की उताराला दगडांची चवतळ असायची. सगळ्यांनी एकावर एक दगडं मांडायची. मग म्हारे जायचं. सारे वाटसरू तसं करीत. असं का करीत, माहीत नाही. दगडं पडली तरी ती पुन्हा रचायची. मगच पुढं जायचं. काय असेल या दगडात, शोधलं पाहिजे. भरदुपारी आम्ही दहिवडीत पोहोचलो. त्याकाळी बाजारतळावर भटक्यांची पालं पडलेली असत. घिसाडी, कैकाडी, दांगट, जोशी, माकडवाले, दरवेशी - कितीतरी जातीचे भिकमागते, बाजारतळावर आपापल्या भाईबंदांबरूबर पालं मांडून पोटापाण्याचा धंदा करीत व्हते. आमची बिराडंबी त्यात जावून मिसळली. दहिवडीचा हा बाजारतळ म्हणजे तिकाटणे. म्हसवडला जाणारा, रसता, नात्यापुत्याकडे जाणारा रस्ता, सातार्याकडं जाणारा रस्ता - असं तिन्ही रस्त्यांच्यामध्ये हे तिकाटनं झाल्यालं होतं. त्याला बाजारतळ म्हणत. बाजारतळ म्हणजे फार मोठी मोकळी जागा. दहिवडी त्यावेळी आतासारखं शहरवजा नव्हतं. मोठं खेडं व्हतं. आठवडी बाजाराचं. आम्ही चारपाच दिस तिथं राहिलो. एका संध्याकाळी गावातले कार्यकर्ते, म्होरके, आम्हा लोकांच्या बिराडावर आले. तसं सारी माणसांनी गर्दी केली. पुढारी सांगत व्हते, उद्याला यशवंतरावांची सभा आहे. तुमची सारी बिराडं, पालं नदीच्या पात्रात तात्पुरती हलवा. सभा झाल्यावर मग पुन्यांदा या. सार्यांनी होकार भरला. सभेसाठी सारा बाजारतळ झाडूनझुडून स्वच्छ केलाता. एका बाजूला भलं मोठं स्टेज बांधलंत. बैलजोडीची निशानी भिंतीभिंतीवर काढल्याती. तिरंगा झेंड्यांनी सारा बाजारतळ सजवला व्हता. दिस ऊनाचं, माणदेशी ऊनाचा चटका मैंदाळ, तुझ्यासारख्यांना सोड, तिथं राहणारालासुद्धा त्वांड बाहेर काढता यायचा नाय. असा ऊनाचा नक. तरी आकरीत आसं, की हळूहळू माणसं जमायला लागली ! मटकीला मॉड फुटावं तसं बाजारतळ माणसांनी फुलला. कुणाला तरी गावात कैकाड्यांची पालं उतारल्याचं लक्षात आलं. लागलीच कैकाड्यांना आदेश आला, यशवंतरावांची मिरवणूक उघड्या जिपीतनं काढायची हाय. बँडबाजा घिऊन या. सारे कैकाडी बॅन्ड वाजवीत. प्रत्येकाला मोठा मान मिळाल्यासारखं झालं. प्रत्येकाला सार्या समाजाम्होरं आपली कला दाखवता येईल आसं वाटलं. झाडून सारे आपापली सणगं घिवूनशानी निगाले. मी काहीच वाजवीत नव्हतो. पण बाच्या धोतराच्या सोग्याला धरून गर्दीत मिसाळलो. यशवंतरावांच्या गाडीबरोबर आणखीन चारपाच गाड्या होत्या. नदी ओलांडून गाड्या अलिकडं आल्या. गावकर्यांनी सजवलेल्या उघड्या जीपमध्ये यशवंतराव, मालोजीराजे, आणखीही एक कुणी भिंगारदिवे उभे राहिले. सारे लोक काँग्रेसचा, यशवंतरावांचा, गांधी-नेहरूंचा जयजयकार करत, जयघोष करत निगाले. मिरवणुकीच्या सर्वात पुढे बॅन्डवाले वाजवीत होते.