चला, बरे झाले. तुम्हीही यात लक्ष घातलेत. छान ! आता आपले पुढारी तालुका पुढारी झालेत. राज्याचे नेतृत्व करायचे तर माहिती हवीच. सेटलमेंटच्या जमिनी, मालतीबाई बेडेकर यांची आठवण ते सांगत होते. मालतीबाई बेडेकर सेटलमेंट स्कूलवर सुपरिटेंडंट होत्या. त्यांनी मला ही आठवण सांगितली होती. त्या या गुन्हेगार जमातींच्या वसाहतीतच राहायच्या सुपरिटेंडेंट म्हणून. एकदा सायंकाळी बाई रेल्वेच्या रूळांच्या कडेने फिरावयास गेल्या होत्या. तिनहीसांज झाली. त्यांनी मागे वळून सहज पाहिले. तर त्यांच्यामागे एक काळा कुळकुळीत धिप्पाड माणूस हळूहळू चालत येत होता. बाई घाबरल्या. जवळपास कुणीच नाही. वेळ तिन्हीसांजेची. हातपाय गार पडले, पायच उचलेना. तो माणूस मागेही जाईना, पुढेही जाईना. उभा राहिलेला. बाईंनी धाडस केले. चालू लागल्या. तसा तोही चालू लागला. आता मात्र बाई फारच घाबरलया. घाम फुटू लागला. काय करावे ? त्या भरभर चालू लागल्या. तोही भरभर चालू लागला. त्यांनी धाडस करून कोण आहे ? म्हणून विचारले. तसा तो जवळ येत म्हणाला. 'बाई, मी रायाप्पा गायकवाड.' अरे, तुम्ही होय ! मी किती घाबरले. तो माणूस म्हणाला, 'बाई, उशीर झाला, मी तुमच्या मागं मागं आहे. अंधारात तुम्ही कुठं निघालात एकट्या ! आमची माणसं तुम्हाला ठावं हाय नव्हं. मग मला पंच म्हणाले, पोरगी तरुण आहे. तू मागं मागं जा. म्हणताना राकनीला पाठविले.'
लक्ष्मण, 'बळी' वाचलीत की नाही ? मला तरी 'बळी'मुळेच सेटलमेंटचा प्रश्न समजला.
मी 'बळी' वाचल्याचे सांगितले. मी म्हणालो, साहेब एवढे केव्हा वाचता ? एवढ्या व्यापात ?
लक्ष्मण, कामासाठी काही वाचावे लागते. काही आपल्या मनाची मशागत करण्यासाठी वाचावे लागते. करमणूक म्हणून मी काही वाचत नाही. यातील ग्रंथ बाजारात आले की मी ते मागवून घेतो. मग क्रमाने, माझ्या सोयीने ते वाचत जातो. सावकाशीने वाचतो.
साहेब, हा प्रश्न तुम्ही असतानाच सुटला असता. आता याचा सीमा प्रश्न झालाय.
नाही लक्ष्मण, तसे होणार नाही. मी आहेना तुमच्या बरोबर. हा राहून गेलेला प्रश्न आहे. सीमाप्रश्नाची गोष्ट वेगळी आहे. हा वंचितांना न्याय देण्याचा प्रश्न आहे.
साहेब हसतहसत उठले. कपाटातील पुस्तक काढले. ते युरोपातील घेट्टोमधील कुणा लेखकाच्या काही अनुभवावर आधारलेले होते. मला आठवत नाही. ते किती चौफेर वाचत हे लक्षात आले.
सुप्रिया, मी दैववादी नाही, पण मनात सतत सल टोचत राहतो. पुन्हा बाबासाहेब, शाहू महाराज, म. जोतिराव फुले, यशवंतराव होतील काय ? उत्तरही मला माहिती आहे. पण आजची उतरती कळा पाहून अशी अपेक्षा करावी अशी स्थिती नाही. प्रत्येकाला आपले पडले आहे. कुणाला वंचितांच्या चिंता आहे ? वंचितांना न्याय द्यायची कुणाची तयारी आहे. सुसंस्कृतपणा, सभ्यपणा, चांगुलपणा ही मूल्ये कालबाह्य झाली आहेत. माणूस माणुसकीला पारखा झाला आहे. राजा सोन्याचा आणि कान पितळेचे असे आपल्या राज्यकर्त्यांचे नि संसदीय लोकशाहीचे झाले आहे. अत्यंत हलक्या कानाचे, हलक्या मनाचे, हलक्या वकुबाचे लोक हलकेच असणार. पैशाने तालीवार असणे आणि मनाने तालीवार असणे यात फार मोठा फरक आहे, नाही ?
ती. सौ. वहिनींना, बाबांना सप्रेम जयभीम.
तुझा,
लक्ष्मणकाका