सुप्रिया, जसे मी साहेबांशी मोकळेपणाने बोललो तसे अण्णांशीही अत्यंत मोकळपणाने बोलत असे. मी सेवादल सैनिक होतो. पण अण्णांना माझी जात कोणती ते माहीत नव्हते. अण्णा मोठे विद्वान विचारवंत वगैरे नव्हते. ते अत्यंत साधे, सरळ, पारदर्शी व्यक्तिमत्त्व होते, लोभस होते. गोरगरिबांबद्दल, उपेक्षित वंचितांबद्दलची त्यांची कणवही बुद्धाच्या करुणेशी धागा जोडणारी होती. 'उपरा' वाचल्यावर त्यांना मी माझी जात, मी जेथून आलो ती जागा समजली आणि गहिवरून गेले. माझ्यासाठी, माझ्या माणसांसाठी, वेदानांसाठी डोळ्यांना धारा लागलेले एस.एम.मी पाहिलेत. मुंबईला आम्ही परिषद भरवली होती. त्या परिषदेला एस.एम.नी जे मार्गदर्शन केले ते आसवांनी भिजलेल्या थेंबासारखे. परदुःख काय असते ? इतरांच्या दुःखाने दुःखी होणारे पुढारी आज स्वप्नातही पाहायला मिळणार नाहीत असे इतरांसाठी तुरुंगात यातना भोगणारे पुढारी आम्ही पाहिले आहेत. त्यांचे अंतरीचे नाते कसे स्फटिकासारखे होते हेही पाहिले आहे. माझ्या सोलापूरला झालेल्या सत्काराची आठवण तर मी नेहमीच सांगतो. साहित्य अकादमी मिळाली म्हणून सोलापूरच्या आमच्या संघटनेच्या लोकांनी माझा सत्कार ठेवला होता. अध्यक्ष होते एस.एम. अण्णा तर प्रमुख पाहुणे होते ऍड. शंकरराव खरात, प्रा. अरुण कांबळे, समोर मोठा जनसमुदाय. अरुण कांबळे माझे मित्र. ते बोलायला उभे राहिले. सारखे 'बाबासाहेब म्हणाले होते' असे त्यांच्या तोंडी यायला लागले. सभा अस्वस्थ झाली. काही म्हातारे उठून म्हणाले, बास करा. ही काय महारांची सभा आहे ? मी उठून सारे शांत केले. सभा सुरू झाली. पुन्हा अरुणचे तसेच सुरू झाले. आता मात्र सारेच उठले. मी पुन्हा माईकवर जायला लागलो. अण्णांनी मला बसवले. माईकवर गेले आणि म्हणाले, खाली बसा. सारे गपचीप बसले. या पोराचा सत्कार का करताय ? त्याने पुस्तक लिहिले म्हणून ना ? मग याच्या हातात पेन कोणी दिले ? डॉ. आंबेडकरांनीच ना ? तुम्हाला माणसात कुणी आणले ? बाबासाहेबांनीच ना ? त्यांचे नाव घेतले तर असे अस्वस्थ का होता ? अरे, मी स्वतःला काही ब्राह्मण मानत नाही. पण माझा जन्म तर एका ब्राह्मण आईच्याच पोटी झाला ना ? तरीही बाबासाहेबांना मी गुरू मानतो. त्याची मला लाज वाटत नाही. अभिमान वाटतो. आणि तुम्हाला ज्याने जनावरांसारखे जगत होता, माणसे केले, आम्हाबरोबर मांडीला मांडी लावून बसवले त्या महापुरुषाचे नाव घेतले की गडबड करता. अण्णांनी दम दिला, सभा शांत झाली. पण सात्त्वि संताप काय असतो तो सार्यांनीच पाहिला.
अण्णांच्या बरोबर पुण्याला यायला निघालो. गाडीत गप्पा सुरू झाल्या. अण्णाही आता थकले होते. नेहरू शर्ट, पायजमा, वुलनचा कोट, अत्यंत सडपातळ देहयष्टी, आवाज खडा, खडखडीत बोलणे, प्रसंगी शब्दांना विलक्षण धार असे तर कधी ती हितगुज करणार्या मित्रांची वाटे, कधी मिश्किली अशी की पोट धरून हासायला लावीत. खट्याळपणाही खास त्यांचाच. विनोदांची लयलूट असे. असे अत्यंत हलकेफुलके वातावरण ठेवीत. मधून मधून मी चिमटे काढीत असे. ते अत्यंत मिस्किलपणे डोळे मिचकावीत हातावर टाळी देत. फार छान हासत स्वगत, प्रकट चिंतन करीत. खरे तर अशा वेळी वाटते, आतासारखी यांत्रिक करामती करणारी यंत्रे असती तर तुम्हा मुलांना अण्णा समजले असते.
अण्णा तुमचे नि यशवंतरावाचे नेमके मेतकूट काय होते हो ?
अरे, काय शब्द शोधलास 'मेतकूट'. होते खरे आमचे मेतकुट. यशवंतराव म्हणजे काळजाला कुरूप असलेला माणूस होता. बहुजनांच्या कल्याणाचे कुरूप त्याच्या काळजाला झाले होते. बहुजनांचे कल्याण, त्यांच्या दुःखावर इलाज शोधणे हा त्यांचा ध्यास होता. आमचे मार्ग वेगवेगळे होते. पण व्हेवलेंग्थ एकच होती. वेगवेगळ्या पातळ्यांवर पण आम्ही एकच विचार करीत असू. आमचे मेतकूट बराक नंबर बारामध्ये होते. येरवड्याच्या जेलमध्ये कॅम्पातल्या दिवसांत. आम्ही स्वातंत्र्यासाठी खस्ता खाल्या. तुरुंगवास सोसला. तेव्हा कुठे होते सत्तेचे स्वप्न. साम्राज्यशाही वरवंटा फिरत होता. जीवाचे नाव मरण ठेवून जगणारे आम्ही. त्यावेळचे तरुण हेच आमचे मेतकूट होते.
ते मुख्यमंत्री तर तुम्ही विरोधी पक्षनेता. मग कसे जमत होते ? की विरोधासाठी विरोध होता ?
नाही, नाही. असे नकली कशाला काय असेल ? आम्ही माणसेच मंतरलेल्या काळातली असली होतो. विचारांची स्पष्टता होती. त्यांनी निवडलेला मार्ग त्यांचा होता. माझा मार्ग माझा होता. पण, लोकशाही, समाजवादी मूल्य, साधनशुचिता, प्रामाणिकपणा, विश्वास हे राजकारणात फार महत्त्वाचे असते.