• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

यशवंतराव चव्हाण आठवण आणि आख्यायिका-पत्र ३७-३११०२०१२-१

४१ वर्षांपैकी तीन तपांहून अधिक काळ वेणूताई आजाराशी झुंजत होत्या.  साहेब भूमिगत असताना त्या प्रथम आजारी झाल्या.  त्या अत्यवस्थ असतानाच पोलिसांनी यशवंतरावांना फलटणमध्ये अटक केली.  वेणूताईंना त्यांचे थोरले दीर गणपतराव आणि त्यांच्या पत्‍नी भागीरथीबाई यांची सेवा करावी लागली.  या दोघांनाही क्षय रोगाची बाधा झाली होती.  त्यांची सेवा करता करता वेणूताईंना क्षयरोगाची बाधा झाली.  १९४२ साली त्यांना मिरजेच्या दवाखान्यात दाखल व्हावे लागले होते.  त्या रोगातून त्या मुक्त झाल्या तरी तेव्हापासून कमीअधिक प्रमाणात त्यांना आजाराशी झुंज द्यावी लागली.  असाध्य रोगाने त्यांची फुफ्फुसे अशक्त बनली.  आणि त्यातून त्या दम्याच्या विकाराने हैराण झाल्या.  साहेबांच्या कुटुंबाच्या अत्यंत कठीण काळात सारे चव्हाण कुटुंब ताईंच्या खांद्यावर पडले होते.  नवरा कायम भूमिगत, घरात दीर जाऊ आजारी.  आर्थिक स्थिती बेताची.  यशवंतरावांनी आताच्या पुढार्‍यांसारखी दौलत जमा केली नव्हती.  तसला विचारही त्यांनी कधी केला नव्हता.  आजारी असलेल्या पत्‍नीला मूलबाळ होणार नाही ही स्पष्ट कल्पना डॉक्टरांनी स्वतः चव्हाणसाहेबांना, वेणूताईंना दिली असताना आणि ताईंनी साहेबांकडे दुसरा विवाह करण्यासंबंधी त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्‍न केला असतानाही साहेबांनी कधी असला विचार केला नाही.  महाबळेश्वरच्या चाललेल्या शिबिरात त्यांचे मित्र आबासाहेब वीर यांनी अत्यंत खाजगीत चव्हाणसाहेबांना दुसरा विवाह करण्यासंबंधी गळ घातली तेव्हा चव्हाणसाहेब म्हणाले, तुम्हाला कोण म्हणाले मला मुलगा नाही.  यावर आबा अवाक झाले.  यांना मूलबाळ आहे आणि आपल्याला माहीत कसे नाही ?  किसनवीरही सावलीसारखे चाळीस-पन्नास वर्षे साहेबांबरोबर होते.  ते गोंधळल्याचे लक्षात घेऊन साहेब म्हणाले, आबा, मला मुलगा आहे आणि त्याचे नाव 'वेणू' आहे.  या विषयाची चर्चा पुन्हा करायची नाही.  जिने अत्यंत कठीण काळात माझी आई आणि माझ्या कुटुंबीयांना पाठच्या भावासारखे सावरले त्यांना सवत आणण्याची साधी कल्पनासुद्धा मी करू शकत नाही.  यापुढे या विषयावर चर्चा करायची नाही.  असे 'एक दुजे के लिय' बनलेले हे जोडपे होते.

