पत्र-३
दिनांक ०१-०२-२०१२
चि. सुप्रिया,
सप्रेम जयभीम,
मागच्या पत्रात तुला यशवंतराव चव्हाणांसंबंधी लहानपणी मी अनुभवलेली गावातली निवडणूक प्रचारातली दंगल सांगितली व्हती. वातावरण तर पूर्ण प्रतिकूल झालं होतं. गावागावात चळवळीची लाट आली व्हती. संयुक्त महाराष्ट्र समितीनं सर्व विरोधी पक्षांना एका झेंड्याखाली आणलं व्हतं. काँग्रेसला दिवस मोठे कठीण व्हतं. चव्हाणसाहेबांच्या नेतृत्वाचा कस लागला व्हता. समोर फार मोठंमोठी माणसं व्हती. त्या वयात मला यातलं काही समजत नव्हतं. पण आताचा मी त्यात डोकवायला नको, म्हणून जे जसं घडलं तसंच तुला सांगावं हे उत्तम. नव्या पिढीनं मागच्या पिढीकडून काही शिकता आलं तर पाहावं. ते नीट पाहता यावं म्हणून मी माझ्या लहानपणी ऐकलेले-पाहिलेले यशवंतराव तुला सांगतो आहे.
निवडणुकांच्या तारखा जवळ येऊ लागल्या व्हत्या. सुगी चालू व्होती. शिवारातल्या ज्वारीच्या काढण्या सुरू झाल्या. राखणी बसल्या होत्याच. कणसातवी दाणं भरत व्हतं. पाखरांनी ऊत आणलाता नुस्ता. भल्या सकाळी दिस उगवायच्या आत माणसं हातात गोफणी घिऊन रानात पळत व्हती. कानाला बांधल्याच्या टापश्या पदराचं शेव कानाला गुंडाळून, हातातल्या गोफणीनं माळ्यावर चढून, हा ऽऽ हा ऽऽ रांडा मेल्यांनो म्हणत बाया, पोरं, बापे राखन करत होते. त्यानं सारं शिवार सकाळच्या पारी जागं होऊन कामाला लागलंत. तवा कुठला च्या आन् पाणी ? न्याहरी येस्तवर पाण्याचा थेंब टिकून पोटात जायाचा न्हाय. मंग लयच भूक लागली, तर हिरवी कणसं चोळायची आन् टाकायची तोंडात. तेवढाच आधार. दिस कासराभर येस्तोवर पाखरांच्या झुंडीच्या झुंडी शिवारात हिंडायच्या. एकानं हाकल्या, की दुसर्याच्या रानात. बुजागवणी तर जागूजागी लागल्याली असायची. पण, पाखरंबी माणसापरीस हुशार.
तुला का सांगू सुप्रिया, आम्ही पोरं सकाळी सकाळी रानातली पाखरं मोजत मस्ती करीत हिंडत व्हतो. मळ्यातल्या बारवावर बाया धुणं धुत व्हत्या. पल्याड हिरीवर मोट चालली होती. मोटचं गाणं सुरात चालू व्हते. तेवढ्यात गेणा ससता रानातनं हिरीवर आला. हातपाय धुतलं, चूळ भरली. दातावनं बॉट फिरावलं आन् मोटकरी वामनला म्हणाला, 'ह्याज्या मायला, लय पनवती आलीती, गेली. पर वामन आता कस रं करायचं ? आपल्यालाबी पक्षाची सभा घ्या पायजी का नको ? डोक्याचा गोयंदा झालाय. पण, नरसिंग गुरुजी मनावरच घिना, का करावं ? मानसिंगराव उठतूया आन् फलटनात घुसतुया. मी एकला का करणार रं ? माझं कोण आयकतया ?' वामननं बैल थांबावली. 'गेणूनाना, काढ तंबाखू, च्या मायला चंचीच घरी राहिलिया.' बैलं उभी करून वामन गेणबाकडं आला. तंबाखू चोळत वामन म्हणाला, 'म्या ऐकलया यशवंतरावांचीच सभा आणायला मानसिंगराव फलटणात चकरा मारतुया. मारामारी झाल्यापस्नं लयच चेकाळल्याती खालच्या आळीची पोरं. आपुन बी काय मेल्या आयचं दूध पिलोय व्हय ! बगा म्हणावं आमी काय करतुया.' आम्ही आपलं पाटातनं मस्ती करत चिखलात खेळत होतो. चिखलानं भरल्याली आंगं. मोटनं पाणी वतलं म्हंजी पाण्याचा लोंढ्याखाली निजायचं. पाणी वरनं गेलं, की नाचत बसायचं. दिस सरला तिनी सांजचं आमी खेळत खेळत चावडीम्होरं गेलू तर तिथं काँग्रेस पार्टीचा बोर्ड लागल्याला- 'दहा तारखीला संध्याकळी ५ वाजता ना. यशवंतराव चव्हाण, ना. मालोजीराजे, ना. निंबाळकर याचीं जाहीर सभा होणार आहे. सार्या गावकर्यांनी सभेला उपस्थित राहावे.' गावभर दवंडीबी चालू होती. सारं गाव पुन्हा जागं झालं. कामधाम करणारे सारे गावकरी यशवंतराव आता काय उत्तम देणार, शाहीराची कशी जिरणार म्हणून सभेची वाट बघू लागले. माझ्यासारखी पोरं कोण 'यशवंतराव ?' त्यास्नी बगता येईल म्हणून चेकाळून गेलोतो. रोज गावभर लोक यशवंतरावांच्या कथा सांगीत होते. लाल बावटेवाले नाना पाटलांच्या पत्री सरकारच्या गोष्टी सांगीत व्होते. कोण इंग्रजांशी कसा लढला, कुणी रेलवे लुटली, कुणी सरकारी मळ्यातलं ऊस पेटावलं, तर कुणी आगीनगाडी लुटली. सारे सांगत व्होते. कुणी खबरे आता लाल झेंडा घिऊन नाचतात, तर कोणी खबरे तिरंगा.