यावर मी म्हणालो, साहेब, मग यातली कोणती विचारसरणी आपण स्वीकारलीत आणि आपले या क्षेत्रातले गुरू कोण ?
साहेब हसले. आले लक्षात. माझी आई माझी गुरू. ग्रंथ हेच माझे गुरू. याशिवाय जगात मला कुणी गुरू नाही. आणि मी कुणाचा शिष्य नाही की मी कधी माझा मठ स्थापन केला नाही. लोकशाही समाजवादावरची माझी निष्ठा दिवसेंदिवस घट्ट होत गेली. तसे मी मार्क्सवादाच्या प्रेमात पडलो. रशियन राज्यक्रांतीबद्दलही मी बरेचसे वाचले. 'टेन डेज दॅट लुक द वर्ल्ड' हे जॉन रीडचे पुस्तक आमच्या बराकीत फारच गाजले होते. मी त्या पुस्तकावरील चर्चा आणि त्याचे प्रत्यक्ष वाचन या दोन्ही तऱ्हांनी ते समजावून घेतले. रशियन क्रांतीची सगळी कहाणी रोमांचकारी आहे. आणि त्यातील लेनिनचे कार्य जागतिकदृष्ट्या ऐतिहासिक स्वरूपाचे आहे. त्यामुळे त्याच्या व्यक्तिमत्त्वाची फार मोठी छाप माझ्या मनावर पडली. रशियन राज्यक्रांती ज्या प्रकाराने झाली त्या प्रकारे इतर देशांत राज्यक्रांती होईल की नाही हे सांगणे अवघड आहे. किंबहुना हे काम अवघड आहे, अशीच माझी भावना होती. परंतु लेनिन यांच्या राजकीय व आर्थिक परिस्थितीचे विश्लेषण करून निर्णय घेण्याच्या शक्तीबद्दल अचंबा वाटत राहिला. लेनिनसंबंधी वाटणारी आदराची भावना तेव्हापासून जी मनात बसली ती त्यानंतरही आजपर्यंत वाढत राहिली आहे.
पण मग आपण रॉयीस्ट कधी झालात ? मी म्हणालो.
मानवेंद्रनाथ रॉय यांच्यासंबंधी या बराकीमध्येच मला खूप समजले. डॉक्टर शेट्टी आणि ह.रा. महाजनी यांनी मला रॉय यांच्यासंबंधी खूप माहिती दिली. जागतिक वस्तुनिष्ठ चळवळीतले त्यांचे योगदान सांगितले आणि त्याचे मतभेद का झाले तेही मी समजावून घेतले. जेलमधून बाहेर पडल्यावर मी माझ्या अनेक सहकारी मित्रांशी त्यांच्या आग्रहाखातर काही काळ रॉय यांच्या विचारांचा पाठपुरावा केला होता. पण म्हणून मी काही रॉयीस्ट ठरत नाही.
या सर्व अभिजनवर्गात तुम्हाला स्वत्व कसे सापडले ? तुम्ही तर खेड्यापाड्यातून गेलेलात. मग या सर्वात तुम्हाला अडचण होत नव्हती का ? मी म्हणालो.
या बराकीत सर्वच विषयांची चर्चा होत असे. हे लोक कसे अडाणी आहेत हेही कळे. त्यांचे केवढे गैरसमज आहेत. यातले बरेचसे उच्च प्रवृत्तीचे असत. सत्यशोधक चळवळीसंबंधी आणि म. फुले यांच्याबद्दल या लोकांना काही माहिती आहे असे मला वाटत नसे. यामध्ये अपवाद म्हणून समाजवादी विचारसरणीची मंडळी. होती. त्यात एस.एम. जोशी, ह.रा.महाजनी, मुस्कुटे ही मंडळी काहीशी अपवाद होती. ती समजूतदारपणे बोलत असत.
एस.एम. जोशी हे विशेषतः तरुण कार्यकर्त्यांच्या चळवळीकडे आणि त्यांच्या प्रश्नाकडे मोठ्या आत्मियतेने पाहत असत. ते त्यावेळी युथलीगचे पुढारी होते. बारा नंबरच्या बराकीमध्ये एके दिवशी सायंकाळी युवक चळवळीच्या संबंधाने त्यांचे एक सुरेख व्याख्यान झाल्याची मला आठवण आहे. त्यांची त्या विषयाची तळमळ आणि स्वातंत्र्यासंबंधी असलेल्या भावनची तीव्रता, सर्व जातीच्या मंडळींना एकत्र घेण्याची वाटणारी गरज या त्यांच्या विचार सरणीने माझ्या मनात त्यांच्याबद्दल जिव्हाळा निर्माण झाल. दररोज चाललेल्या वादाच्या खटपटीत ते फारसे भाग घेत नसत. प्रसंगी ते वादात पडत. परंतु जेव्हा पडत त्यावेळी मोठ्या हिरीरीने ते पडत. त्यांच्या सेवाभावी वृत्तीबद्दल मला फार मोठा आदर वाटण्यासारखा अनुभव या काळात आला. जेलमध्ये त्यांनी सत्याग्रहींचे केस कापण्याचे आणि दाढी करण्याचे काम आपणहून आपल्याकडे मागून घेतले. आणि हळूहळू ते यात थोडेफार तज्ज्ञ झाले. ते काम मोठ्या आनंदाने आणि हसतखेळत करीत असत. त्यामुळे एस.एम.जोशी हे बाराव्या बराकीतील एक लोकप्रिय व्यक्तिमत्त्व होते. एस.एम.चा आम्हाला त्यामुळे अभिमान वाटे. एस.एम.ची माझी वेव्हलेंथ अखेरपर्यंत कायम जुळलेली असे. माझ्या अनेक सहकारी मंत्र्यांना पुढे हे मोठे गूढ वाटे. पण त्यात गूढ काही नव्हते. आमच्या निष्ठा लोकशाही समाजवादाशी जोडलेल्या होत्या. त्याने आम्ही बांधलेले होतो. मार्ग वेगळे असतील कदाचित, पण आम्ही एकाच स्कूलचे विद्यार्थी होतो. निष्ठांबद्दल किंचितही शंका नव्हती. प्रामाणिकपणा, साधेपणा हा एस.एम.चा खास विशेष होता. त्यामुळे पुढे अनेक प्रसंगांत आम्ही एकमेकांना समजावून घेत परस्परांना विश्वास देत घेत अनेक कठीण प्रसंगी, कसोटीच्या प्रसंगी सामंजस्याने वागू शकलो. त्याचे कारणही बारा नंबरची बराक. एस.एम. माझे नेते होते.
मग आपण दोघे एकत्र एकाच पक्षात का राहिला नाहीत. किंवा एकाच झेंड्याखाली का नांदला नाहीत. समाजवादी विचारांच्या वेगळ्या छटा होत्या काय ?
नाही, आम्ही लोकशाही समाजवादी होतो. सत्याग्रही समाजवाद, लोकशाही समाजवाद असे किरकोळ भेद असतील पण भारताचे संविधान आणि धर्मनिरपेक्षता, विज्ञाननिष्ठा या मुद्यांवर आम्हा दोघांची अढळ निष्ठा होती. पण त्यांचे सोबतचे इतर सहकारी तसे होते असे म्हणणे धाडसाचे होईल.