सातारला पोचेपर्यंत माझ्या मनात असे विचार येत राहिले.  दुसऱ्य दिवशी मुंबईला निघालो.  आतासारखी चार-पाच तासांत मुंबई गाठता येत नव्हती.  कधी दहा तास कधी पंधरा पंधरा तासही लागत असत.  दुसर्‍या दिवशी रक्षाविसर्जनाचा विधी होता.  मी आणि यल्लाप्पा वैदूगुरुजी धावतपळत स्मशानभूमीत पोचलो.  चंदनवाडी स्मशानभूमीत बरीच गर्दी होती.  राज्याचे सारे मंत्रिमंडळच उपस्थित असावे.  राजकारणी, समाजकारणी. उद्योगपती, कार्यकर्ते, जीवाभावाचे मित्र.  सारे चव्हाणसाहेबांचे सांत्वन करायला जमले होते.  शैक्षणिक क्षेत्रापासून सर्व क्षेत्रांतील नामवंत मंडळी उपस्थित होती.  मी व यल्लाप्पागुरुजी पोचलो तेव्हा चव्हाणसाहेब एका बाकावर विमनस्क स्थितीत बसले होते.  चेहरा सुजला होता.  डोळे सुजले होते.  मी त्यांना पाहिले आणि त्यांचेकडे निघालो.  साहेबांनी मला पाहिले आणि स्वतः उठून माझ्याकडे येऊ लागले.  लोक मोठ्या औत्सुक्याने पाहत होते.  साहेब जवळ आले नि मिठी मारली.  लक्ष्मण, बाई गेल्याहो, म्हणून माझ्या खांद्यावर डोके ठेवून रडू लागले.  मीही रडत होतो.  कोणत्या शब्दात सांत्वन करावे ते कळेना.  मी त्यांना बाकावर बसवले.  सारे मोठमोठे लोक कुजबुजत होते.  कोण हा मुलगा ?  माझ्या गळ्यातली शबनम बघनू मी कोणी राजकारणी तर वाटत नव्हतो.  कुणीतरी नाव सांगितले.  चर्चा हळू आवाजात सुरू होती.  साहेब मला सांगू लागले.  लंडनच्या संमेलनासाठी कोणाला काय बोललेत.  मला ते संमेलन आणि इतर गोष्टी ते सांगत होते.  पण डोळ्यांचे पाणी संपत नव्हते.  असा मोडून गेला होता कणा साहेबांचा.  अत्यंत हळव्या मनाचा माणूस आणि पत्‍नी ज्या वयात अत्यंत गरजेची होती त्याच वयात तिचा वियोग.  आकाशच कोसळले होते.  

साहेबांना धक्क्यावर धक्के बसत होते.  त्यांचे अत्यंत विश्वासू म्हणून ज्यांनी वीस वर्षे चव्हाणसाहेबांचे स्वीयसाहाय्यक म्हणून काम केले होते आणि त्यांचे सूर जुळले होते असे डोंगरे नावाचे त्यांचे सचीव होते.  त्यांचे या कुटुंबाशी फार स्नेहाचे संबंध होते.  मंत्री आणि सेवक या पलिकडे जाऊन ॠणानुबंध होते.  चव्हाण कुटुंबीयांची सावलीसारखी राखण श्रीपाद डोंगरे यांनी केली होती.  परस्परांबद्दल प्रचंड विश्वास, साहेबांना काय हवे आहे ते साहेबांच्या नजरेत पाहून डोंगरे समजून घेऊ शकत असत.  ते डोंगरे गेले.  साहेबांचे अत्यंत विश्वासू निकटवर्ती आबासाहेब वीर.  ४२ च्या स्वातंत्र्यचळवळीत भूमिगत अवस्थेत असताना हे दोघे मैत्रीच्या धाग्याने बांधले गेले.  राज्यता असोत की केंद्रात असोत, आबा साहेबांबरोबर राहिले.  भल्याभल्या संकटकाळात आबा साहेबांच्या पाठीशी ठाम उभे राहिले.  नजीकचे मित्र शत्रू म्हणून उभे राहिले आणि दूरचे शत्रू मित्र झाले.  कडेलोटाचे प्रसंग उभे राहिले.  त्या प्रत्येक प्रसंगात आबा त्यांच्या सर्व शक्तीनिशी उभे राहिले.  आबा स्वभावाने फार कडक होते.  कधी कधी याचा त्रासही साहेबांना सोसावा लागे.  या दोघांची मैत्री फार घट्ट होती. ती तुटावी म्हणून अनेकांनी प्रयत्‍न केले पण या दोघांची मैत्री अतूट राहिली.  साहेब सांगत, मी महाराष्ट्राचा देशाचा नेता असलो तरी सातारा जिल्ह्यात आबा माझे नेते आहेत.  ते आबासाहेब वीरही गेले आणि ६ मार्च १९८३ रोजी तर त्यांच्यावर फार मोठी संकटाची कुर्‍हाड कोसळली.  त्यांनी पोटच्या पोरासारखे ज्याचे लालनपालन केले तो त्यांच्या गणपतरावांचा धाकटा मुलगा डॉ. विक्रम याचे अचानक अपघातात निधन झाले.