पत्र - ४
दिनांक ०६-०२-२०१२
चि. सुप्रिया,
सप्रेम जयभीम.
खरं तर त्यावेळी मी तिसरी किंवा चौथीत असेन. फार समजण्याचं वय होतं असंही नाही. पण मी तेव्हा बँड पथकांत घुंगर्या वाजवत असे. निवडणुका आल्या की लोक फार जागरूकता दाखवतात आणि निवडणुका संपल्या की सपाटून झोपी जातात. लोकांची स्थिती येणा देणार्या गाईसारखी असते. येणा यायल्या लागल्या की ती चारी पाय झाडू लागले, मोठमोठ्यानं हंबरू लागते. ओरडण्यानं लोकांना कळते की हिला आता बाळ होणार आहे. आयाबाया तिला मदत करीत असतात. आणि मोकळी झाली की हुश्यऽ करून निपचीत पडते. पाच वर्षांसाठी. आपल्या लोकशाहीचंही तसंच आहे, निवडणुका करणारं यंत्र. तर काय सांगत होतो, कसल्याही निवडणूका नव्हत्या. जत्राखेत्रा नव्हती. लगीन इव नव्हतं आन् कुणाची मयत बी झाली नव्हती. पण माणसं सारी फलटणाकडं पळत होती. आनंदानं नाचत हाती. सार्याच पक्षातली माणसं एकमेकांना आनंदानं मिठ्या मारीत होती. रानामाळातली सारी काम धामं झाली होती. सुगी नुकतीच संपल्याली. खळ्यावरनं सारी दौलत घराघरांत पोचल्याली. गहू, हरभरा, ज्वारी, तुरं, मूग, मटकी, हुलगं, सार्या शेतकर्यांच्या खळ्यावरनं घराघरांत आलं होतं. पाऊस चांगला झालाता. पिकं सोन्यावाणी आलीती. गावकीतली सारी बलुती बहुतं उकळत हिंडत होती. त्यांना शेतकरीराजा खुशीनं वतनातल्या कामाचं दाण टाकीत होता. बिनभिकारी गल्लोगल्ली गांव मागीत हिंडत होते. गावातली टोळकी कामधंदा उरकल्यानं चावडीवर, पारावर चंच्या सोडून शिळुप्याच्या गप्पा मारीत बसले होते. लिंबाच्या झाडाला लगडलेल्या लिंबोळ्यांचं घस गळायला सुरुवात झाली होती. लिंब, पिंपळ, वड, चिंच यांना नव्या नवतीचा कवळाझार पाला फुटायला लागला होता. चैत्रपालवी का, काय म्हणत्यात ? पण चिंचचा पाला तू मुंबईकर असल्यानं खाल्लास की नाही मला माहिती नाही; पण राजूदादा, अजितदादा तुला सांगतील. लहान मुलं चिंचेचा तांबूस रंगाचा शेंडा आणि कवळा पाला आणि गूळ यांचा लाडू करून खात. आंबटगोड असलेला हा पाला फार छान लागतो. तुझ्या मुलांना तू आवर्जून दे, मस्त असतो. नुसती चिंच आंबट असते तर नुसता गूळ गोड असतो. दोन्ही एकत्र खाऊन बघायला हरकत नाही. हे लिहिताना सुद्धा लहानपण आठवून तोंडाला पाणी सुटतंय. खरंच पोरांना हौसेनं रानमेवा खाऊ घातला पाहिजे. कैर्या, बोरं, जांभळं, करवंदं हे खायलाच पाहिजे. कवटं सुद्धा याचवेळी मिळतात. ती पण गूळ घालून खातात. मजा असते. हे खरं जगणं. त्यासाठी पैसापाणी काहीच लागत नाही गं !.... तर माणसं का पळत होती हे शाळा चालू असती तर समजलं असतं. मास्तरनं सांगितलं असतं ना ? शाळंला उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागलेल्या. कुण्या मोठ्या माणसाला इचारावं तर ज्योत्यो आपल्याच नादात. आम्हां बारक्या पोरास्नी कोण काय सांगणार ? वर डाफरून म्हणणार ये, तुला काय करायचं रे x x अशा फुकाच्या शिव्या खाव्या लागायच्या. सुप्रिया, शिव्यांची पण एक गंमत आहे. मी लहानपणी जेवढ्या शिव्या खाल्यात ना तेवढ्या कुणीच खाल्या नसतील. गावात एकबी पाटील उरला नसंल ज्यानं आपली आयमाय काढली नाय. त्यानं चौकशी करायला मन धजत नव्हतं. मोठं मोठं पुढारी तर आधीच मुंबईला पळालं व्होतं. काय झालं कुणाला ठावं ? पर दुपार झाली तसं गावातल्या लोकांनी पाडव्याला गुढ्या उभारतात तसल्या गुढ्या उभारल्या. आनंदानं साखर वाटत होते. वरची आळी, मधली आळी, खालची आळी, सगळे पक्ष, समंदे पुढारी आनंदाने एकमेकाला टाळ्या मारीत होते. काँग्रेसवाल्यांना समितीवाले म्हणयचे, 'झाला का नाय ?'
काँग्रेसवाले म्हणायचे, 'झाला बाबा झाला, पर बाबांनू मंगलकलश यशवंतरावांनीच आणला नव्हं.'
'हो रे बाबा. आणला, पर आमी रक्ताचं पाणी केलं तवा नव्हं. आन् शंभर हुतात्मे झाले तवा आणला यशवंतरावांनी मंगलकलश' समितीवाले म्हणायचे.
आम्ही त्यांच्या तोंडाकडे बगायचो. हात्तीच्या ! हे मंगलकलश काय प्रकरण आहे ? ही मोठी माणसं आसं कोड्यात का बरं बोलतात. घरात आईबाला इचारायची सोयच नाही. ती आडाणी टकुर्याची. त्यास्नी काय ठावं कसला कलश ? पण घरूघर साखर मिळतीया ना. आम्ही सारी खुश. पाटलाच्या वाड्याम्होरं माणसं जमायला लागली. तिथं मोठ्यामोठ्या माणसांनी साकार वाटायला धरलीती.
'होणार होणार होणार ! म्हंजी काय झालाच !'