आता दुसरे, तुम्ही जायचेच ठरवले असेल पुण्याला, तर मी काय बोलणार, पण ठरवलेले नसेल तर सांगतो, मी कामासाठी मुंबईला गेलो, दिल्लीला गेलो, दोन्ही ठिकाणी दीर्घकाळ राहिलो, पण दिल्लीत माझे घर नाही. मुंबईतही माझे घर नाही. कुठेच माझे घर नाही. जेव्हा आता घरी परतावे लागेल, असे वाटले तेव्हा मित्रांच्या मदतीने मी घर शोधले ते कृष्णेच्या काठावर कराडला. माझे घर कराडलाच असू शकते. ज्या कृष्णेच्या काठावर आपण वाढलो, जेथे लहानाचे मोठे झालो ती माती, ती माणसे ही आपल्या उभ्या आयुष्याला आकार देतात. म्हणून मी कामासाठी कोठेही गेलो तरी घर कराडलाच बांधले. आता असे बघा, आपल्या जिल्ह्यातले सहा कुलगुरू राज्यातल्या सहा विद्यापीठांमध्ये गेले. अगदी शंकरराव खरातांपासून दाभोळकरांपर्यंत, पण सातार्यात कितीजण राहिले ? लोक आपल्या खेड्यापाड्यातून मोठे होतात. नावलौकिक त्यांच्या कर्तबगारीने मिळवतात व खूप खूप मोठे होतात. पण पुण्यामुंबईला निघून जातात. आणि जेथे आपण वाढलो ती गावे ओकीबोकी होऊन जातात. हे केवळ कुलगुरूंसाठी नाही. आपल्या समाजातील सर्वांसाठीच आहे. आपली गावे मोठी व्हायची तर मोठ्या माणसांनी नको का तेथे राहायला. शशीला भेटायला जायचे तर तिचे घर सातारलाच हवे. कृष्णा-वेण्णेच्या काठी. इथेही प्रीतिसंगमच आहे ना ? सातारा कोल्हापूरच्या दोन नद्या इथेच तर रमल्या. बघा विचार करून.
मी मानेनेच होकार दिला. साहेबांचा निरोप घेतला. साहेब पुढे कराडला गेले तेथून कोल्हापूरला जाणार होते. मी घरी परत आलो. शशीला सारी हकीकत सांगितली. आम्ही दोघांनी विचार केला. घर करायचे तर ते सातारलाच. आता यापुढे पुण्यातच नाही तर कुठेच जायचे नाही. कामासाठी राज्यात किंवा कुठे जायचे पण आपले घर सातारलाच असले पाहिजे.
सुप्रिया, मी राज्यभर हिंडतो पण माझे कुठेही घर नाही. कोणत्याही गावात बँक खाते नाही. मधल्या काळात मी आमदार होतो. साहित्यिक म्हणूनही लौकिक झाला होता. शासनाच्या १० टक्क्यातून मला घर मिळवता आले असते. अनेकांना माझ्या पत्रावरल्या शिफारशींनी तुझ्या बाबांनी घरे दिली. पण मला मी कधी जागा मागितली नाही की घर. तुझ्या बाबांना आपल्या जवळच्या माणसांची परीक्षा पाहण्याचा, त्यांचे मन समजावून घेण्याचाही छंद आहे. त्यांनी माझ्या पत्रावर माझ्या एका सहकार्याला मुंबईला प्लॉट दिला. पुन्हा त्याने दुसर्याच्या नावे मागितला तोही दिला. तो मित्र बाहेर गेला. मला थोडे थांबा म्हणाले. मी थांबलो. टेबलच्या ड्रॉवरमधून एका किल्ली काढली आणि माझ्या हातावर ठेवली.
म्हणाले, 'दुसर्या एकासाठी फ्लॅट दिला होता, पण आता तुम्हाला देतो आहे. मोठा आहे.'
मी घाम पुशीत म्हणालो, मी कधी मागितलाय ?
ते म्हणाल, ते तर मला माहीतच आहे, तुम्ही मागणार नाही. छान आहे ठेवा.
मी म्हणालो, साहेब, मी सातारला राहतो. केव्हातरी मुंबईला येतो. मला काय करायचे इथे घर ? समजा, एका रात्रीपुरता प्रश्न आला तर प्रतिभावहिनी काही मला हाकलून नाही द्यायच्या. मला ह्या असल्या गोष्टीत रस नाही. मी गुपचूप किल्ली ठेवली. तुझे बाबा मनाने किती मोठे आहेत हे मी हजारो वेळा अनुभवले आहे. प्रश्न त्यांच्या मोठेपणाचा नाही. मी चव्हाणसाहेबांनी सांगितलेली गोष्ट मनात ठेवली आहे. माझे घर सातारलाच असेल.
झाले ! दोनच दिवस गेले आणि माझे सासरे, सासुबाई, आणि चुलत सासरे माझे घरी हजर. शशीच्या माझ्या आनंदाला पारावार राहिला नाही. चांगले दोन-तीन दिवस राहिले. या गोष्टीचे शशीला फारच अप्रूप वाटले. माझे सासरे सातारला आले. सायंकाळी चार-पाच वाजले असतील. शेजारची लहान पोरे दारात जमली होती. भाईच्या आई, भाईच्या आई, तुमच्याकडे कुणीतरी आलेय. घर विचारत होते. अशी मोठी गाडी आहे. शशी बाहेर गेली. तिने पाहिले तर तिचे आईवडील, काका. पळतच गेली आणि हातातली बॅग घेतली. घरात आली. मलाही मोठे आश्चर्य वाटत होते. असे कसे काय झाले ? ही मंडळी कशी काय आली ? अण्णा, काका कॉटवर बसले. आई आतल्या घरात गेली. मी खुर्चीवर बसलो. शशीने पाणी दिले. कळवायचे नाहीसा ? असं अचानक कसं काय आला ?
अण्णा म्हणाले, भाग्यवान आहेस पोरी ! खरं सांगतो, भाग्यवान आहेस. अण्णा भिंतीला टेकून बसले. त्याचे असे झाले - परवा यशवंतरावांनी आमचे डोळे उघडले. श्रीपतराव दादांचा फोन आला पेढीवर. नमस्कार श्रीपतराव. शशी नावाची आपलीच मुलगी आहे ना ?